

डब्लिन ; वृत्तसंस्था : दुसर्या टी-20 सामन्यात भारताने आयर्लंडवर 4 धावांनी विजय मिळवून मालिका 2-0 अशी निर्विवाद जिंकली. छोट्या मैदानावर मोठ्या धावसंख्येच्या सामन्यात भारताकडून उमरान मलिकने शेवटचे षटक अफलातून टाकत संघाला विजयी केले. भारताने प्रथम फलंदाजी करताना दीपक हुडाचे शतक (104) आणि संजू सॅमसन (77) यांच्या 176 धावांच्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर 7 बाद 225 धावा केल्या होत्या, त्याला प्रत्युत्तर देताना आयलर्र्ंडने 5 बाद 221 धावा केल्या. दीपक हुडाला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.
भारताच्या द्विशतकी आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडनेही जोरदार सुरुवात केली. पॉल स्टर्लिंग (40) आणि अँडी बालबिर्ने (60) यांच्या सलामीनंतर हॅरी टेक्टॉर (39) आणि जॉर्ज डॉकरेल (34), मार्क एडेर (23) यांनी विजयासाठी प्रयत्न केले; परंतु त्यांना यश आले नाही. शेवटच्या षटकात आयर्लंडला विजयासाठी 17 धावांची आवश्यकता होती, पण उमरान मलिकने फक्त 12 धावा दिल्याने भारताचा विजय साकारला.
भारताने दुसर्या टी-20 सामन्यात आयर्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत 7 बाद 225 अशी धावसंख्या उभी केली. दीपक हुडा व संजू सॅमसन यांनी 176 धावांची भागीदारी केली. भारताकडून ही टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम भागीदारी ठरली. दीपक हुडाने टी-20 मधील पहिले शतक झळकावले. दीपकने 57 चेंडूंत 9 चौकार व 6 षटकारांच्या मदतीने 104 धावा केल्या. रोहित शर्मा, लोकेश राहुल, सुरेश रैना यांच्यानंतर दीपकने टी-20 मध्ये शतक झळकावले.
भारताच्या एकूण धावसंख्येत दीपक व संजू यांनी मिळून 18 चौकार व 10 षटकार अशा 132 धावा अवघ्या 28 चेंडूंत कुटल्या. संजूच्या बॅटीतून पहिल्याच चेंडूवर चौकार आला; पण आज ईशान किशन (3) अपयशी ठरला, तिसर्या षटकात मार्क एडेरने त्याला बाद केले. त्यानंतर आलेल्या दीपक हुुडाने एडेरच्या गोलंदाजीवर खणखणीत षटकार खेचला. मागच्या सामन्यातील मॅच विनर दीपक आज आक्रमक फॉर्मात दिसला. त्याने 27 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि संजूनेही पहिले अर्धशतक झळकावताना दीपकसह शतकी भागीदारीही पूर्ण केली. या दोघांना आयर्लंडच्या खेळाडूंकडून जीवदानही मिळाले. दीपकची फटकेबाजी सुरू असताना संजूने बचावात्मक पवित्राच घेतला होता; पण 14 व्या षटकानंतर संजूनेही गिअर बदलला.
गॅरेथ डेन्लीच्या 4 षटकांत या दोघांनी 43 धावा चोपल्या. संजू 42 चेंडूंत 9 चौकार व 4 षटकारांसह 77 धावांवर बाद झाला. त्याने दीपकसह 87 चेंडूंत 176 धावांची भागीदारी केली आणि ही टी-20 मधील भारताकडून सर्वोत्तम भागीदारी ठरली. दीपकने 57 चेंडूंत 9 चौकार व 6 षटकारांच्या मदतीने 104 धावा केल्या.
भारत : 20 षटकांत 7 बाद 225 धावा. (दीपक हुडा 104, संजू सॅमसन 77. मार्क एडेर 3/42, क्रेग यंग 2/35, जोश लिटल 2/38.)
आयर्लंड : 20 षटकांत 5 बाद 221. (अँडी बालबिर्ने 60, पॉवेल स्टर्लिंग 40, हॅरी टेक्टॉर 39. उमरान मलिक 1/42, रवी बिष्णोई 1/41)