

पुणे; पुढारी वृत्तसेवा : एका सराईत गुन्हेगाराने धावत्या रेल्वेतून पत्नी आणि दोन वर्षांच्या मुलीला ढकलून दिले. या घटनेत दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून, तिच्या आईवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरवी आकाश भोसले (वय 2, रा. पद्मावती) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. तिची आई वृषाली (वय 22) गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आकाश भोसले याच्या विरुद्ध लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आकाश सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरुद्ध पुणे शहरातील विविध पोलिस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत. कौटुंबिक वादातून त्याने पहिल्या पत्नीचा खून केला होता. सध्या तो कारागृहातून जामीन मिळवून बाहेर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (19 मार्च) आरोपी आकाश, पत्नी वृषाली आणि मुलगी आरवीला घेऊन मुंबईला निघाला होता. हाजी अली दर्ग्यात दर्शनासाठी जायचे आहे, असे त्याने पत्नीला सांगितले होते.
प्रगती एक्स्प्रेसमधून ते महिलांच्या डब्यातूनच प्रवास करत होते. खडकी रेल्वे स्थानक परिसरात त्याने पत्नीला दरवाजात बोलावले. वृषालीच्या कडेवर आरवी होती. धावत्या रेल्वेतून दोघींना आकाशने ढकलून दिले. प्रवाशांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी साखळी ओढून गाडी थांबविली. या घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दोघींना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान आरवीचा मृत्यू झाला, तर वृषालीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. महिलांच्या डब्यातून तो पत्नी व लहान मुलीला सोबत घेऊन प्रवास करत होता. खडकी रेल्वे स्थानक परिसरात त्याने पत्नी व मुलीला ढकलून दिले. हा प्रकार ज्यांनी पाहिला आहे त्यांनी पोलिसांशी संपर्क करून अधिक माहिती द्यावी, असे आवाहन आहे.
प्रमोद खोपीकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लोहमार्ग पोलिस
पित्यासह आईवर गुन्हा
आईने मारहाण केल्यानंतर पित्याने आपल्या मुलीबरोबर अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात पित्यासह आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार 30 डिसेंबर 2018 ते मार्च 2023 यादरम्यान घडला.