स्टील प्लांटमधील कामगार ते पंतप्रधान | पुढारी

स्टील प्लांटमधील कामगार ते पंतप्रधान

भारतमित्र शिंजे अ‍ॅबे यांची राजकीय वाटचाल

शिंजे अ‍ॅबे हे दीर्घकाळ राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील होते. त्यांचा जन्म 21 सप्टेंबर 1954 रोजी जपानची राजधानी टोकियो येथे झाला. आपल्या कुटुंबातील राजकारणात सक्रिय असणारे ते तिसर्‍या पिढीचे नेते होते. त्यांचे वडील शिंतारा अ‍ॅबे यांच्याखेरीज त्यांचे आजोबा कोन अ‍ॅबे हेही जपानचे मान्यता लाभलेले राजकारणी होते. अ‍ॅबे यांचे पणजोबा म्हणजेच त्यांच्या आजोबांचे वडील योशिमा ओशिमा हे इम्पीरियल जपान आर्मीमध्ये जनरल म्हणून तैनात होते. अ‍ॅबे यांची आई योको किशी 1957 ते 1969 या काळात पंतप्रधान असलेल्या नोबू किशी यांची मुलगी होय.

स्टील प्लांटमध्ये काम

निओसाका येथून अ‍ॅबे यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. नंतर त्यांनी सायकी विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदवी पूर्ण केली. त्यानंतर ते उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी अमेरिकेला गेले. जिथे त्यांनी दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. मात्र, राजकीय बाळकडू मिळाले म्हणून लगेच त्यांनी राजकारणात प्रवेश केला नाही. अमेरिकेतून शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर त्यांनी दोन वर्षे काबे स्टील प्लांटमध्ये कामगार म्हणून काम केले. या प्लांटमध्ये दोन वर्षे काम केल्यानंतर त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि नंतर राजकारणात प्रवेश केला.

सर्वात तरुण पंतप्रधान

अ‍ॅबे यांच्या वडिलांचे 1993 मध्ये निधन झाले आणि त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली. निवडणुकीत त्यांना सर्वाधिक मते मिळाली. एक पोलादी राजकारणी अशी त्यांची छबी तयार होऊ लागली आणि उत्तरोत्तर त्यांची लोकप्रियता वाढत गेली. 2006 मध्ये, लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते असलेल्या अ‍ॅबे यांची वयाच्या 52 व्या वर्षी जपानच्या पंतप्रधानपदी निवड झाली. जपानचे सर्वात तरुण पंतप्रधान होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. याशिवाय शिंजो अ‍ॅबे हे जपानचे सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिले.

अ‍ॅबे यांचे भारताशी विशेष संबंध होते. जपान आणि भारत यांना विविध माध्यमांद्वारे जोडण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. योग, सिनेमा, खाद्यपदार्थ याबरोबरच भारतीय संस्कृतीचेही ते कौतुक करत. भारतीय संस्कृती आणि खाद्यपदार्थ जपानमध्ये किती लोकप्रिय आहेत हेही त्यांनी सांगितले होते. त्यांच्या कार्यकाळात जपानचे भारतासोबतचे वेगळ्या संबंध उंचीवर गेले. भारताशी घनिष्ठ संबंधांचे ते पुरस्कर्ते राहिले आहेत. अ‍ॅबे यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत भारत आणि जपानमधील संबंध अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचले.

जपानने भारतात अनेक महत्त्वाचे प्रकल्प राबवले आहेत. देशातील मेट्रो प्रकल्पात जपाननेही मोठे योगदान दिले आहे. अ‍ॅबे हे जपानची राष्ट्रीय सुरक्षा, तांत्रिक विकास आणि इतर देशांसोबतचे संबंध अधिक मजबूत करण्यासाठी ओळखले जातात. शिंजो अ‍ॅबे यांनी अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरही उत्तम काम केले. यामुळेच त्यांना एकापाठोपाठ एक सलग सहा निवडणुका जिंकता आल्या. आपल्या परराष्ट्र धोरणाच्या जोरावर अ‍ॅबे यांनी शेजारील देशांशी समतोल संबंध राखले. त्यानंतर चीन आणि अमेरिकेसारख्या महासत्तांशी जपानचे संबंध सुधारण्याचा पवित्रा घेतला. अ‍ॅबे हे भारतासाठी अतिशय खास नेते होते. आंतरराष्ट्रीय मंचावर भारताच्या बाजूने उभे राहणे असो किंवा संकटकाळात भारताला मदत करणे असो, अ‍ॅबे यांच्या नेतृत्वाखाली जपानने नेहमीच भारताला साथ दिली. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील भागीदारीसह अ‍ॅबे यांनी भारत-जपान संबंधांना नव्या उंचीवर नेले. त्यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात भारताला भेट दिल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंधांना नवी दिशा दिली.

