Russia-Ukraine war : रशियाकडून समुद्रात अण्वस्त्रसज्ज पाणबुड्या | पुढारी

Russia-Ukraine war : रशियाकडून समुद्रात अण्वस्त्रसज्ज पाणबुड्या

कीव्ह/मॉस्को ; वृत्तसंस्था : रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia-Ukraine war) 31 व्या दिवशी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी उत्तर अटलांटिक महासागरात अण्वस्त्रसज्ज पाणबुड्यात उतरविल्या आहेत. या पाणबुड्या 16 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहेत.

पुतीन यांनी आधीच ‘न्युक्‍लिअर डिटरंट’ पथकाला सज्ज राहण्याचे आदेश देऊन ठेवलेले आहेत. महिना उलटल्यानंतर युद्ध दाहकतेकडून संहारकतेकडे जात असल्याचेच हे संकेत आहेत.

काळ्या समुद्रातही रशियाने 4 क्रूझ क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. प्रायोगिक तत्त्वावर युक्रेनच्या लष्करी ठाण्यांवर या क्षेपणास्त्रांचा माराही केला. थोडक्यात, युक्रेन झुकला नाही तर ही क्षेपणास्त्रे अधिक संहारक बॉम्बसह हल्ला करतील, असा इशाराच रशियाच्या या हल्ल्यांनी दिला आहे. तिकडे, जर्मनीहून 1 हजार 500 स्ट्रेला अँटी-एअरक्राफ्ट क्षेपणास्त्रे आणि 100 एमजी 3 मशिनगन्सची पहिली खेप युक्रेनमध्ये दाखल झाली आहे.

रशियन लष्करी मोहिमेचा पहिला टप्पा पार पाडल्यानंतर आता हे लष्कर पूर्व डोनबास परिसरावर लक्ष्य केंद्रित करणार आहे. डोनबासमध्ये अंतर्गत विघटनवादी युक्रेन सरकारविरोधात वर्षानुवर्षे लढत आहेत. डोनबासमधील डोनेट्स्क आणि लुहान्स्क या भागांना रशियाने आधीच स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिलेली आहे. (Russia-Ukraine war)

Back to top button