Russia Ukraine war: रशियाने रोखला गॅस पुरवठा, पोलंड, बल्गेरियाचा आरोप | पुढारी

Russia Ukraine war: रशियाने रोखला गॅस पुरवठा, पोलंड, बल्गेरियाचा आरोप

कीव्ह/मॉस्को ; वृत्तसंस्था : रशियन (Russia Ukraine war) चलन रूबलमध्ये व्यवहार न केल्यावरून रशियाने नैसर्गिक वायूचा पुरवठा रोखल्याचा आरोप युरोपमधील पोलंड आणि बल्गेरिया या देशांनी केला आहे. पोलंडने रशियाला ऊर्जा पुरवठ्याचे बिल रूबलमध्ये देण्यास नकार दिला होता. त्यामुळे चिडलेल्या रशियाने पोलंडला जाणार्‍या नैसर्गिक वायूत कपात करण्याचे वक्‍तव्य केले होते. पोलंडच्या नैसर्गिक वायूच्या एकूण गरजेपैकी 45 टक्के नैसर्गिक वायू रशिया पुरवतो.

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून जगभरातील अनेक देशांनी रशियावर विविध प्रकारचे निर्बंध लादले. त्यामुळे रशियाने सर्व व्यवहार रूबल या रशियन चलनात करण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वी बहुतांश व्यवहार अमेरिकन डॉलरमध्ये व्हायचे. विशेषतः खनिज तेलाचे आंतरराष्ट्रीय व्यवहार तर डॉलरमध्येच व्हायचे. पण रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यापासून अनेक समीकरणे बदलली आहेत.

रशिया-युक्रेन युद्ध (Russia Ukraine war)

* संयुक्‍त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्या मॉस्को भेटीत पुतीन यांनी मारियुपोल आणि बूचा येथील नरसंहाराचा इन्कार केला.
* ब्रिटनने युक्रेनला युद्धासाठी उकसावले तर त्यांनाही प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा रशियाने दिला.
* युद्धाला सुरुवात झाल्यापासून रशियाचे शस्त्रागार निम्मे झाल्याचा दावा, युक्रेनने केला आहे.
* कॅनडाने युक्रेनला 8 चिलखती वाहने देणार असल्याचे म्हटले आहे.

बेल्जियमच्या बंदरात हजारो लक्झरी कार्स धूळ खात पडून

युद्धामुळे युरोपीय देशांनी 50 हजार यूरोहून अधिक किमतीच्या रशियन निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे कॅडिलक, फेरारी, मर्सिडीज आणि लेक्सस सहित 8 हजारांहून अधिक कार्स बेल्जियमच्या जेब्रुज बंदरात धूळ खात पडून आहेत. जेब्रुज येथून वर्षाला 2 कोटींहून अधिक कार्स ट्रान्सपोर्ट केल्या जातात.

Back to top button