मॉस्को ; वृत्तसंस्था : रशिया- युक्रेन (Ukraine-Russia war) वादात चीन पूर्णपणे रशियाच्या बाजूने उभा आहे. अमेरिकेसह युरोपातील देशांनी रशियावर लागू केलेल्या आर्थिक निर्बंधांना आमच्या लेखी काहीही अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी नोंदविली आहे. अमेरिका आणि युरोपच्या अशा प्रतिक्रियेमुळे वाद मिटण्याऐवजी आणखी वाढणार आहे, असेही चीनने स्पष्ट केले आहे.
दरम्यान युक्रेनच्या दिल्लीतील राजदूतांनी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता मध्यस्थी करावी, असे आवाहन केले आहे. भारताने नेहमी खर्याची बाजू घेतली आहे. मोदींनी ही समस्या सोडविण्यात पुढाकार घ्यावा. आमच्या लोकांचे जीव वाचवावेत. मोदी यांचा जगभर दबदबा आहे. त्यांनी पुतीन यांच्याशी बोलावे, असे युक्रेनियन राजदूतांनी म्हटले आहे. भारत या क्षणापर्यंत तटस्थ असला तरी दोन्ही बाजूंना उद्देशून नवी दिल्लीने सामंजस्याचे आवाहन केले आहे.
सर्व ताब्यात : रशियन लष्कर (Ukraine-Russia war)
आम्हाला बघताच युक्रेनचे सैनिक मोक्याचे बंकर आणि तळ सोडून पळ काढत आहेत. जवळपास युक्रेनभर सर्वच आमच्या वर्चस्वाखाली आहे. काही लष्करी तळही रशियन सैनिकांनी बळकावले आहेत. आम्ही युक्रेनचे हवाई तळ आणि हवाई संरक्षण यंत्रणा संपूर्णपणे नेस्तनाबूत करून टाकलेली आहे, असा दावा रशियन लष्कराने म्हटले आहे.
झुकणार नाही : युक्रेनचे जेलेन्स्की
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दिमीर जेलेन्स्की यांनी 2 महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. पहिली – युक्रेन इथून पुढे रशियाशी कोणतेही राजनयिक संबंध ठेवणार नाही. दुसरी – युक्रेनियन नागरिकांनीही आता युद्धात सहभाग नोंदवावा. आम्ही झुकणार नाही, हे पुतीन यांना दाखवून द्यावे. सरकार नागरिकांना शस्त्रास्त्रे पुरवेल.
अमेरिका : राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले, रशियाविरुद्ध अवघ्या जगाने एकवटायला हवे. आम्ही जगाला असे उद्ध्वस्त होऊ देऊ शकत नाही. रशियाने चर्चेची दारे स्वत:च बंद केलेली आहेत. (Ukraine-Russia war)
युरोपियन संघ : युरोपियन संघ आयोगाच्या अध्यक्षा उर्सला वान डेर लिन यांनी पहिल्यांदाच रशियाला थेट धमकावले आहे. आता उत्तर देण्याची वेळ आली आहे. आम्ही रशियन अर्थव्यवस्था पुरती उलथवून लावू. मग लष्कराचे आधुनिकीकरण तर पुतीन यांच्यासाठी फार लांबची गोष्ट असेल, ते अन्नपाण्यासाठी तडफडतील, असे हाल आम्ही रशियाचे करू. युरोपातील रशियाच्या सर्व मालमत्ता, सर्व बँक खाती आम्ही फ्रीझ करत आहोत. ही सुरुवात आहे. बघा, आम्ही काय काय करतो ते, असे उर्सला यांनी म्हटले आहे.