

पुढारी ऑनलाईन
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर आज टीम इंडिया वन डे मालिकेतील ( IND vs SA ODI ) पहिला सामना खेळणार आहे. ऑक्टोबर २०१६ पासून प्रथमच विराट कोहली याच्या नेतृत्वाविना टीम इंडिया मैदानात उतरले. तब्बल पाच वर्षांनंतर विराट हा एक खेळाडू म्हणून संघात असेल. विराटकडे कर्णधारपद नसले तरी त्याच्या खेळीकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे. तसेच के. एल. राहुलसोबत ओपनिंगला शिखर धवन येणार की ऋतुराज गायकवाड? याकडेही चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरोधात तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिला सामना पार्ल येथे आज दुपारी दोन वाजता सुरु होईल. रोहत शर्मा जखमी असल्याने या मालिकेला मुकला आहे. त्याच्या गैरहजेरीत केएल राहुल
यांच्याकडे नेतृत्वाची धुरा असेल. तर जसपीत बुमराह यांच्याकडे उपकर्णधारपद असणार आहे.
विराट मागील काही महिने फॉर्ममध्ये नाही. कसोटी सामन्यांमध्येही त्याचे प्रदर्शन त्यांच्या नावाला साजेसे झालेले नाही. आता कर्णधारपदावर असणारा एक अनामिक तणाव दूर झाल्यानंतर विराट पुन्हा एकदा 'मुक्त'पणे धमाकेदार कामगिरी करणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. २०२०पासून आतापर्यंत विराटने १२ वन डे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने सरासरी ४६.६६ धावा केल्या आहेत. टीम इंडियाच्या मधल्या फळीची जबाबदारी विराटवर असेल.
शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जुलै २०२१मध्ये श्रीलंकेचा दौरा केला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत शिखर धवननला संधी मिळाली आहे. त्याने चांगली कामगिरी केली तर त्याच्यासाठी टी -२० विश्वचषक संघातील स्थान पक्के करण्याची संधी आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये धवनची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. त्याने पाच डावात केवळ ५६ धावा केल्या! दक्षिण आफ्रिकेतील मालिकेतील त्याच्या कामगिरीवर त्याचे टीम इंडियामधील स्थान निश्चित होणार आहे.
युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. पाच सामन्यात त्याने ६०३ धावा केल्या आहेत. यामध्ये चार शकते झळकावली आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात ओपनिंग शिखर धवन की ऋतुराज गायकवाड़ करणार याबाबतचा निर्णय कर्णधार केएल राहुलला घ्यावा लागणार आहे. शिखर धवनला संधी दिल्यास त्याला चांगली कामगिरी करुन दाखवावीच लागेल. तो पहिल्या वन डे सामन्यात अपयशी ठरल्यास निश्चितच पुढील सामन्यात ऋतुराजला संधी मिळेल, असे मानले जात आहे.
उपकर्णधार जसप्रीत बुमराह यांचे संघातील स्थान निश्चित आहे. मात्र शार्दुल ठाकुर, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद सिराज या तिघांपैकी कोणाला संधी मिळणार? याकडेही क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. टीम इंडिया चार फलंदाज, यष्टीरक्षक, एक अष्टपैलू आणि पाच गोलंदाजांसह मैदानात उतरले, असे मानले जात आहे.