

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन
देशातील कोरोनाची दैंनदिन रुग्णसंख्या सलग दुसऱ्या दिवशी ३ लाखांच्या खाली आली. पण याआधीच्या दिवशीच्या तुलनेत गेल्या २४ तासांतील रुग्णसंख्या अधिक आहे. गेल्या २४ तासांत २ लाख ८५ हजार ९१४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ६६५ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात २ लाख ९९ हजार ७३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. सध्या देशात २२ लाख २३ हजार १८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सध्याचा पॉझिटिव्हिटी रेट १६.१६ टक्के आहे. दिलासादायक बाब म्हणजे दैंनदिन बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांचे प्रमाण अधिक आहे.
मंगळवारी दैनंदिन कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांचे प्रमाण अधिक असल्याने दिलासा व्यक्त करण्यात आला होता. गेल्या २४ तासांतदेखील बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. याआधीच्या दिवशी एका दिवसात २ लाख ५५ हजार ८७४ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, २ लाख ६७ हजार ७५३ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. दरम्यान, ६१४ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. मंगळवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९३.१५ टक्के, तर दैनंदिन कोरोनासंसर्गदर १५.५२ टक्के आणि आठवड्याचा कोरोना संसर्गदर १७.१७ टक्के नोंदवण्यात आला होता.
देशातील कोविड-१९ संसर्गाने मंगळवारी ४ कोटींचा आकडा ओलांडला. कोरोनाच्या तिसर्या लाटेत गेल्या तीन आठवड्यांत ५० लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णसंख्येत भारत अमेरिकेनंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत आतापर्यंत जवळपास ७.३ कोटी रुग्णांची नोंद झाली आहे.
अमरावती जिल्ह्यात ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत ओमायक्रॉनचे तब्बल २८ रुग्ण आढळून आले आहेत. सर्वात धक्कादायक म्हणजे मंगळवारी (२५ जानेवारी) एकाच दिवशी तब्बल ३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तिघेही मृतक ग्रामीण भागातील आहेत. जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा आता ३६३६ वर पोहोचला आहे. २८ ओमायक्रॉन रुग्णांपैकी महापालिका क्षेत्रातील २५ तर ग्रामीण भागातील ३ रुग्ण आहेत. जिल्ह्यात आढळून येत असलेले ओमायक्रॉनचे रुग्ण हे सब-व्हेरियंटचे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरूवातीला आढळून आलेल्या दोन-तीन रुग्ण हे ओमायक्रॉनबाधित होते. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांमध्ये ओमायक्रॉनचा सब-व्हेरियंट आढळून येत आहे.