इस्लामाबाद ; वृत्तसंस्था : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार अल्पमतात आलेले आहे. इम्रान यांच्या पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्षाला चौधरी आसिम नाजीर आणि मोहम्मद अस्लम भुटानी यांनी मंगळवारी 'खुदा हाफिज' ठोकल्यानंतर बुधवारी एक मोठा हादरा खान सरकारला बसला. इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्षाच्या (पीटीआय) सरकारला असलेला पाठिंबा मागे घेत असल्याचे मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट पाकिस्तान (एमक्यूएम-पी) या पक्षाने बुधवारी पत्रकार परिषदेत अधिकृतपणे जाहीर केले. त्यामुळे इम्रान खान यांचे सरकार अल्पमतात आले असून, इम्रान खान कधीही क्लीन बोल्ड होण्याची शक्यता बळावली आहे.
विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेनंतर इम्रान खान बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता देशाला उद्देशून भाषण करणार होते; मात्र ऐनवेळी ते रद्द करण्यात आले. पाक लष्कर व 'आयएसआय'प्रमुखांच्या दबावाखाली खान यांच्यावर आपले भाषण रद्द करण्याची वेळ ओढवल्याचे मानले जाते.
इम्रान खान बुधवारीच पंतप्रधानपदाचा राजीनामा देतील, असा दावा पाकिस्तानातील प्रसारमाध्यमे करीत होती आणि इम्रान खान सरकार सातत्याने हा दावा फेटाळून लावत होते. या सार्या गोंधळातच लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा आणि 'आयएसआय'चे (पाकिस्तानी गुप्तचर संघटना) महासंचालक नदीम अंजूम यांनी इम्रान यांची दुपारी भेट घेतली. यानंतर पाकच्या राजकारणाने जणू वळण घेतले आणि नरमलेल्या इम्रान यांनी आपले नियोजित भाषण रद्द केले.
खान-बाजवा-अंजूम भेटीपूर्वी सर्व विरोधी पक्षांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद बोलावली होती. मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट पाकिस्तान पक्षाने इम्रान यांच्याशी युती तोडत असल्याची अधिकृत घोषणा या परिषदेतच केली. 'जमियत-ए-उलेमा-ए-इस्लाम' (फझल) पक्षाचे नेते मौलाना फजलूर रहमान, पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज) पक्षाचे अध्यक्ष शाहबाज शरीफ, मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट पाकिस्तान पक्षाचे संयोजक खालिद मकबूल सिद्दिकी, पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी आणि बलुचिस्तान नॅशनल पार्टीचे (मेंघाल) प्रमुख अख्तर मेंघाल यावेळी उपस्थित होते. इम्रान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावार गुरुवारी दुपारी 4 पासून चर्चा सुरू होणार आहे. अविश्वास प्रस्तावावर 3/4 एप्रिलला मतदान शक्य आहे.
इम्रान यांच्याकडे आता 164 खासदार शिल्लक
मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट पाकिस्तान पक्षाकडे 7 खासदार आहेत. या पक्षाने इम्रान यांची साथ सोडल्यानंतर इम्रान यांच्याकडे 164 खासदार उरले आहेत. (मतदानात) मोठ्या प्रमाणावर बंडखोरी ठरलेली आहे. विरोधी पक्षांच्या आघाडीच्या तंबूत रीतसर 177 खासदार आहेत.
इम्रान यांचा 'बाऊन्सर' ठरला 'वाईड बॉल'
* इम्रान हे शेवटच्या चेंडूपर्यंत हिंमत न हरणारे खेळाडू आहेत, ते राजीनामा देणार नाहीत, असे मंत्री फवाद चौधरी म्हणाले.
* पाक सरकार खिळखिळे करण्यामागे अमेरिकेचा हात असेल तर आपण पाकच्या सोबत उभे राहू, असे चीनने स्पष्ट केले.
* इम्रान यांनी आपल्याकडे एक गोपनिय पत्र असल्याची धमकी विरोधकांना दिलेली आहे. खान हे 'सिक्रेट लेटर' माध्यमांना पुरवतील, अशी शक्यता आहे.
* इम्रान यांनी त्यांचा सहयोगी पक्ष असलेल्या मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट पाकिस्तान पक्षाला पंजाब प्रांताचे मुख्यमंत्रिपदही बहाल केले होते. इम्रान यांची ही खेळी 'बाऊन्सर' मानली जात होती, मात्र ऐनवेळी तो 'वाईड बॉल' ठरला. मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंटने खान यांना दगा दिला तो दिलाच!