महिला, मुलींना धोका नाही, तालिबान्यांचा दावा | पुढारी

महिला, मुलींना धोका नाही, तालिबान्यांचा दावा

काबूल; वृत्तसंस्था : अफगाणिस्तानमध्ये 20 वर्षानंतर तालिबानीं युग आल्यानंतर देशात शरियत कायदा लागू केला केला जाणार आहे. नागरिकांना त्याचे सक्तीने पालन करावेच लागेल. तालिबानीच्या नव्या राजवटीत महिला आणि मुलींना कोणताच धोका नाही. त्यांना शरियत कायद्यानुसार सर्व अधिकार प्रदान केले जातील.

महिला आणि मुलींना नोकरी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाईल. तसेच त्यांना कोणत्याही क्षेत्रात करियर करता येईल. मात्र यावेळी त्यांना बुरखा घालणे सक्तीचे असल्याचे तालिबानी प्रवक्ता जुबीउल्लाह मुजाहिद याने स्पष्ट केले आहे.

अफगाणिस्तानची सत्ता बळकावल्यानंतर पहिल्यांदाच राजधानी काबूल येथून तालिबानने जगाला संबोधित केले. तालिबानी सरकारकडून अन्य कोणत्याही धोका नसल्याचेही त्याने स्पष्ट केले.

मुजाहिद म्हणाला, तालिबानची अफगाणिस्तानात सत्ता आल्याने नागरिकांना मुस्लिम परंपरांचे पालन करावेच लागेल. शरियत कायदा सक्तीचाच असेल. दरम्यान तालिबानी राजवटीने अफगाणि नागरिकांमध्ये विशेषतः महिलांमध्ये भितीचे वातावरण आहे. तालिबानी विचारधारेचा विचार करता महिलांना अफगाणिस्तानात नोकरी करता येईल काय? मुलींना शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य मिळेल काय? असे अनेक प्रश्‍न भेडसावत आहेत. मात्र शरियत कायद्यानुसार महिलांना वागावे लागेल. तरच त्यांना नोकरी अथवा शिक्षण घेता येणार आहे. मात्र त्यांना बुरखा सक्तीचा केला जाणार असल्याचे तालिबानी प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.

तालिबानचे कोणाशीही शत्रुत्व नाही. आमच्या नेत्याच्या आदेशानुसार आम्ही सर्वांना माफ केले आहे. अफगाणिस्तानात इस्लामी राजवट लवकरच स्थापन होईल. काबूलमधील स्थिती पूर्ववत होत असल्याचे मुजाहिद म्हणाला.

युद्धकाळात झालेले नुकसान जाणूनबूजन केलेले नाही, आणि कोणाचाही आम्ही बदला घेणार नाही. सर्व देशांशी सौहार्दपूर्ण संबंध निर्माण करण्यास कटिबध्द असल्याचे मुजाहिद याने सांगितले.

तो म्हणाला, 1990 मधील तालिबान आणि सध्या तालिबानमध्ये खूपच अंतर आहे. विचारधारा आणि विश्‍वास समान आहे मात्र आतापर्यंतच्या अनुभवानुसार सर्वपक्षीयांचे सरकार आम्ही अफगाणिस्तानमध्ये स्थापन करणार आहोत.

अफगाणिस्तानात अफूची शेती आणि अंमली पदार्थाना परवानगी दिली जाणार नाही. अफुच्या शेतीला पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यासाठी जगाच्या पाठिंब्याची गरज आहे. देशात आमच्या नैतिकमूल्यांच्या आधारे नियम तयार करण्याचा आम्हाला अधिकार आहे, त्याचा अन्य देशांनी सन्मान करावा.

माध्यमांना तालिबानची त्रिसूत्री

अफगाणिस्तानात सर्व माध्यम संस्था आपले काम सुरू ठेवतील. मात्र त्यांना इस्लामी मुल्यांचा आदर करावा लागेल. त्यांचे प्रसारण निष्पक्ष असावे, राष्ट्रहिताच्या विरोधात त्यांना कोणतेही प्रसारण करता येणार नाही. या त्रिसूत्री माध्यामांना पालन करावेच लागेल, असे तालिबानी प्रवक्त्याने या वेळी सांगितले.

Back to top button