

सॅन जुआन; वृत्तसंस्था : बहामासमध्ये शुक्रवारी एक छोटे विमान कोसळून १० जणांचा मृत्यू झाल्याची भीषण दुर्घटना घडली. द्वीपसमूहाची राजधानी नासाऊच्या पश्चिमेकडील समुद्रात नॉर्थ अँड्रॉस येथे घडलेल्या या दुर्घटनेनंतर सरकारने ‘फ्लेमिंगो एअर’च्या उड्डाणांवर तात्पुरती बंदी घातली आहे.
बहामासच्या विमान अपघात तपास प्राधिकरणाने सांगितले की, या विमानाने नासाऊ येथील लिंडेन पिंडलिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले होते. सॅन अँड्रॉसकडे जात असताना ते कोसळले. हे विमान बहामासमध्ये नोंदणीकृत ‘सेसना ४०२’ प्रकारचे होते. दरम्यान, याआधी शुक्रवारी याच एअरलाईन्सचे विमान धावपट्टीवर प्रवासी खाली उतरताच या विमानाला आग लागली होती. बहामासचे पंतप्रधान फिलिप ब्रेव्ह डेव्हिस यांनी या अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून, या घटनेमुळे स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात असलेल्या संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे.