Putin's daughters : अमेरिकेचा पुतीन यांना माेठा झटका, थेट मुलींवरच लादले निर्बंध | पुढारी

Putin's daughters : अमेरिकेचा पुतीन यांना माेठा झटका, थेट मुलींवरच लादले निर्बंध

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अमेरिकेने आता रशियाचे अध्‍यक्ष पुतीन यांच्‍याविराेधात कठोर भूमिका घेतली आहे. पुतीन यांच्‍या मुलींचे वास्‍तव्‍य कोठेही असले तरी त्‍यांना अमेरिकेत कोणतेही आर्थिक व्‍यवहार करता येणार नाहीत, असे ज्‍यो बायडेन सरकारने स्‍पष्‍ट केले आहे. दरम्‍यान, युक्रेनवर हल्‍ला केल्‍याने रशियाला संयुक्‍त राष्‍ट्र मानवाधिकार परिषदेतून निलंबित करण्‍याच्‍या प्रस्‍तावावर संयुक्‍त राष्‍ट्र महासभेत आज मतदान होणार आहे.

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध ४३ दिवसांनंतरही सुरु आहे. दोन्‍ही देश आपल्‍या भूमिकेवर ठाम आहेत. रशियाने मैरियूपोल शहर उद्‍ध्‍वस्‍त केले आहे. शहारातील पाच हजार नागरिकांचा मृत्‍यू झाला आहे, असा दावा मैरियूपाेलचे महापौर वाडियम बोयचेंको यांनी केला आहे. मृतांमध्‍ये २१० मुलांचा समावेश आहे.

Putin’s daughters : आर्थिक व्‍यवहार करण्‍यास प्रतिबंध

अमेरिकेने रशियावर अनेक निर्बंध लादले आहेतच. आता रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष व्‍लादिमीर पुतीन यांच्‍या मारिया फासेन आणि कॅटरिना टिखोनोवा या दोन मुलींवर प्रतिबंध लावण्‍यात आले आहेत. वृत्तसंस्‍था ‘एएनआय’ने दिलेल्‍या माहितीनुसार, यापुढे पुतीन यांच्‍या दोन्‍ही मुलींना अमेरिकेतील कोणताही आर्थिक व्‍यवहार करता येणार नाही. अमेरिकेतील सर्व बँकांमधील त्‍यांचे आर्थिक व्‍यवहार करण्‍यास बंदी घालण्‍यात आली आहे. युक्रेनमधील बुचा शहरातील नागरिकांवर केलेल्‍या अत्‍याचारामुळे रशियाला किंमत मोजावी लागेल, असा इशारा अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष ज्‍यो बायडेन यांनी ट्‍टिवरच्‍या माध्‍यमातून दिला आहे.

इंग्‍लंडनेही रशियावर लादले कठोर प्रतिबंध

इंग्‍लंडनेही रशियावर कठोर प्रतिबंध लादले आहेत. आता यापुढे रशियातील सर्व गुंतवणूक थांबविण्‍याचा निर्णय इंग्‍लंडने घेतला आहे. युक्रेनमधील शहर बुचा येथे रशियाच्‍या सैनिकांनी केलेल्‍या कृत्‍य हे नरसंहारच आहे, असे इंग्‍लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्‍सन यांनी म्‍हटलं आहे.

हेही वाचा :

 

Back to top button