अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग, एड्विन (बझ) ऑल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स
अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग, एड्विन (बझ) ऑल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स

अपोलो ११ : तर आल्ड्रिन चंद्रावर उतरणारा पहिला मानव असता

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : २० जुलै १९६९ रोजी अमेरिकेचे अपोलो ११ हे अंतराळयान चंद्रावर उतरलं आणि हा ऐतिहासिक क्षण साऱ्या जगाने आपल्या टिव्हीवर बघितला. मानवाचे हे अवकाशारोहण जगातील दोन दशलक्ष लोकांनी टीव्हीद्वारे पाहून डोळ्यात साठवून ठेवले.

आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस अंतराळात उड्डाण करून इतिहास घडवणार आहेत. ते त्यांच्या वैयक्तिक रॉकेटसह अंतराळात झेप घेणार आहेत. २० जुलै (भारतीय तारीख २१) रोजी त्याचे प्रक्षेपण होणार आहे. टेक्सास येथून हा प्रवास सुरु होईल. अंतराळ उड्डाण इतिहासात २० जुलै ही तारीख सुवर्ण अक्षरांनी नोंदवली गेली आहे. अमेरिकेचे अपोलो-११ चंद्रापर्यंत पोहोचण्याचा हा वर्धापनदिन आहे.

बेझोस यांनी सोमवारी इन्स्टाग्रामवर सांगितले की, तो, त्यांचा भाऊ आणि एका लिलावाचा विजेता ब्लू ओरिजिनच्या "न्यू शेफर्ड" अंतराळ यानावर स्वार होतील.

१९६१ मध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची 'त्या' घोषणेने इतिहास रचला…

अवघे जग अमेरिका आणि रशिया या दोन महासत्तांमधील शीतयुद्धात विभागलेले होते, त्याकाळात शस्त्रास्त्र स्पर्धेला अक्षरश: ऊत आला होता. १९५७ मध्ये रशियाचा 'स्पुटनिक' हा उपग्रह जेव्हा अवकाशात टिक टिक करू लागला. पुढे १२ एप्रिल १९६१ रोजी रशियन अंतराळवीर युरी गागारिन यांनी 'वोस्टाक स्पेसक्राफ्ट' या अंतराळयानातून पृथ्वीच्या कक्षा ओलांडून विस्तीर्ण अवकाशात झेप घेतली आणि पहिला अंतराळवीर बनण्याचा मान पटकावला.

त्यानंतर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी लगोलग एक महत्त्वाची घोषणा केली. '१९७० पर्यंत माणसाला चंद्रावर पाठवणार' हीच ती भीष्मप्रतिज्ञा होती.

अमेरिकेचे अध्यक्ष केनेडी यांनी २५ मे १९६१ रोजी काँग्रेसपुढे एक भाषण केले होते. त्यात त्यांनी अमेरिका रशियाच्या तुलनेत तंत्रज्ञानामध्ये मागे पडत असल्याबाबत चिंता व्यक्त केली होती.

त्यांनी त्या वेळी त्या दशकाच्या अखेरीस अमेरिकी माणूस चंद्रावर उतरला पाहिजे असे जणू आव्हानच दिले होते. मानवाचे चंद्रावरील पहिले पाऊल, त्या स्पर्धेतूनच पडले. अन, २० जुलै १९६९ रोजी अमेरिकेचे 'अपोलो ११' हे यान चंद्रावर पोहोचले.

१६ जुलैची ती ऐतिहासिक अवकाश झेप….

अमेरिकेच्या फ्लोरिडातील केप कॅन्व्हेरल येथील हवाई दलाच्या तळावरून १६ जुलै १९६९ रोजी नील आर्मस्ट्राँग, एड्विन (बझ) ऑल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स या तीन अंतराळवीरांनी 'अपोलो-११' यानातून चंद्राकडे झेप घेतली.

तीन दिवसांनंतर, १९ जुलै रोजी चंद्राभोवतीच्या १०० कि.मी.च्या कक्षेत ठरल्याप्रमाणे यान भ्रमण करू लागले. आता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचे आव्हान होते.

२० जुलै रोजी (भारतीय वेळेनुसार २१ जुलै) चंद्राला दहावी परिक्रमा केल्यानंतर यानाचा चालक नील आर्मस्ट्रॉंगने आपोलो यानाचा (कोलंबिया) दरवाजा उघडला आणि एका बोगद्यातून ईगल या त्याला जोडलेल्या छोट्या यानात जाऊन पोहोचला.

