व्हेनेझुएलात जगात सर्वाधिक महागाई | पुढारी

व्हेनेझुएलात जगात सर्वाधिक महागाई

महागाईची समस्या केवळ आपल्या देशाला नव्हे तर कमी-अधिक प्रमाणात संपूर्ण जगाला विळखा घालून राहिली आहे. दक्षिण अमेरिका खंडातील व्हेनेझुएला देशाने तर याबाबतीत कहर केला आहे. या तेलसंपन्न देशाची अवस्था तेथील यादवीमुळे वैराण वाळवंटासारखी झाली आहे. परिणामी तेथे पोते भरून पैसे देऊन मूठभर खाद्यपदार्थ खरेदी करा, अशी दारुण परिस्थिती निर्माण झाली आहे. या महागाईला कंटाळून तेथील 54 लाख लोकांनी देश सोडून अन्यत्र आसरा घेतल्याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात दिली आहे.

महागाई दर

महागाईच्या मुळाशी खनिज तेल

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने यासंदर्भात जारी केलेल्या अहवालानुसार, खनिज तेलांच्या किमतीत झालेली वाढ म्हणजे महागाईला आमंत्रण. त्याखेरीज खाद्यपदार्थांच्या उसळलेल्या किमती, महागडे क्रूड ऑईल, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, मूलभूत धातू आणि रासायनिक उत्पादने यामुळे घाऊक महागाईत वाढ झाली आहे.

महागाईला नव्याने आमंत्रण

आपल्या देशातील महागाईबाबत सांगायचे तर गेल्या महिन्यात घाऊक किंमत निर्देशांक किंचित कमी झाल्यामुळे आम जनतेला थोडाफार दिलासा मिळाला. जूनमध्ये घाऊक महागाईचा दर 15.18 टक्क्यांवर आला. मे मध्ये हाच दर 15.88 टक्क्यांच्या पातळीवर होता. तथापि, दुग्धजन्य पदार्थ, पीठ आणि डाळींवरही जीएसटी लागू करण्यात आल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागायला सुरुवात झाली आहे. एकप्रकारे हे महागाईला आमंत्रण ठरणार आहे.

चलनफुगवट्याचा कळस

सुदान, लेबनॉन, सीरिया, झिम्बाब्वे यांसारख्या देशांत चलनफुगवट्याने कळस गाठला आहे. या देशांतील जनता तेथील अराजकामुळे गांजली आहे. मूठभरांच्या हाती तिथे संपत्तीचे केंद्रीकरण झाल्याचे पाहायला मिळते. आर्थिक बेशिस्त आणि हुकूमशाही यामुळे हे देश भीकेकंगाल झाले आहेत.

Back to top button