

मॉस्को ; वृत्तसंस्था : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या निर्दयतेचा आणखी एक पुरावा समोर आला आहे. रशियात पुतीन सरकारच्या युक्रेन युद्धाला विरोध करणारा प्रत्येक आवाज दाबला जात आहे. यातून लहानग्यांचीही सुटका झालेली नाही. युद्ध नको, अशी मागणी करत निदर्शने करणार्या मुलांनाही तुरुंगात टाकले गेले आहे.
रशियातील 7 ते 11 वयोगटातील लहान मुलांनी रशियातील युक्रेन दूतावासाबाहेर या युद्धाचा निषेध केला. स्वतःच्या मातांसोबत ही मुले येथे आली होती. त्यांनी हातात 'नो टू वॉर' अशा घोषणा लिहिलेली पोस्टर्स घेतली होती. तसेच युक्रेनच्या ध्वजातील रंगांचे पोशाख त्यांनी परिधान केले होते. त्यांनी दूतावासाबाहेर फुले ठेवली. इतक्यात पोलिसांच्या गाड्या आल्या. व्लादिमीर पुतीन सरकारने या लहान मुलांना कोणतीही दयामाया न दाखविता अटक करून पोलिस व्हॅनमधून पोलिस ठाण्यात आणले. तसेच त्यांना तुरुगातही डांबले.
पोलिसांनी दोन मातांसह पाच मुलांना अटक केली आहे. यात 7 वर्षीय सोफिया आणि डेव्हिड, 9 वर्षांचा मॅटवे आणि 11 वर्षीय गोशा आणि लिझा यांचा समावेश आहे. त्यांना रात्रभर तुरुंगात ठेवले जाणार होते; पण काही काळाने सोडून दिले गेले. या मुलांवर न्यायालयात खटला चालणार असून, दंडही ठोठावला जाणार आहे.
या घटनेचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. यात ही मुले पोलिसांना पाहून रडताना दिसतात. तुरुंगातील एका फोटोमध्ये एका मुलीच्या हातात 'नो वॉर'चा फलक दिसतो. काही फोटोंमध्ये तुरुंगात रडणारी मुलेही दिसत आहेत. या बालकांच्या पालकांना पोलिसांकडून या मुलांच्या संगोपनाचा अधिकार गमवाल, अशी धमकी दिली जात आहे.