अबुधाबी मध्ये विमानतळालगत दहशतवाद्यांचे 3 ड्रोन हल्‍लेे | पुढारी

अबुधाबी मध्ये विमानतळालगत दहशतवाद्यांचे 3 ड्रोन हल्‍लेे

अबुधाबी ; वृत्तसंस्था : येमेनमधील हुती बंडखोरांनी संयुक्‍त अरब अमिरातमध्ये (यूएई) मोठा दहशतवादी हल्ला केला. मुसाफा भागात तीन ऑईल टँकर्सवर ड्रोनने बॉम्ब टाकले. टँकर्सचे स्फोट होऊन ही आग अबुधाबी विमानतळापर्यंत पोहोचली. हल्ल्यात 2 भारतीय आणि एका पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू झाला, तर 6 जण जखमी झाले आहेत. सोमवारी सकाळी ही घटना घडली. अबुधाबी विमानतळाकडून एक नवे बांधकाम सुरू आहे. ते खाक झाले; पण सुदैवाने विमानतळावर या आगीची धग पोहोचली नाही.

दुबईतील ‘अल-अरेबिया’च्या वृत्तानुसार, स्फोटापूर्वी अनेक प्रत्यक्षदर्शींनी आकाशात ड्रोन पाहिले. अबुधाबीत दोन ठिकाणी या स्फोटांमुळे आगी लागल्या. पहिला स्फोट मुसाफा येथे, तर दुसरा अबुधाबी विमानतळाच्या नव्या बांधकामाच्या ठिकाणी झाला. गेल्यावर्षी फेब्रुवारीतही हुतींनी सौदी अरेबियातील विमानतळावर ड्रोनने हल्ला केला होता. ऑगस्ट 2021 मध्ये हुतींनी आणखी एक सौदी विमानतळ लक्ष्य केले; पण यूएईच्या विमानतळावर हुती हल्ल्याची ही पहिलीच घटना आहे.

आधी इशारा; मग हल्ला

येत्या काही तासांत आम्ही संयुक्‍त अरब अमिरातवर लष्करी कारवाई करणार आहोत, असा इशारा हुतीचा प्रवक्‍ता याह्या सारी याच्या एका ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आला होता.

हुतींचे ‘यूएई’शी शत्रुत्व का?

हुती समुदायातील लोकांनी येमेन सरकारविरुद्ध बंड पुकारलेले आहे. संयुक्‍त अरब अमिरात (यूएई) हा देश अरब ऐक्याचा एक भाग म्हणून येमेन या देशासोबत आहे.

Back to top button