

अब्जाधीश उद्योगपती, इलेक्ट्रिक कार बनविणारी कंपनी टेस्लाचे मालक आणि जगातील पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी ट्विटर या कंपनीवर पूर्ण मालकीसाठी 43 बिलियन डॉलर (जवळपास 3.22 लाख कोटी रुपये) चा प्रस्ताव दिला. मस्क यांच्या या ऑफरनंतर 'पॉयझन पिल' हा शब्द चर्चेत आला आहे. त्याविषयी…
काय आहे पॉयझन पिल?
पॉयझन पिल हे कंपन्यांचे एक सुरक्षा धोरण आहे. एकप्रकारे एक वित्तीय डीव्हाईस आहे. एखादी व्यक्ती कंपनी खरेदी करू इच्छित असेल पण कंपनीला तसे नको असेल तर या धोरणाचा वापर कंपन्या करतात. एकप्रकारे याला चुकीच्या व्यक्तीच्या हातात कंपनी जाऊ नये, यासाठीचे सुरक्षा कवच म्हणता येईल. मस्क यांच्या ऑफरनंतर ट्विटर पॉयझन पिलचा वापर करत असल्याची चर्चा आहे.
पॉयझन पिलचे मूळ
1930 पासून कंपन्या हे धोरण अवलंबत आहेत. याची सुरुवात न्यूयॉर्कमधील लीगल फर्म वॉचेल, लिप्टन, रोसेन आणि कात्झ यांनी केली होती. 1980 नंतर हे धोरण प्रसिद्धी झोतात आले. पॉयझन पिल या शब्दाचा वापर शत्रूच्या हाती लागण्यापासून बचावासाठी केला जातो. हेरगिरीतून हा शब्द आला आहे. नेटफ्लिक्सने 2012 मध्ये या धोरणाचा वापर केला आहे.
अशी असते पॉयझन पिलची प्रक्रिया
एखाद्या कंपनीवर कुणी जबरदस्तीने मालकी प्रस्थापित करू पाहत असेल तर त्यापासून रोखण्याचा उपाय म्हणजे पॉयझन पिल. यात लिमिटेड टर्म शेअरहोल्डर राईट्स प्लॅन असतो. यात ट्विटरचे शेअरधारक (मस्क वगळून) स्वस्तात कंपनीचे शेअर खरेदी करू शकतात. त्यामुळे मस्क यांची कंपनीतील मालकी कमी होईल. जर मस्क किंवा इतर गुंतवणूकदार यांनी 15 टक्क्यांहून अधिक मालकी मिळवली तर ही तरतूद लागू होईल. त्यामुळे मस्क यांना कंपनीचे शेअर खरेदी करणे महाग पडेल आणि कंपनीवर संपूर्ण मालकी मिळविण्याऐवजी त्यांना चर्चेचा पर्याय निवडावा लागेल.
काय आहे ट्विटरची पॉयझन पिल?
ट्विटरने अद्याप त्यांच्या पॉयझन पिलबाबत खुलासा केलेला नाही. तसेच इलॉन मस्क यांनीही पॉयझन पिलवर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
ही ट्विटरचीही असू शकते चाल?
पॉयझन पिल हा केवळ एखाद्याला कंपनीवरील मालकीपासून रोखण्याचा मार्ग नाही तर कंपनीची किंमत वाढविण्याची चालही असू शकते. याद्वारे कंपनी वाटाघाटींची व्याप्ती वाढवू शकते. 2003 मध्ये ओरॅकल या सॉफ्टवेयर उत्पादक कंपनीने पीपल सॉफ्ट या कंपनीला टेकओव्हर करण्यासाठी 38 हजार कोटी रुपये देऊ केले होते. पीपल सॉफ्टने पॉयझन पिलचा वापर केला. त्यानंतर 18 महिने वाटाघाटी, संघर्ष सुरू होता. कायदेशीर बाबी पार करून अखेर ओरॅकलने मालकी मिळवली. पण तेव्हा ओरॅकल कंपनीला दुप्पट म्हणजेच जवळपास 83 हजार कोटींहून अधिक रक्कम मोजावी लागली होती.
प्रति शेअर 54 डॉलर देण्याची तयारी
सध्या मस्क यांची संपत्ती 265 बिलीयन डॉलर इतकी आहे. त्यांच्याकडे ट्विटरची 9.2 टक्के म्हणजे सर्वाधिक वैयक्तिक मालकी आहे. ट्विटरची 100 टक्के म्हणजे पूर्ण मालकी खरेदी करण्यासाठी मस्क यांनी प्रति शेअर 54 डॉलर (4050 रुपये) देण्याची तयारी दर्शवली आहे.