युक्रेनच्या केवळ 20 टक्के भागावरच रशियाचा ताबा | पुढारी

युक्रेनच्या केवळ 20 टक्के भागावरच रशियाचा ताबा

कीव्ह ; वृत्तसंस्था : युक्रेनला अमेरिकेच्या गटात सहभागी होताना पाहून रशियाने युक्रेनवर 24 फेब्रुवारी रोजी हल्ला केला होता. या हल्ल्याला आता 100 दिवस पूर्ण झाले असून अजूनही युद्धाचा निकाल लागलेला नाही, किंवा काय निकाल लागेल, हे सांगता येत नाही. दरम्यान, या 100 दिवसांच्या कालावधीत रशियाला युक्रेनचा केवळ 20 टक्के भागावरच ताबा मिळवता आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून रशियाने हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे. रशियाचे लक्ष्य डोनबास आणि लुहान्स्क या प्रांतांवर आहे. रशिया दररोज हळू हळू पुढे जात असून युक्रेनच्या प्रतिकारामुळे दररोज 100 रशियन सैनिक मरत आहेत तर 400 ते 500 सैनिक जखमी होत आहेत, अशी माहिती आहे. पाश्चिमात्य देश युक्रेनच्या मदतीसाठी सतत मदत पाठवत आहेत. नाटोचे अध्यक्ष जेन्स स्टोलटेनबर्ग यांनी म्हटले आहे की, नाटो रशियाशी थेट युद्ध करू इच्छित नाही. आम्हाला दीर्घकाळासाठी तयारीत राहावे लागेल.

68 लाख नागरिकांचे स्थलांतर

युद्धामुळे युक्रेनमधील 68 लाख लोकांना स्थलांतरित व्हावे लागले आहे. ही संख्या युक्रेनच्या एकूण लोकसंख्येच्या 15 टक्के आहे. म्हणजेच प्रत्येक सहाव्या युक्रेनी नागरिकाला स्थलांतरित व्हावे लागले आहे. 68 पैकी 36 लाख पोलंडला गेले आहेत, युक्रेनची लोकसंख्या 2021 मध्ये 4.3 कोटी होती ती आता 3.7 कोटी राहिली आहे.

रशियावर पाच हजारांहून अधिक निर्बंध

युद्ध सुरू झाल्यापासून रशियावर विविध देशांनी मिळून 5831 निर्बंध लादले आहेत. यात सर्वाधिक 1144 निर्बंध अमेरिकेने घातले आहेत. तसेच 4800 हून अधिक रशियन नागरिकांवर बंदीही घालण्यात आली आहे.

Back to top button