व्लादिमीर पुतीन लवकरच पायउतार होणार! जो बायडेन यांचा दावा | पुढारी

व्लादिमीर पुतीन लवकरच पायउतार होणार! जो बायडेन यांचा दावा

कीव्ह/मास्को ; वृत्तसंस्था : रशिया-युक्रेन युद्धादरम्यान पोलंड दौर्‍यावर असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची झोप उडविणारा दावा केला आहे. पुतीन हे राष्ट्राध्यक्षपदावरून लवकरच पायउतार होतील, असे त्यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले की, रशियाने स्वत:च युद्धाचा पर्याय निवडला आहे. आता हे युद्ध एक दिवसात वा एक-दोन महिन्यांत संपून जाईल, असेही नाही. युद्धात दोन्ही पक्षांची हानी होते. रशियाने युद्धाची नुसतीच निवड केलेली नाही, तर युक्रेनियन जनतेवर हे युद्ध लादले आहे.

बायडेन यांच्या या वक्‍तव्यावर रशियाने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. रशियन राष्ट्राध्यक्षांच्या ‘क्रेमलिन’ या कार्यालयाचे प्रवक्‍ता दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले की, पुतीन रशियामध्ये किती काळ सत्तेत राहतील, हे ठरवणारे बायडेन कोण लागून गेले! पुतीन यांना रशियन जनतेने या पदावर बसविले आहे. तिकडे, अमेरिकेतील ‘व्हाईट हाऊस’कडूनही बायडेन यांच्या या वक्‍तव्यावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. बायडेन यांच्या वक्‍तव्याचा अर्थ पुतीन यांना हटविण्याचे आवाहन करणे, असा कदापि नव्हता, असे या स्पष्टीकरणात म्हटले आहे.

युक्रेनच्या मंत्र्यांचीबायडेन यांच्यासोबत खलबते

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनच्या परराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांची पोलंडमधील वॉर्सा शहरातील मेरियट हॉटेलमध्ये भेट घेतली. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर युक्रेनच्या उच्चपदस्थांशी बायडेन यांची ही पहिलीच भेट होती.

सभागृहावरील हवाई हल्ल्यात 300 नागरिक ठार

युक्रेनच्या मारियापोल शहरातील एका सभागृहावर रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात 300 नागरिक ठार झाल्याचे तसेच निष्पाप नागरिकांवरील रशियन लष्कराचा हा आजवरचा सर्वात क्रूर हल्ला असल्याचे युक्रेनतर्फे सांगण्यात आले.

रशियन लष्कराकडून आपल्याच कर्नलचा खात्मा

युद्धादरम्यान रशियन लष्कराने आपलेच कर्नल यकोव्ह रेजानस्टेव्ह यांना ठार केले. यकोव्ह हे 49 व्या संयुक्‍त शस्त्र सैन्यात कमांडर होते. रशियाचे आजवर 7 जनरल स्तरीय अधिकारी या युद्धात मारले गेले आहेत.

Back to top button