Russia-Ukraine War : 24 तासांत खार्कोव्हवर 66 हल्ले | पुढारी

Russia-Ukraine War : 24 तासांत खार्कोव्हवर 66 हल्ले

कीव्ह/मॉस्को ; वृत्तसंस्था : रशिया-युक्रेन युद्धाला (Russia-Ukraine War) आता 45 दिवस झाले असून रशियाकडून युक्रेनवरील हल्ले सुरूच आहेत. गेल्या 24 तासांत रशियन फौजांनी युक्रेनच्या खार्कोव्हमध्ये 66 वेळा हल्ले केले असून या हल्ल्यात एका बालकासह 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 14 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, युद्धात आतापर्यंत 183 बालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तसेच 342 बालके जखमी झाली आहेत.

दरम्यान, रशियन लष्कराची एक मोठी तुकडी इजूम शहर आणि नीपर नदीच्या आसपास पाहिली गेली आहे. याबाबतची उपग्रह छायाचित्रे अमेरिकन प्रसारमाध्यमांतून प्रसिद्धीस देण्यात आली आहेत. रशियाची ही तुकडी 12.8 किलोमीटर लांब आहे. इजूम शहराकडे ही तुकडी चाललेली दिसून येते.

जागतिक बँकेच्या अंदाजानुसार यावर्षी युक्रेनच्या अर्थव्यवस्थेत निम्मी घट होणार आहे. युक्रेनच्या अर्थव्यवस्थेला 45 टक्के नुकसान झाले आहे. तर रशियाच्या जीडीपीत 11.2 टक्के घट होण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत 45 लाख युक्रेनी नागरिकांना स्थलांतर केले आहे. यातील 25 लाख नागरिक पोलंडमध्ये गेले आहेत.

टेडी बीयरमध्ये बॉम्ब

रशियन फौजा आता युक्रेनमध्ये लहान मुलांच्या खेळण्यांचाही वापर बॉम्बस्फोटासाठी करत असल्याचा दावा केला जात आहे. टेडी बीयरमध्ये स्फोटके भरून स्फोट केले जात आहेत, असे कीव्हीमधील एका डॉक्टरने म्हटले आहे.

45 वा दिवस रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine War) 

* क्रामटोरस्क रेल्वे स्थानकावरील हल्ल्यातील मृतांचा आकडा 57 वर
* युद्धात आतापर्यंत 1793 नागरिकांचा मृत्यू, तर 2439 नागरिक जखमी
* बश्तांका येथे युक्रेनने रशियाच्या क्रुझ क्षेपणास्त्रे असलेल्या ट्रकवर हल्ला केला
* न्यूझीलंड 50 सैनिकांसह सी-130 हर्क्युलस विमान युक्रेनला पाठवणार

Back to top button