इम्रान खान म्हणाले, शेवटच्या चेंडूपर्यंत खेळणार; राजीनामा देणार नाहीच | पुढारी

इम्रान खान म्हणाले, शेवटच्या चेंडूपर्यंत खेळणार; राजीनामा देणार नाहीच

इस्लामाबाद ; वृत्तसंस्था : पाकिस्तानचा पंतप्रधान म्हणून मी कुणापुढे झुकणार नाही आणि पाकिस्तानलाही झुकू देणार नाही, असे भावनिक वक्तव्य करीत पंतप्रधान इम्रान खान यांनी मी शेवटच्या चेंडूपर्यंत खेळेन; पण राजीनामा देणार नाही, असा निर्धार बोलून दाखवला.

इम्रान खान यांचे भाषण बुधवारी होणार होते. मात्र, त्यांनी ते टाळून गुरुवारी केले. तेही नियोजित वेळेपेक्षा एक तास उशिराने. त्यांनी अविश्वास ठरावावर चर्चा अपेक्षित असताना ऐनवेळी संसद अधिवेशन स्थगित केल्याच्या मुद्द्यावर इम्रान यांनी भाष्य करणे मात्र टाळले.ते म्हणाले, माझ्या राजीनाम्यासंदर्भात बाहेरील देशांकडून दबाव आणला जात आहे. अमेरिकेचे 8 मार्चला सिक्रेट लेटर येते. इम्रान खान पंतप्रधानपद सोडणार असतील, तर पाकिस्तानला माफ केले जाईल, असा उल्लेख त्यात आहे. इम्रान खान यांच्यावरील अविश्वास ठराव फेटाळला गेल्यास पाकिस्तानला बघून घेण्याची धमकीही त्यात दिली आहे.

अमेरिकेने आम्हाला काय दिले?

आम्ही सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदा परराष्ट्र धोरणात बदल केला. क्रिकेटमुळे माझा सर्वाधिक काळ भारतात गेला. अमेरिका आणि इंग्लंडला मी कधी विरोध केला नाही. 9/11 च्या हल्ल्यात कोणताही पाकिस्तानी सहभागी नव्हता. माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या चुकीमुळे आम्ही अमेरिकेच्या जवळ गेलो आणि रशियाचा विरोध ओढवून घेतला. सोव्हिएत युनियनच्या पाडावानंतर दोन वर्षांतच अमेरिकेने आपल्यावर बंधने लादली. अमेरिकेच्या जवळ जाऊन आम्हाला काय मिळाले, नाटोने काय केल?े तर आमचे 80 हजार लोक मारले गेले, असे इम्रान खान यांनी सांगितले.

शरीफ यांनी मोदींची नेपाळमध्ये भेट घेतली होती

इम्रान खान म्हणाले, माझे कोणत्याही देशाशी शत्रुत्व नाही. पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काठमांडूमध्ये नरेंद्र मोदी यांची गुप्त भेट घेतली होती, असा उल्लेख बरखा दत्तने आपल्या पुस्तकात केला आहे. मोदींनी जनरल राहील शरीफ यांचा उल्लेख दहशतवादी, असा केला होता. हेच मोदी शरीफ यांच्या घरातील लग्नसमारंभासाठी आले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Back to top button