russia ukraine war : युक्रेनला शस्त्रपुरवठा थांबवा; अन्यथा गंभीर परिणाम : रशिया | पुढारी

russia ukraine war : युक्रेनला शस्त्रपुरवठा थांबवा; अन्यथा गंभीर परिणाम : रशिया

मॉस्को / कीव्ह; वृत्तसंस्था : काळ्या समुद्रात युद्धनौका बुडाल्यानंतर रशियाने (russia ukraine war) अमेरिकेला इशारा दिला आहे. अमेरिकेने युक्रेनला शस्त्रपुरवठा करण्याचे थांबवावे; अन्यथा अमेरिकेला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली आहे. दरम्यान, युक्रेनला अमेरिकेचा कायमच पाठिंबा राहणार असून आम्हाला युक्रेनला मदत करण्यापासून कोणीच रोखू शकत नसल्याचे प्रत्युत्तर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्‍ते नेड प्राईस यांनी दिले आहे. दरम्यान रशियाने युक्रेन लष्कराची फॅक्टरी उद्ध्वस्त केली आहे. त्याला रशियन संरक्षण मंत्रालयाने दुजोरा दिला आहे.

दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील (russia ukraine war) युद्ध सलग 52 व्या दिवशीही सुरूच आहे. रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनचे अतोनात नुकसान झाले असून, शेकडो नागरिकांना आतापर्यंत आपले प्राण गमावावे लागले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार राजधानी कीव्हमधून आतापर्यंत 900 पेक्षा अधिक नागरिकांचे मृतदेह सापडले आहेत. यातील 350 मृतदेह बूचा येथून मिळाले आहेत. तसेच अडीच ते तीन हजार युक्रेनी सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली असून 10 हजारपेक्षा अधिक सैनिक जखमी झाले आहेत.

युद्ध अपडेटस् (russia ukraine war)

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी 800 दशलक्ष डॉलर्सची (सुमारे 6,089 कोटी रुपये) लष्करी मदत करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये 11 हेलिकॉप्टर, 18 हॉवित्झर तोफा आणि 300 स्विचब्लेड ड्रोनचा समावेश आहे.
  • खार्किव्हमध्ये शनिवारी रशियाच्या हल्ल्यात 10 युक्रेनी नागरिकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये 7 महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे तर 35 नागरिक जखमी झाले आहेत.
  • दक्षिण युक्रेनमधील मायकोलाईव्ह शहरात शुक्रवारी रशियाने हल्ले केले. रहिवाशी इमारतींवर केलेल्या हल्ल्यात 5 युक्रेनी नागरिकांचा मृत्यू झाला तर 15 नागरिक जखमी झाले आहेत.
  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) मॅनेजिंग डायरेक्टर क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी सांगितले की, युक्रेनच्या पुनर्बांधणीसाठी आम्ही तयारी करत आहोत. तत्कालीन मदत म्हणून आता युक्रेनला 1.4 अब्ज डॉलर्सची मदत केली जाणार असल्याचे जार्जिव्हा यांनी सांगितले. रशियन लष्करने चेर्निहीव्हमध्ये युक्रेनी सैनिकांवर शुक्रवारी उशिरा रात्री गोळीबार केला.
  • युक्रेनला लष्करी मदत म्हणून एक अब्ज युरोची मदत करण्याची तयारी जर्मनीने केली आहे. यापूर्वी जर्मनीने संरक्षण सामुग्री दिली नसल्याची तक्रार युक्रेनने केली आहे.

Back to top button