पूर्व युरोपपासून उत्तर आशियापर्यंत पसरलेला जगातील सर्वात मोठा देश म्हणजे रशिया. तब्बल 1,71,25,191 चौरस किलोमीटरचा भूभाग म्हणजेच पृथ्वीवरील निवासासाठी योग्य भूप्रदेशाच्या आठव्या हिश्श्याचा भाग या देशाने व्यापलेला आहे. तब्बल सोळा सार्वभौम देशांशी रशियाची सीमा जुळलेली आहे. जगातील कोणत्याही देशाची सीमा इतक्या देशांशी जुळलेली नाही. (Russia-Ukraine)
145.5 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या या देशाची राजधानी मॉस्को ही युरोपमधील कोणत्याही शहरांच्या तुलनेत मोठी आहे. सेंट पीटर्सबर्ग हे रशियातील दुसर्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आणि सांस्कृतिक केंद्र. पूर्वेकडील स्लाव्ह वंशाच्या लोकांचे गट इसवी सन तिसर्या ते आठव्या शतकापर्यंत उदयास आले. नवव्या शतकात 'किव्हन रूस'ची या मध्ययुगीन राज्याची निर्मिती झाली. (Russia-Ukraine)
बायझेंटाईन साम्राज्याच्या काळापासून इसवी सन 988 मध्ये या राज्याने ऑर्थोडोक्स ख्रिश्चनिटीचा स्वीकार केला. कालौघात रूस साम्राज्याचे विघटन झाले आणि पंधराव्या शतकात मॉस्कोमधील राज्य (ग्रँड डची ऑफ मॉस्को) उदयास आले. 18 व्या शतकापर्यंत रशियाने युद्धे जिंकून आपला विस्तार वाढवला व इतिहासातील तिसर्या क्रमांकाचे सर्वात मोठे साम्राज्य तिथे निर्माण झाले.
झारशाहीची सुरुवात आणि पहिले महायुद्ध
इसवी सन 1547 मध्ये इवान चौथा हा रशियाचा 'पहिला झार' बनला व तिथे झारशाही सुरू झाली. इसवी सन 1914 मध्ये रशियाचा सहकारी देश असलेल्या सर्बियावरील ऑस्ट्रिया-हंगेरीच्या आक्रमणानंतर रशिया पहिल्या जागतिक महायुद्धात सहभागी झाला. त्यावेळी रशिया अनेक आघाड्यांवर लढला.
रशियन राज्यक्रांती, दुसरे महायुद्ध आणि…
इसवी सन 1917 मध्ये रशियन राज्यक्रांती झाली आणि निकोलस दुसरा या झारचा सहकुटुंब विनाश झाला. त्यानंतर राजेशाहीऐवजी विविध पक्षांच्या आघाडीचे तात्पुरते सरकार बनले व या सरकारने रशियाला प्रजासत्ताक देश घोषित केले. रशियन राज्यक्रांतीनंतर लेनीन यांच्या नेतृत्वाखाली रशिया जगातील पहिला साम्यवादी देश बनला. 'रशियन सोव्हिएत फेडरेटिव्ह सोशॅलिस्ट रिपब्लिक' प्रबळ बनले आणि 30 डिसेंबर 1922 मध्ये सोव्हिएत संघाची स्थापना झाली. 1930 च्या दशकात रशियाने स्टॅलिनच्या रूपात हुकूमशहाही पाहिला.
दुसर्या महायुद्धानंतर अमेरिकेशी शीतयुद्ध
दुसर्या महायुद्धाच्या काळात जर्मनीविरुद्धच्या लढ्यामधील आघाडीच्या विजयामध्ये रशियाने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतरच्या काळात एक जागतिक महासत्ता म्हणून रशियाचा उदय झाला आणि दुसरी महासत्ता असलेल्या अमेरिकेशी शीतयुद्ध सुरू झाले. विसाव्या शतकात रशियाने केलेली विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगती जगाने अवाक होऊन पाहिली. 1991 मध्ये सोव्हिएत संघाचे विघटन झाले आणि नव्याने स्वतंत्र झालेल्या 'रशियन एसएफएसआर'चे 'रशियन फेडरेशन' असे नामांतर झाले. 1993 मधील घटनात्मक वादानंतर नवी घटना स्वीकारण्यात आली आणि त्यावेळेपासून रशियामध्ये फेडरल सेमी-प्रेसिडेन्शियल प्रजासत्ताक आहे. सन 2000 पासून व्लादीमीर पुतीन यांचे रशियातील राजकीय क्षेत्रात वर्चस्व निर्माण झाले.
युक्रेन –आकाराने मोठा; पण विकसनशील देश
हा युरोपमधील रशियानंतरचा सर्वात मोठा भूभाग असलेला दुसर्या क्रमांकाचा देश आहे. त्याच्या उत्तरेस बेलारुस तर पश्चिमेस पोलंड, स्लोव्हाकिया आणि हंगेरी हे देश आहेत. दक्षिणेकडे रोमानिया आणि मोल्दोवा हे देश असून अझोव्ह समुद्र आणि काळ्या समुद्राची किनारपट्टी या देशाला लाभलेली आहे. एकूण 6,03,628 चौरस किलोमीटर भूभागाचा हा देश आहे. 41.2 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर कीव हे आहे. मध्ययुगामध्ये पूर्व स्लाव्हिक संस्कृतीचे युक्रेन मुख्य केंद्र होते. मंगोल आक्रमणांनंतर या भागावर अनेक राजवटी येऊन गेल्या. मात्र, त्याचा भूभाग प्रामुख्याने पोलंड आणि रशियामध्ये विभागला गेला.
युक्रेनचे स्वतंत्र अस्तित्व (Russia-Ukraine)
रशियन राज्यक्रांतीनंतर तिथे स्वतंत्र अस्तित्वासाठी संघर्ष सुरू झाला आणि 23 जून 1917 मध्ये 'युक्रेनियन पिपल्स रिपब्लिक'ची स्थापना झाली. 1922 मध्ये युक्रेनियन एसएसआर हे 'सोव्हिएत संघा'चे संस्थापक सदस्य बनले. 1991 मध्ये सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर या देशाला पुन्हा स्वतंत्र अस्तित्व मिळाले.