‘मराठा’ आवाजाने दणाणली सुवर्णसौध; हजारो समाजबांधवांचा सरकारवर दबावाचा निर्धार

‘मराठा’ आवाजाने दणाणली सुवर्णसौध; हजारो समाजबांधवांचा सरकारवर दबावाचा निर्धार
Published on
Updated on

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, अशा घोषणांनी मंगळवारी (दि. 20) हलगा विधानसौध परिसर दणाणून गेला. निमित्त होते, क्षत्रिय मराठा परिषद तसेच सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित मराठा आरक्षणाबाबत आंदोलनाचे. रणरणत्या उन्हातही समाजबांधवांनी घोषणाबाजीने आपल्या भावना व्यक्त केल्या, भगवी टोपी आणि भगवा झेंडा यामुळे संपूर्ण परिसर भगवेमय झाला होता. राज्यातील विविध 10 विद्यमान आमदार, ऊर्जा मंत्री सुनीलकुमार, सांस्कृतिक मंत्री श्रीरामुलू यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन आरक्षणासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.

बंगळूर येथील गोसाई मठाचे मराठा स्वामी मंजुनाथ स्वामी यांनी या अधिवेशनातच आरक्षण मंजूर करावे; अन्यथा आम्हालाच आगामी विधानसभा निवडणुकीत विचार करावा लागेल, असा इशारा दिला.

सुवर्णसौधजवळ कोंडसकोप्प 'बी' ब्लॉकमध्ये सकाळी 11 वा. आंदोलनास प्रारंभ झाला. राज्यातील विविध ठिकाणांहून मराठा समाजबांधवांनी गर्दी केली होती. दिवसभरात आमदार अनिल बेनके, अभय पाटील, श्रीमंत पाटील, लक्ष्मी हेब्बाळकर,
सतीश जारकीहोळी, आनंद न्यामगौड, माजी आमदार सिद्धू सवदी, आमदार प्रकाश हुक्केरी, आमदार गणेश हुक्केरी, आमदार आर. व्ही. देशपांडे, माजी आमदार एस. एल. घोटणेकर, आमदार दुर्योधन ऐहोळे, आमदार महादेवप्पा यादवाड, बंगळूरचे आमदार कृष्णाप्पा यांनी भेट देऊन मराठा बांधवांना पाठिंबा दिला.

आमदार अभय पाटील म्हणाले, सुवर्णसौधसमोर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करावा त्यासाठी मी आजच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेऊन मागणी करणार आहे. तर आरक्षण या अधिवेशनात मंजूर व्हावे अशी मागणी आम्ही सर्व आमदार मिळून करणार आहोत.

आमदार अनिल बेनके म्हणाले, मराठा समाजाच्या विकासासाठी मराठा विकास महामंडळ स्थापन केले आहे. यातून मराठा समाजाचा विकास सुरू आहे. आता आरक्षणाबाबत आम्ही पाठपुरावा करू. आ. श्रीमंत पाटील यांनी याच अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी दबाव आणणार असल्याचे सांगितले. मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी अनेक बाबतीत मागासलेला असून सरकारने तातडीने दखल घेऊन आरक्षण द्यावे अशी मागणी केली.

विनय कदम, क्षत्रिय मराठा परिषदेचे राज्याध्यक्ष श्यामसुंदर गायकवाड, राज्य उपाध्यक्ष भाऊसाहेब जाधव, मोहन जाधव, माजी आमदार काकासाहेब पाटील, निपाणी येथील जिल्हा पंचायत सदस्या सुमित्रा उगळे, डॉ. सोनाली सरनोबत, किरण जाधव, स्नेहल कोलेकर, राहुल भातकांडे, क्षत्रिय मराठा परिषदेचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, युवराज जाधव उपस्थित होते.

राज्यभरातून हजारो बांधवांची उपस्थिती

विजापूर, बागलकोट, कोलार, बिदर, भालकी, निपाणी चिकोडी, संकेश्वर, हुक्केरी, अथणी या ठिकाणापासून मोठ्या प्रमाणात समाजबांधव सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news