मानवी हृदयातील पेशीपासून बनविले मासे! | पुढारी

मानवी हृदयातील पेशीपासून बनविले मासे!

न्यूयॉर्क ; वृत्तसंस्था : यंत्र (मशिन) आणि मानवी पेशीतील समन्वयातून बायो हायब्रीड रोबोट तयार करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या दिशेने वैज्ञानिकांना मोठे यश आले आहे. मानवी हृदयातील पेशींचा वापर करून रोबोटिक मासे बनविण्याचा हॉर्वर्ड विद्यापीठातील प्रयोग यशस्वी झाला आहे.

विद्यापीठातील शास्त्रज्ञ किट पार्कर आणि त्यांच्या चमूने ही किमया केली आहे. कागद, प्लास्टिक, जिलेटिन आणि हृदयातील पेशींच्या दोन पट्ट्यांच्या (स्ट्रिप्स) मदतीने मासळीची आकृती बनविण्यात आली. एका पट्टीचे स्नायू आकुंचन पावताच दुसरी पट्टी प्रसरण पावत होती आणि यातून मासा अगदी सहजपणे द्रव पदार्थात पोहू शकत होता.

मासे अत्यंत लयबद्ध पद्धतीने पोहत होते, असे पार्कर यांनी सांगितले. द्रव पदार्थात काही पोषण तत्त्व मिसळण्यात आले होते. मासे किती दिवस जिवंत राहतील, याबद्दल शास्त्रज्ञांना निश्चित असा भरवसा नव्हता. शास्त्रज्ञांनी इन्क्युबेटरही बंद केले. नंतर तीन महिन्यांनी जेव्हा इन्क्युबेटर उघडले तेव्हा मासे मस्त पोहत होते, असे त्यांच्या निदर्शनाला आले. मासे आणखी काही दिवस जिवंत राहू शकले असते, अशी रुखरुख या शास्त्रज्ञांना अजूनही आहे.

या प्रयोगातून, कृत्रिम हार्ट टिश्यू (हृदय उती) तयार केल्या जाऊ शकतात, हा महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढण्यात आला आहे. जन्मानंतर बालकाच्या हृदयात जेवढ्या संख्येने मांसपेशी असतात, त्या आयुष्यभर तेवढ्याच राहातात. कुठला आजार वा हृदयविकाराच्या झटक्यानंतर शरीर हृदयातील कमकुवत वा नष्ट झालेल्या मांसपेशी पूर्ववत करू शकत नाही. अशावेळी कृत्रिम हार्ट टिश्यू हे मानवाला वरदान ठरू शकते.

प्रयोगादरम्यान मासळीचे पोहणे खरे पाहता हृदयातील पेशींचे आकुंचन, प्रसरण होते. स्टेम सेल टेक्नोलॉजी कृत्रिम हार्ट टिश्यू बनविण्याच्या दिशेने परिणामकारक ठरली आहे, हे या प्रयोगाने सिद्ध झाले असून, ही बाब हृदयवैद्यकात क्रांती घडविणारी आहे.

Back to top button