

नवी दिल्ली : भारतीय संस्कृतीमध्ये गायीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आता याच प्राचीन भारतभूमीत गायीचे पहिले क्लोनही तयार करण्यात आले आहे. क्लोनिंगच्या तंत्राने जन्मलेल्या या वासराचे नाव 'गंगा' असे आहे. 16 मार्चला 'गंगा'चा जन्म झाला. हरियाणातील कर्नाल येथील राष्ट्रीय डेयरी अनुसंधान संस्थान'एनडीआरआय'मधील वैज्ञानिकांनी गायीचे हे क्लोनिंग केले. या तंत्राने देशात गायींच्या प्रजननास चालना मिळेल, असे संशोधकांना वाटते.
गंगा ही गीर प्रजातीच्या गायीचे क्लोन आहे. देशातील उष्ण व दमट हवेला ती अनुकूल आहे. क्लोनिंगचे तंत्र वापरून देशात अधिक दूध देणार्या जनावरांची संख्या वाढवता येऊ शकेल असे संशोधकांना वाटते. भारतीय कृषी अनुसंधान परिषद 'आयसीएआर'चे महासंचालक डॉ. हिमांशू पाठक यांनी सांगितले की जन्मतः गंगाचे वजन 32 किलो होते.
ती शारीरिक, अनुवंशिक आणि अन्य परीक्षणांमध्ये यशस्वी ठरली. मात्र, इथंपर्यंतचा संशोधकांचा प्रवास दीर्घकालीन होता. फेब—ुवारी 2009 मध्ये 'आयसीएआर' आणि 'एनडीआरआय'ने जगातील पहिले क्लोन्ड रेडकू 'समरूपा'ला जन्माला घातले होते. मात्र, जन्मानंतर पाचच दिवसांनी फुफ्फुसातील संक्रमणामुळे या रेडकाचा मृत्यू झाला. त्यानंतर भारताने 26 अन्य प्राण्यांचे क्लोन तयार केले आहे. गायीच्या क्लोनिंगसाठीच बराच वेळ लागला. 2021 मध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आला होता.