Russia Ukraine War : खारकीव्हमध्ये रशियाच्या गोळीबारात ५०० मृत्यू

Russia Ukraine War : खारकीव्हमध्ये रशियाच्या गोळीबारात ५०० मृत्यू

कीव्ह/मॉस्को ; वृत्तसंस्था : रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia Ukraine War) 21 व्या दिवशी रशियाने खारकीव्ह येथे केलेल्या गोळीबारात 500 नागरिक मारले गेल्याचे वृत्त आहे. शहरातील इमर्जन्सी सर्व्हिसेस एजन्सीने ही आकडेवारी दिली आहे. दरम्यान, रशियाला प्रतिकार करण्यासाठी युक्रेनला 800 मिलियन डॉलरची (6204 कोटी रुपये) लष्करी मदत अमेरिका देणार आहे, अशी घोषणा राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केली आहे.

दरम्यान, झेलेन्स्की यांनी कराराचे संकेत दिले असून अमेरिकेच्या नेतृत्वाखालील 'नाटो'चे सदस्यत्व युक्रेनला मिळणार नाही, हे देशवासीयांनी आता हे स्वीकार करावे, असे म्हटले आहे. अमेरिकेत सिनेटने पुतीन यांच्या विरोधात वॉर क्राईमच्या चौकशीबाबतचा प्रस्ताव मंजूर केला आहे. रशियाची एक यॉट नॉर्वेच्या उत्तर भागात अडकली होती.

तथापि, निर्बंधांमुळे स्थानिक तेलपुरवठादारांनी या यॉटला इंधन देण्यास नकार दिला. दरम्यान, कॅनडाने आणखी 15 रशियन अधिकार्‍यांवर निर्बंध लादले आहेत. आतापर्यंत कॅनडाने 500 रशियन नागरिकांवर निर्बंध लादले आहेत. ब्रिटनने रशियाच्या 370 उच्च पदस्थांवर निर्बंध लादले आहेत.

अमेरिकेच्या 13 नेत्यांवर निर्बंध (Russia Ukraine War)

रशियाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यासह 13 नेत्यांवर रशियात निर्बंध लादले आहेत. या नेत्यांमध्ये अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन, संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन आणि माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिटंन यांचाही समावेश आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन हे बुसेल्स येथे युरोपीय महासंघ आणि 'नाटो' अधिकार्‍यांसोबत बैठक घेणार आहेत.

अमेरिकेची आत्ताच खरी गरज आहे! (Russia Ukraine War)

अमेरिकेतील सिनेटला आवाहन करताना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदीमीर झेलेन्स्की म्हणाले की, आम्हाला तुमची आत्ताच खरी गरज आहे. तुम्ही आत्ता करत आहात, त्यापेक्षा जास्त करण्याची गरज आहे. रशियाला यापेक्षा मोठा आर्थिक फटका बसला पाहिजे. तुम्चया उत्पन्नापेक्षा शांतता महत्वाची आहे.

मारियुपोल येथे रुग्णालयात 400 ओलिस

रशियाने मारियुपोल येथील सर्वात मोठ्या रुग्णालयावर ताबा मिळवला असून डॉक्टर आणि रुग्ण अशा 400 जणांना ओलिस ठेवले आहे, अशी माहिती उपमहापौरांनी दिली आहे. या लोकांना बाहेर येऊ दिले जात नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news