Indian Student : भारतीय विद्यार्थ्यांना बंधक ठेवले असल्याच्या दाव्याचा परराष्ट्र मंत्रालयाकडून इन्कार
नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना बंधक ठेवण्यात आले असल्याच्या दाव्याचा परराष्ट्र मंत्रालयाने इन्कार केला आहे. युक्रेनमधील भारतीय दूतावासाचे अधिकारी तेथे अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात असून बंधक ठेवण्यात आले असल्याचे कुठेही आढळून आलेले नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी स्पष्ट केले. (Indian Student)
युक्रेन प्रशासनाच्या मदतीने असंख्य विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली आहे. उर्वरीत विद्यार्थ्यांच्या सुटकेचेही प्रयत्न सुरू आहेत. युक्रेन प्रशासनाने खारकीवमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या मनाविरुद्ध अडवून ठेवले असल्याचा रशियन संरक्षण मंत्रालयाने केला होता. हा दावा खोटा असल्याचे युक्रेनचे भारतातील राजदूत इगोर पोलिखा यांनी सांगितले होते.
स्वतः युक्रेन युद्धात रक्तबंबाळ झाला असला तरी तेथे अडकलेल्या विद्यार्थ्यांची प्राधान्याने सुटका करीत असल्याचे पोलिखा यांनी नमूद केले होते. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने देखील भारतीय विद्यार्थ्यांना बंधक ठेवण्यात आल्याच्या दाव्यात तथ्य नसल्याचे सांगितले आहे.
Indian Student : हवाई दलाच्या विमानाने दोनशे विद्यार्थ्यांना परत आणले….
दरम्यान हवाई दलाच्या सी-17 विमानाने दोनशे विद्यार्थ्यांना रोमानिया येथून परत आणण्यात आले आहे. बुखारेस्ट येथून उड्डाण केलेले हे विमान दिल्लीजवळील हिंडन विमानतळावर मध्यरात्री दीड वाजता पोहोचले. लष्करी विमानाने विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आलेली ही पहिलीच मोहीम होती.
यानंतर सकाळी आणखी तीन विमाने विद्यार्थ्यांना घेऊन भारतात पोहोचली. युक्रेनला लागून असलेल्या रोमानिया, हंगेरी आणि पोलंड या देशांच्या मार्गे भारतीय विद्यार्थ्यांची सुटका केली जात आहे.