त्याच्या आदल्या दिवशीही त्याने इगलमध्ये जाऊन तेथील सर्व यंत्रे योग्य काम करतात की नाही हे पाहिले होते. इगलचे पोटात घेतलेले पाय उघडतात की नाही याचीही त्याने चाचणी घेतली होती. कारण प्रत्यक्ष हेच यान चंद्रावर उतरणार होते. नीलनंतर एल्ड्रिन इगलमध्ये आला. तिसरा अंतराळवीर मायकल कॉलिन्स मात्र यानातच राहिला.

अधिक वाचा :

तिसरा अंतराळवीर कॉलिन्स हा कोलंबियामध्येच थांबून पृथ्वीप्रदक्षिणा करीत राहिला. दोन तास नऊ मिनिटांनी 'ईगल'चंद्रावरील 'सी ऑफ ट्रँक्विलिटी'या पूर्वनियोजित जागेवर अलगद उतरले तेव्हा अवघे २५ सेकंदांचे इंधन त्यात शिल्लक राहिले होते. म्हणजे चंद्रावर उतरायला त्यांना अर्ध्या मिनिटाचा उशीर झाला असता, तरी 'ईगल' चंद्रावर आदळून अंतराळवीरांचा अंत झाला असता.

दरम्यान, सायंकाळी साडेसहा ते रात्री अकरापर्यंत एल्ड्रिनने यानाची संपूर्ण चाचणी घेतली. अपोलोच्या साथीनेच चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत राहिले. अकरा वाजून सतरा मिनिटांनी इगल अपोलोपासून वेगळे झाले. हे यान वेगळे झाल्यानंतर आर्मस्ट्रॉंगने गरूडाला (इगल) पंख फुटले, असा संदेश पृथ्वीवर पाठविला. 'ईगल'चा दरवाजा उघडून शिडीच्या नऊ पायऱ्या उतरून नील आर्मस्ट्राँग चंद्राच्या भूमीवर उतरले.

पृथ्वीवासीय मानवाचे ते चंद्रावरचे पहिले पाऊल ठरले. आर्मस्ट्राँग यांचे उद्गार होते : 'माणसाचे एक छोटे पाऊल.. पण मानवजातीची एक प्रचंड झेप!' हे त्यांचे उद्गार अवकाश इतिहासात अजरामर झाले आहेत.

आर्मस्ट्राँग हे दोन तास ३२ मिनिटे, आणि आल्ड्रिन हे दोन तास १७ मिनिटे चंद्रावर होते. त्यांनी अमेरिकेचा ध्वज तिथे फडकावला. या काळात त्यांनी माती अन्य घटकांची चाचपणी केली.

त्यावेळी 'ह्यूस्टन, ट्रँक्विलिटी बेस हिअर, ईगल हॅज लॅन्डेड' हा चंद्रावरून आलेला संदेश जगभर दूरचित्रवाणी आणि रेडिओवरून दिला गेला आणि इतिहास घडला.

जवळजवळ ३० अब्ज डॉलर खर्च

अपोलोच्या एकूण अवकाश मोहिमेसाठी जवळजवळ ३० अब्ज डॉलर खर्च आला. चंद्राची वारी केलेल्या अंतराळवीरांनी सुमारे ३६५ किलो वजनाचे चंद्रावरील मातीचे आणि खडकांचे नमुने पृथ्वीवर आणले.

अनेक देशांच्या वस्तुसंग्रहालयांना तसेच वैज्ञानिक प्रयोगशाळांना अभ्यासासाठी आणि लोकांच्या जिज्ञासापूर्तीसाठी त्यातले काही तुकडे भेट म्हणून देण्यात आले. अमेरिकेच्या 'अपोलो'नंतरच्या अवकाश मोहिमेसाठी – म्हणजे 'स्कायलॅब'या अवकाशस्थानकासाठी (स्पेस स्टेशन) अपोलो यानाकरिता विकसित केलेल्या घटकांचा मोठ्या प्रमाणात उपयोग झाला.

मोहिमेला अपोलो नाव कसं पडलं….

अपोलो-११ या यानाने नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन आल्ड्रिन चंद्रावर उतरले. त्यांच्या रूपाने पहिल्यांदाच चंद्रावर मानवी पाऊल पडले. या मोहिमेपूर्वी चंद्रासारखा पृष्ठभाग असलेल्या अमेरिकेतील अरिझोना उल्कापात विवर, सनसेट विवर येथे चांद्रवीरांनी सराव केला होता. ग्रीक पुराणातील प्रकाशाची देवता असलेल्या झिअसच्या पुत्राचे नाव अपोलो होते त्यावरून या मोहिमेला अपोलो असे नाव देण्यात आले होते.