आजोबांच्या मांडीवर बसून ऐकल्या होत्या भारत कथा

अ‍ॅबे हे 1957 मध्ये स्वतंत्र भारताला भेट देणारे पहिले जपानी पंतप्रधान नोबुसुके किशी यांचे नातू आहेत. अ‍ॅबे यांचा भारताशी संबंध बालपणापासून होता. भारत भेटीदरम्यान अ‍ॅबे यांनी लहानपणी भारताबद्दल ऐकलेल्या कथा त्यांच्या आजोबांच्या मांडीवर बसून ऐकल्याचे त्यांनी सांगितले होते. अ‍ॅबे यांना भारताबद्दल अपार आकर्षण होते. भारताची संपन्न संस्कृती आणि द्विपक्षीय संबंधांबद्दल अ‍ॅबे यांची जवळीक अनेक प्रसंगी दिसून आली.

वडील होण्याचे स्वप्न अधुरेच

तब्बल 9 वर्षे जपानची धूरा वाहणार्‍या शिंजो अ‍ॅबे यांचे वडील होण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. त्यांना व त्यांची पत्नी अकी अ‍ॅबे यांना एकही अपत्य नाही. कधीकाळी डीजे असणार्‍या अकी व शिंजो यांची प्रेम कहाणी फारच रंजक आहे. लग्नानंतर दीर्घ काळ उपचार करूनही अ‍ॅबे दाम्पत्याला अपत्य झाले नाही. त्यामुळे अ‍ॅबेंनी एखादे मूल दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली. पण जपानमध्ये मूल दत्तक घेण्याची प्रथा नाही. त्यामुळे पत्नी अकी अ‍ॅबे यांनी त्याला विरोध दर्शवला. उल्लेखनीय बाब म्हणजे अत्यंत कमी जन्मदर असणार्‍या जपानमध्ये दत्तक घेण्यासाठी मूल शोधणे हे ही काही सोपे काम नाही. अकी या एकेकाळी व्यावसायिक डीजे होत्या. 1980-90 च्या दशकात रेडिओवर अकी यांचे कार्यक्रम येत होते. ते शिंजो मोठ्या आवडीने ऐकत होते. अकी तेव्हा जपानी तरुणांत चांगल्याच लोकप्रिय होत्या. शिजोंनाही त्यांचा आवाज फार पसंत होता. त्यानंतर दोघांचे लग्न झाले.

यापूर्वीही झाली होती पंतप्रधानांची हत्या

जपानमध्ये पंतप्रधानांची गोळ्या घालून हत्या केल्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी 1932 साली अशीच घटना घडली होती. तेव्हाचे पंतप्रधान इनुकाई सुयोशी यांच्यावर 15 मे 1932 रोजी नौदलाच्या 11 अधिकार्‍यांनी हल्ला केला होता. या हल्ल्याला जपानच्या लोकांनी खूप पाठिंबा दिला होता. त्यामुळे मारेकर्‍यांना जुजबी शिक्षा झाली. त्यानंतर जपानमध्ये लष्कराचा दबावही वाढला आणि लोकशाही कमकुवत झाली. ही घटना जपानी राजेशाही कमकुवत करणारीदेखील मानली जाते. जपानबरोबरच संपूर्ण जगामध्ये त्या घटनेला 5.15 या नावाने ओळखले जाते. सुयोशी यांना सत्तेवरून दूर करण्याच्या व्यापक कटाचा तो भाग होता. जपानी लष्कराचे काही सैनिक आणि लीग ऑफ ब्लड नावाच्या जहाल संघटनेचे काही अतिरेकीदेखील त्या हल्ल्यात सामील झाले होते.

बुलेट ट्रेन प्रकल्पात मोलाची भूमिका

सप्टेंबर 2017 मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन जपानचे पंतप्रधान अ‍ॅबे यांनी अहमदाबादमध्ये देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाची पायाभरणी केली होती. भारतातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प महाराष्ट्राची राजधानी आणि गुजरातमधील अहमदाबाद दरम्यान तयार होत आहे. हा प्रकल्प जपानच्या सहकार्याने बनवला जात आहे. या प्रकल्पासाठी भारत आणि जपानमध्ये करार झाला आहे. त्याचप्रमाणे भारतात मेट्रो प्रकल्प सुरू करण्यात जपाननेही महत्त्वाची भूमिका बजावली आणि नंतर भारतानेच मेट्रोचा विस्तार करून नवीन मेट्रो रेल्वे मार्ग बांधले.

प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे

शिंजो अ‍ॅबे हे 2014 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतात आलेले जपानचे पहिले पंतप्रधान होते. यावरून त्यांचे भारताशी असलेले सखोल नाते दिसून येते. आबे यांना भारतासोबत चांगले संबंध हवे होते. भारतातील यूपीए सरकार असो किंवा एनडीएचे असो, जपानशी भारताचे संबंध वाढतच गेले, याचे कारण हेच होते.

पद्मविभूषण देऊन सन्मानित

भारत आणि जपानमध्ये यापूर्वीही चांगली मैत्री होती हे खरेच. तथापि, अ‍ॅबे यांनी त्यांच्या कार्यकाळात या मैत्रीने कळस गाठला. यामुळेच गेल्या वर्षी भारताने त्यांना देशाच्या सर्वोच्च सन्मानांपैकी एक असलेल्या पद्मविभूषणने सन्मानित केले होते.

Back to top button