व्लादिमीर पुतीन यांचे अणुयुद्ध सरावाचे आदेश

व्लादिमीर पुतीन यांचे अणुयुद्ध सरावाचे आदेश

कीव्ह/मॉस्को ; वृत्तसंस्था : रशिया-युक्रेन युद्ध आता अणुयुद्धाच्या दिशेने पुढे सरकेल, अशी शक्यता गडद बनली आहे. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आपल्या लष्कराला 'न्यूक्‍लीअर वॉर ड्रिल' (अणुयुद्धाच्या सराव) सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. सुरक्षिततेच्या द‍ृष्टीने स्वत:चे कुटुंबही पुतीन यांनी सायबेरियाला हलविले आहे.

रशियाने युक्रेनवर परवा परवा पहिल्यांदाच 'किन्झल' हायपरसोनिक क्षेपणास्त्र हल्ला केला. हे क्षेपणास्त्र पारंपरिक तसेच अणू असा दोन्ही प्रकारचा हल्ला करण्यास सक्षम आहे. दोन हजार कि.मी. मारक क्षमता असलेले 'किन्झल' अणुबॉम्बही टाकू शकते. किन्झलने हल्ला करून आता पुढची पायरी काय असेल, त्याचे पूर्वसंकेतच रशियाने दिलेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दिमीर झेलेन्स्की रशियाच्या संपूर्ण अटी-शर्ती मान्य करायला अद्यापही तयार झालेले नाहीत.

जमिनीवरील युद्धाला आता महिना होत आला आहे. दोन-तीन दिवसांत युक्रेनला आपण गुडघ्यावर यायला भाग पाडू, हा आत्मविश्‍वास फोल ठरल्याचे शल्य पुतीन यांना बोचते आहे. दीर्घ लढ्याअंतीही जपान शरण येत नव्हता, तेव्हा अमेरिकेने अखेर नागासाकी व हिरोेशिमावर अणुबॉम्ब टाकण्याचा पर्याय निवडला होता, हे येथे उल्लेखनीय!

पुतीन यांचे अधिकारीही अचंबित

अणुयुद्धाच्या सरावाचे आदेश मिळाल्याने 'क्रेमलीन'मधील (रशियन राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय) अधिकारीही अचंबित आहेत. व्लादिमीर पुतीन यांच्या या निर्णयाचा परिणाम भयावह ठरू शकतो, असे त्यांनाही वाटते आहे. पुतीन स्वत: या युद्धसरावात सहभागी होणार आहेत, हे विशेष! पुतीन यांनी आपल्या कुटुंबाची निवास व्यवस्था सायबेरियातील एका 'हायटेक अंडरग्राऊंड बंकर'मध्ये केली आहे, हे आणखी विशेष!!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news