

पुढारी ऑनालईन डेस्क : बिअर या पेयाचा चाहता वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. तुम्हाला माहीत आहे का की एक संपूर्ण दिवस बिअर पिऊन साजरा केला जातो? होय, दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बिअर दिवस साजरा केला जातो. या वर्षी, आंतरराष्ट्रीय बिअर दिवस (International Beer Day) ४ ऑगस्ट रोजी आहे. या बिअर पेयाला प्राचीन इतिहासापासून महत्त्व प्राप्त असल्याचे अनेक संशोधकांनी सांगितले आहे. विशेष महत्त्व असणाऱ्या या बिअरचा इतिहास, महत्त्व आणि या उत्सवाबद्दल सविस्तर माहिती घेऊ.
बिअर हे जगातील सर्वात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्या अल्कोहोलिक पेयांपैकी (Alcohole Drink) एक आहे, तसेच सर्वात जुन्या (Old Drink) पेयांपैकी एक आहे. प्रक्रिया केलेले बार्ली (Barli), गहू, मका, तांदूळ आणि इतर काही धान्य तसेच फळांपासून बिअर हे पेय बनवले जाते. आंतरराष्ट्रीय बिअर (International Beer Day) दिवस हा एक असा दिवस आहे जो बिअर बनवण्याच्या कलेचा उत्सव साजरा करतो आणि बिअर बनवण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्यांचे कौतुक करतो.
कॅलिफोर्नियातील सांताक्रूझ (Santa Cruz, California) येथे 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय बिअर दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. या दिवसाच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत, जगभरात हा उत्सव प्रसिद्ध आणि विकसित झाला आहे. हा उत्सव किंवा दिवस सहा खंडांमध्ये पसरलेल्या ८० हून अधिक देशांद्वारे साजरा केला जातो. जेसी अवशालोमोव्ह यांनी बिअर बनवणाऱ्या लोकांचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी याची सुरुवात केली होती. बारटेंडर्स आणि इतर बिअर तंत्रज्ञांचा समावेश झाल्यानंतर हा दिवस पाळण्याची व्याप्ती हळूहळू विस्तारत गेली. एकाच वर्षाच्या आत, स्थानिक वाटणाऱ्या या उत्सवाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली.
या 'बिअर डे'ला वेगवेगळ्या ब्रुअरीजमधील क्राफ्टर्स एकत्र येतात आणि त्यांचे अनुभव आणि बिअर कसे बनवायचे याचे तंत्र याबाबत माहिती देतात. त्यानंतर एकत्र येत या पेयाचा आनंद घेतात. हा दिवस साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे या एकाच दिवशी सर्व राष्ट्रांचे बिअर पेय एकत्रित उपलब्ध करुन देत लोकांना एकत्र ठेवणे असा आहे. त्यामुळे बिअर डेच्या ठराविक सेलिब्रेशनमध्ये हॉटेल्स आणि बारमध्ये बिअरवर खास ऑफर्स पाहायला मिळतील. खेळ आणि बक्षिसांसह बिअर पिण्याचे अनेक कार्यक्रम होतात. लोक नवीन आणि दुर्मिळ बिअर्सचा आनंद घेतात. दिवसभर आनंदी राहत, ड्रिंकिंग गेम्स आणि मनोरंजक बिअर फूड याचा आनंद मनमुरादपणे घेतात.
बिअर हे पेय पहिल्यांदा कसं बनवलं गेलं याचा इतिहास खूप रंजक आहे. प्राचीन इतिहासामध्ये एका पेय बनवण्याच्या पद्धतीमध्ये बदल झाला. बार्लीसारखे धान्य पाण्यात सोडले गेले. त्यानंतर यामध्ये वाईल्ड यीस्टमुळे मोठा बदल आढळून आला. धान्य मिसळलेले हे पेय नैसर्गिकरित्या आंबलेले आढळून आले. त्यानंतर मानवाला अशा पदार्थाची चव समजली आणि हे पेय पसंतीस उरले. कालांतराने, मानवांना आंबलेल्या द्रवाचे सेवन करण्याचे सुखद परिणाम सापडले असतील असे अनुमान अनेक संशोधकांनी काढलेले आहे.
ब्रिटानिकाने दिलेल्या एका संशोधनानुसार, चिनी लोक ७००० बीसी पर्यंत लहान आणि वैयक्तिक स्तरावर आंबवलेले अल्कोहोलिक पेय तयार केले जात होते. उत्पादन प्रक्रिया आणि पद्धती प्राचीन इजिप्त आणि प्राचीन मेसोपोटेमिया प्रमाणेच असल्याचा अनुमान अनेकांनी लावलेला आहे. मात्र बिअर सर्वात आधी कोठे बनवली गेली याबाबत अनेक संभ्रम आहेत. संशोधकांनी काढलेल्या अनुमानानुसार, बिअरचा विकास ई.पू ६००० ते ५५०० वर्षांच्या प्राचीन संस्कृतीमधील सुमेरियन लोकांमध्ये झाल्याचे आढळून आले. त्यानंतर बॅबिलोनियन आणि ईजिप्शियन संस्कृतीमध्ये बिअर बनविल्या गेल्याचा संदर्भ अढळतो.
हेही वाचा