

कीव्ह; वृत्तसंस्था युक्रेनला : 'यू जिंकू' या अतिरेकी आत्मविश्वासासह लुहान्स्क आणि डोनेट्स्क या युक्रेनच्या (russia-ukraine war) शहरांत रशियन लष्कर शिरले होते. आता युद्धाला महिना उलटला आहे आणि युक्रेनच्या बहुतांश शहरांतून रशियन फौजा दाखल आहेत, याउपर देश म्हणून युक्रेनही पडलेला नाही आणि राजधानी कीव्हही रशियन लष्कराला ताब्यात घेता आलेली नाही. युक्रेनमधील रशियन मूळ असलेले रहिवासी एकजात आपल्या बाजूने उभे राहतील, हा फाजील आत्मविश्वासही रशियाला भोवला. दुसरीकडे, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दिमीर झेलेन्स्की यांचा 'झुकेगा नहीं' हा अगदी सुरुवातीपासूनचा पवित्रा युक्रेनच्या नागरिकांना प्रेरक ठरला, 'बूस्टर' ठरला! युक्रेनमधील पुरुषांसह महिलाशक्तीही रशियन लष्कराविरुद्ध रस्त्यावर उतरली. युद्धासाठी आवश्यक असलेले 'मनोबल' या लहानशा देशात फार मोठे होते… आणि त्याला 'सोने पे सुहागा' म्हणून अमेरिकेकडून, जर्मनीकडून शस्त्रबलही उपलब्ध झाले…
1. लष्करावरील अल्प खर्च (russia-ukraine war)
रशियाकडे शस्त्रसाठा व अण्वस्त्रसाठा मोठ्या प्रमाणावर असला, तरी लष्करावर होणारा रशियाचा खर्च हा अमेरिका, चीन तसेच भारताच्या तुलनेत फारच कमी आहे. लष्करात आपण 'बन चुके' आहोत, या ओव्हर कॉन्फिडन्सनेही रशियाचा घात केला. जमिनीवरील युद्धात कामी येणार्या लष्करी सामग्रीचे अद्ययावतीकरण न करणे, रशियाला या युद्धात महाग पडले आहे.
2. हवाई युद्धातही सरशी नाहीच (russia-ukraine war)
रशियाला हवाई युद्धातही वर्चस्व सिद्ध करता आलेले नाही. रशियाची अनेक युद्धविमाने पाडण्यात युक्रेनला यश आले. खरे पाहता, रशियानेही या युद्धात हवाईदलाचा वापर तसा कमीच केला. रशियाने ताकदीच्या सुखोई-30, सुखोई-35 आणि सुखोई-34 वर कोट्यवधी डॉलर खर्ची घातले आहेत; पण या किरकोळ युद्धात ही शक्ती का म्हणून वापरावी, हा रशियाचा विचारही त्यामागे आहे.
3. परिपूर्ण सैनिक प्रशिक्षणाचा अभाव (russia-ukraine war)
रशियन लष्करातील बहुतांश सैनिकांना आपण काय करणार आहोत, कशासाठी करणार आहोत, याची काहीही कल्पना देण्यात आलेली नव्हती. ऐनवेळी त्यांना युक्रेनमध्ये शिरण्याचे आदेश देण्यात आले. रशियन सैनिक दीर्घकाळ युद्धासाठी मानसिक द़ृष्टीने तयार नव्हते. सामरिक तज्ज्ञांच्या मते, अफगाणिस्तानातही दिवसागणीक इतके रशियन सैनिक मारले जात नव्हते, जितके युक्रेनमध्ये मारले जात आहेत.
4. रशियाची कमकुवत पुरवठा यंत्रणा
रशियाची पुरवठा यंत्रणा कमकुवत ठरली. युक्रेनने या यंत्रणेला सहज लक्ष्य केले. इंधनपुरवठा करणारी जहाजे, अन्य वाहने वाटेतच उडवून दिली. रशियाकडून युक्रेनमधील सैनिकांसाठी होणारा अंतर्गत पुरवठाही युक्रेनियन सैनिकांनी, नागरिकांनी थोपविला.
5. अमेरिका, जर्मनीकडून लष्करी साहाय्य
अमेरिका, जर्मनी, ब्रिटनसारख्या देशांनी युक्रेनच्या बाजूने रशियाविरुद्ध प्रत्यक्ष युद्धात आपले सैनिक उतरविलेले नसले, तरी युक्रेनला जाणीवपूर्वक (म्हणजे जेव्हा ज्या शस्त्रांची गरज असेल तेव्हा ती शस्त्रे पुरविणे) शस्त्रे पुरविली. जेवेलीन आणि स्टिंगर क्षेपणास्त्रे मोठ्या प्रमाणावर दिली. युक्रेनियन जवानांनी रशियाविरुद्ध ती प्रभावीपणे वापरून अनेक हल्ले परतावून लावले.