नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यानंतर अमेरिकेसह मित्रराष्ट्रांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. रशियाकडून होणारी कच्च्या तेलाची खरेदीही थांबवण्यात आली. रशियाने भारताला स्वस्त दरात कच्चे तेल देऊ केले आहे. अमेरिकेने त्यावर भारताला इशारा दिला आहे.
त्यामुळे भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करतो की नाही, यावर अनेक तर्कवितर्क लावले जात होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला असून, रशियाकडून स्वस्त दरात कच्चे तेल खरेदी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
निर्मला सीतारामन म्हणाल्या, माझ्यासाठी देशाची ऊर्जा सुरक्षा पहिल्या प्राधान्यावर आहे. जर सवलतीच्या दरात इंधन मिळत असेल तर आम्ही ते खरेदी करायलाच हवे. आम्ही रशियाकडून इंधन खरेदीला सुरुवात केली आहे. आम्हाला भरपूर प्रमाणात बॅरल रशियाकडून उपलब्ध झाले आहेत. रशियाकडून आतापर्यंत 3 ते 4 दिवस पुरेल इतका पुरवठा भारताला झालाही आहे. ही खरेदी पुढेही सुरूच राहील, असेही निर्मला सीतारामन यांनी नमूद केले.
अर्थात भारताकडून होणार्या इंधन खरेदीतील केवळ 1 टक्का पुरवठा रशियाकडून होत आहे, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी याआधी सांगितले होते. रशियाच्या तेलाचे आणि नैसर्गिक वायूचे मुख्य ग्राहक युरोपीय देशच आहेत. जेव्हा बाजारात इंधनाच्या किमती वाढतात तेव्हा इतर देशांना बाजारात स्वस्त इंधन कुठे मिळते, हे पाहून आपल्या लोकांच्या हिताचा निर्णय घ्यावा लागतो, असेही जयशंकर म्हणाले होते.