

इस्लामाबाद; पुढारी ऑनलाईन
पाकिस्तानच्या (Pakistan) खैबर पख्तूनख्वा प्रांतातील उत्तर वझिरीस्तान मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तान सैन्यातील ७ जवान ठार झाले होते. तर दुसऱ्या एका हल्ल्यात आणखी एका जवानाचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने अफगाणिस्तानवर एअर स्ट्राइक केला असल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानातील काही पत्रकारांनी ट्विट करत दावा केला आहे की मध्यरात्री पाकिस्तानच्या विमानांनी अफगाणिस्तानातील कुनार, खोस्त, चोगम आणि पेचा मेला भागात बॉम्ब हल्ले केले. पाकिस्तानच्या या हल्ल्यात महिला आणि मुलांसह ५ लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
पाकिस्तानी पत्रकार सलीम महसूद यांनी ट्विट करत म्हटले आहे की, पाकिस्तानच्या जेट विमानांनी रात्री उशिरा अफगाणिस्तानमधील पेचा मेला, खोस्त आणि चोगम – कुनार येथे बॉम्बहल्ला केला. सुत्रांनी कुनारमध्ये एक महिला आणि ५ मुलांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. खोस्त येथून अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. यामुळे पाक-अफगाण सीमेवरील तणाव आणखी वाढू शकतो!!. अफगाणिस्तानचा कुनार आणि खोस्त प्रांत पाकिस्तान सीमेला लागून आहे.
पाकिस्तानी (Pakistan) सैन्याने अफगाणिस्तानातील टीटीपी दहशतवादी ठिकाणांवर कारवाई सुरु केली आहे. यासाठी पाकिस्तान नव्या टीबी-२ ड्रोनचा वापर करत असल्याचे सुत्रांनी म्हटले आहे. तालिबानी आणि पाकिस्तानी सैन्यांत धुमश्चक्री सुरु असल्याचीही माहिती पुढे आली आहे. तालिबान खोस्त आणि कुनार भागात पाकिस्तानी सैन्याला जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी अतिरिक्त सैन्य तैनात करत असल्याचे चित्र दिसत आहे. टीटीपीने पाकिस्तानच्या एका सैन्य तळावर हल्ला केल्याचाही दावा केला आहे.
तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या संघटनेला पाकिस्तानी तालिबान असे म्हटले जाते. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने याआधी पाकिस्तान सरकारसोबत केलेला युद्धविराम करार संपुष्टात आणला होता. यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला होता.
पाकिस्तानाच्या उत्तर वझिरीस्तानच्या आदिवासी भागात झालेल्या हल्ल्यात सात पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. या भागात तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या प्रतिबंधित संघटनेच्या हाफिज गुल बहादर गटाची दहशत आहे. १३ एप्रिल रोजी उत्तर वझिरीस्तानमधील शाम आणि मिराली खाडी भागात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यांमध्ये दोन जवान शहीद झाले होते. १३ एप्रिल रोजीच्या या हल्ल्याला पाकिस्तानी लष्कराने अधिकृतपणे दुजोरा दिला होता.