

पुढारी ऑनलाईन डेस्क : Neeraj Chopra Gold Medal : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला सुवर्ण पदकाने हुलकावणी दिली आहे. त्याने 89.45 मीटर थ्रोसह रौप्य पदकावर नाव कोरले. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 92.97 मीटर थ्रो करून सुवर्ण पदक पटकावले. ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने 88.54 मीटर फेकसह तिसरे स्थान पटकावले. पाकिस्तानच्या भालाफेकपटू अर्शदने नवा ऑलिम्पिक विक्रम रचला. त्याने नॉर्वेच्या अँड्रियास थॉर्किलडसेनचा विक्रम मोडीत काढला. अँड्रियासने 23 ऑगस्ट 2008 रोजी बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 90.57 मीटर भालाफेक करून हा विक्रम केला होता.
पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे हे पाचवे पदक आहे. याआधी भारताने चार पदके जिंकली होती. यापैकी तीन ब्राँझ नेमबाजीत आणि एक हॉकीमध्ये आले. पुरुषांच्या भालाफेकच्या अंतिम फेरीत नीरजने दुसऱ्या प्रयत्नात 89.45 मीटर थ्रो केला. नीरजने सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून दुसरे पदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
पदकाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या नीरजचा पहिलाच प्रयत्न फसला. दुसरीकडे, पाकिस्तानच्या अर्शद नदीमने त्याच्या दुस-या प्रयत्नात 92.97 मीटर थ्रो करून नवा ऑलिम्पिक विक्रम रचला. अशा दबावाखाली नीरजला दुसऱ्या प्रयत्नात 89.45 मीटर थ्रो करण्यात यश आले. यानंतर त्याचा तिसरा, चौथा आणि पाचवा प्रयत्नही फाऊलमध्ये संपुष्टात आला. वारंवार फाऊल करणारा नीरज शेवटच्या प्रयत्नातही नदीमला मागे टाकण्यात अपयशी ठरला.
ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी 2 पदके (वैयक्तिक स्पर्धांमध्ये) जिंकणारा नीरज पाचवा खेळाडू ठरला आहे.
ॲथलेटिक्समध्ये नीरजच्या आधी नॉर्मन प्रिचर्डने 2 रौप्यपदक जिंकले होते. (पुरुष 200 मीटर आणि पुरुष 200 मीटर अडथळा शर्यत)
सुशील कुमारने कुस्तीमध्ये 1 रौप्य आणि 1 कांस्य पदक जिंकले आहे.
बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूने 1 रौप्य आणि 1 कांस्यपदक जिंकले आहे, तर नेमबाजीमध्ये मनू भाकरने 2 कांस्यपदके जिंकली आहेत.