मोहीम अवघ्या पाच दिवसात पूर्ण…

चंद्राचा प्रवास करायचा तर ती मरणयात्राच होती. चंद्र पृथ्वीपासून किती दूर आहे? तर ३ लाख ८४ हजार किलोमीटर अंतरावर आहे. हा प्रवास त्या तीन चांद्रवीरांनी अवघ्या पाच दिवसांत पूर्ण केला. गणित मांडून पाहा, चांद्रयान किती वेगाने गेले असेल? जेव्हा ते चांद्रवीर चंद्रावर उतरले तेव्हा ते चंद्रावर स्थिरपणे चालू शकत नव्हते.

ते चंद्रावर अडीच तास होते. त्या काळात ते चंद्रावर जणू उडय़ा मारतच चालत होते. कारण चंद्रावर गुरुत्वाकर्षण कमी आहे व तिथे हवा नाही. त्या चांद्रवीरांनी ऑक्सिजन सोबत नेला होता. त्या अडीच तासात त्यांनी चांद्रभूमीवर अनेक प्रयोग केले. त्यांनी पृथ्वीवर परतताना सोबत ३८० किलो दगडमाती आणली. त्याचे संशोधन आजही चालू आहे.

तर एडविन सी. आल्ड्रिन चंद्रावर पहिल्यांदा उतरणारा पहिला मानव असता…

चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव म्हणून सारं जग नील आर्मस्ट्राँग यांना ओळखतं. पण चंद्रावर पाऊल टाकण्याचा पहिला मान खरं तर मिळणार होता तो अपोलो मिशनचे पायलट एडविन सी. आल्ड्रिन यांना.

ते अमेरिकन एअरफोर्समध्ये कार्यरत होते, त्यांना अवकाश मोहीमेचा अनुभव पण होता आणि म्हणूनच त्यांची या चांद्रमोहिमेसाठी पायलट म्हणून निवड झालेली होती. तर नील आर्मस्ट्राँग हे अमेरिकन नेव्हीमध्ये कार्यरत होते.

या मोहिमेत ते सहवैमानिक होते. मोहिमेच्या आखणीनुसार आल्ड्रिन यांनी चंद्रावर पायलट म्हणून प्रथम उतरावं असं ठरलं होतं. जेव्हा अपोलो यान चंद्रावर उतरलं, तेव्हा त्यांना नासाच्या बेस स्टेशन कंट्रोलमधून उतरण्यासाठी तसा आदेशही मिळाला.

पण एडविन थबकले, त्यांच्या मनात अनेक शंकांनी घेर धरला. त्यांच्या मनात हा गोंधळ चालू असतानाच अगदी काही क्षणातच पुढला आदेश आला, तो होता आर्मस्ट्राँग यांच्यासाठी. कोणताही विचार न करता नील आर्मस्ट्राँग यांनी चांद्रभूमीवर पहिलं पाऊल टाकलं आणि अशा प्रकारे चंद्रावर पाऊल ठेवणारे ते पहिले मानव ठरले. पण आल्ड्रिन यांना त्याची जराही खंत नाही. ते म्हणण्यानुसार, 'कमांडर या नात्याने नीललाच तो मान मिळायला हवा होता. आपल्याला त्याचे अजिबात शल्य वाटत नाही.'

परतीचा प्रवास….

२४ जुलै १९६९ रोजी परतीचे वाहन 'कोलंबिया मोडय़ुल' पृथ्वीवर परतले. अपोलो-११ मोहीम यशस्वी झाली व अध्यक्ष केनेडी यांनी पाहिलेले स्वप्न साकार झाले. त्या अगोदर २७ जानेवारी १९६७ मध्ये अपोलो मोहिमेतील चांद्रवीर मरण पावले होते. अपोलो-१ सुद्धा उतरवताना गडबड होत आली होती, पण अवघ्या २० सेकंदांपुरते इंधन राहिले असताना ते सुखरूप उतरले. आर्मस्ट्राँग यांना जिवंतपणी दंतकथा बनण्याचे भाग्य लाभले.

भारताच्या तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि आर्मस्ट्राँगची भेट….

चंद्रावर पहिलं पाउल नील आर्मस्ट्राँगने २० जुलैरोजी ठेवलं. चंद्र मोहिमेवरून परत आल्यानंतर आर्मस्ट्राँगने जगभर प्रवास केला होता. त्यावेळी दिल्लीत इंदिरा गांधी यांचीही भेट घेतली होती. या भेटीवेळी नटवर सिंग उपस्थित होते. तेव्हा नटवर सिंग यांनी नील आर्मस्ट्राँगला सांगितलं की, चंद्रावर पहिलं पाऊल टाकत असलेला क्षण पाहण्यासाठी भारताच्या तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी सकाळी ४.३० वाजेपर्यंत जाग्या राहिल्या होत्या. नील आर्मस्ट्राँगला सांगण्यात आलं तेव्हा यासाठी त्यानं दिलगिरी व्यक्त केली होती.

नील आर्मस्ट्राँग यांचे ८२व्या वर्षी निधन

चंद्रावर मानवाचे पहिले पाऊल उमटवणारे अमेरिकेचे सुप्रसिद्ध अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांचे ८२व्या वर्षी ओहिओ प्रांतातील सिनसिनाटी येथे निधन झाले. ५ ऑगस्ट रोजी झालेल्या वाढदिवसानंतर नील आर्मस्ट्राँग यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती. २० जुलै १९६९ या दिवशी नील यांच्या रूपाने मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते. अपोलो ११ नावाच्या यानातून आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरले, तेव्हा ते ३८ वर्षाचे होते.

आर्मस्ट्राँग यांचा जन्म ५ ऑगस्ट १९३० रोजीचा. त्यांनी एरोस्पेस इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. २०व्या वर्षी त्यांची नियुक्ती नौदलातील विमान सेवेत करण्यात आली. कोरिया युद्धात ही ते सहभागी झाले. त्यांनी ७८ मोहिमांमध्ये भाग घेतला. त्यातील पहिल्या २० मोहिमांसाठी त्यांनी 'एअर मेडल', तर नंतरच्या २० मोहिमांसाठी 'गोल्ड स्टार'सन्मान देऊन गौरविण्यात आले. नौदलात सेवा करताना अपोलो ११ या मोहिमेसाठी त्यांची अंतराळवीर म्हणून निवड झाली. आणि पुढे इतिहास रचला गेला…

अपोलोचा प्रवास कसा सुरू झाला ? काही महत्त्वाचे घटनाक्रम….

दुसरे महायुद्धाचा शेवट होत आलेला. याच दरम्यान २ मे १९४५ ला वॉनर वॉन ब्रॉन नावाच्या नाझी-जर्मन वैज्ञानिकाने अमेरिकी सैनिकांसमोर आत्मसमर्पण केले. अमेरिकेने त्याला बंदी केले. ते ब्रॉनला घेऊन अमेरिकेला गेले. ब्रॉनने अमेरिकेत बॅलिस्टिक मिसाईल कार्यक्रमात सहभा घेत काम सुरू केले.

  • २९ जुलै १९५८ ला नासाची स्थापना करण्यात आली. १९६० मध्ये वॉन ब्रॉनच्या टीमला यामध्ये सामिल करण्यात आले. या टीमने सैटर्न – ५ नावाच प्रेक्षपण यान बनवले. याच प्रक्षेपण यानाचे मदतीने अपोलो मिशनला चंद्रावर घेऊन जाण्यात आले.
  • २५ मे १९६१ अमेरिकेच्या संसदेला संबोधित करताना तत्कालिन राष्ट्रपती जॉन एफ कॅनेडी म्हणाले की, 1960 पर्यंत अमेरिका मानवाला चंद्रावर घेऊन जाईल आणि सुरक्षित परत आणेल.
  • अपोलो ११ अंतराळ मोहिमेमध्ये नील आर्मस्ट्राँग, एड्विन (बझ) ऑल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स यांची मोहिमेच्या सहा वर्षे आधी निवड करण्यात आली होती.
  • १६ जुलै १९६९ रोजी अमेरिकी वेळेनुसार ९ वाजून ३१ मिनिटांनी अपोलो ११ने केनेडी स्पेस सेंटर येथून भरारी घेतली.
  • १८ जुलै १९६९ रोजी आर्मस्ट्राँग आणि ऑल्ड्रिन यांनी 'इगल'मधून चंद्रावर उतरण्यासाठी आवश्यक पोषाख केला आणि सराव केला.
  • सुमारे २,४०,००० मैलांचा प्रवास ७६ तास केल्यानंतर अपोलो ११ हे यान १९ जुलै दिवशी चंद्राच्या कक्षेमध्ये पोहोचले.
  • २० जुलै १९६९ रोजी 'इगल'चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले.
  • २४ जुलै १९६९ रोजी अपालो ११ हे पॅसिफिक महासागरात उतरले. चांद्रवीर पृथ्वीवर परतले.
logo
Pudhari News
pudhari.news