धोरण : भारत-जपान मैत्रीचा सुवर्णबंध

धोरण : भारत-जपान मैत्रीचा सुवर्णबंध
Published on
Updated on

राष्ट्राराष्ट्रांमधील मैत्रीचा सुवर्णबंध परंपरा व इतिहासाच्या प्रवाहावर अवलंबून असतो. तथापि ही मैत्री किती पारदर्शक आहे, किती प्रवाही आहे, किती प्रामाणिक आहे यावर त्या मैत्रीचे भवितव्य अवलंबून असते. भारत-जपान मैत्री हीदेखील प्राचीन सांस्कृतिक संदर्भांवर अवलंबलेली आहे; पण वर्तमानात ती तेवढीच वस्तुनिष्ठ असल्याने भक्कमपणे टिकून आहे. याचीच प्रचिती जपानचे पंतप्रधान फुमियो किशदा यांच्या दौर्‍यातून आली आहे.

जपानचे पंतप्रधान फुमियो किशदा यांचा भारत दौरा हा 27 तासांचा दौरा होता. हा दौरा वैशिष्ट्यपूर्ण ठरला तो आशिया-प्रशांत कृती योजनेमुळे. पूर्व आणि दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या वाढत्या दादागिरीला लगाम घालण्यासाठी त्यांनी केलेली ही एक लक्षवेधक कृती योजना आहे. या योजनेचा ऊहापोह त्यांनी यापूर्वीही केला आहे. परंतु यावेळी त्यांनी विशेष भर दिला तो मुक्त आणि खुल्या आशिया प्रशांत क्षेत्रातील प्रभावाच्या निमिर्तीसाठी. अलीकडे या क्षेत्रात चीनची अरेरावी वाढत आहे. यामुळे अनेक छोटी छोटी आग्नेय आशियाई राष्ट्रे वैतागलेली आहेत. त्याचा धोका जपानलाही आहे. शिवाय उत्तर कोरियाच्या वाढत्या क्षेपणास्त्र चाचणी योजनेनेही जपानला ग्रासले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता आशिया प्रशांत क्षेत्र हे मुक्त आणि स्वतंत्र राहावे यासाठी जपानला भारताचे समर्थन हवे आहे. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया ही दोन क्वाड सदस्य राष्ट्रेसुद्धा या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यूहरचनात्मक डावपेच म्हणून चीनच्या आशिया खंडातील वाढत्या प्रभुत्वास कसे रोखावयाचे हा प्रश्न जपानपुढे जसा आहे, तसाच तो भारतापुढेही आहे. चीन भारताच्या लडाख, अरुणाचल प्रदेश इत्यादी सीमावर्ती प्रदेशावर वाईट नजर ठेवून वारंवार कुरापती काढण्याचा प्रयत्न करतच असतो. चीनच्या या हालचालींची जपानलाही जाणीव आहे. त्यामुळे चीनला प्रतिशह देण्यासाठी त्यांनी तयार केलेल्या आशिया प्रशांत कृती योजनेचे महत्त्व या भेटीच्या रूपाने अधोरेखित केले पाहिजे.

फुमियो किशदा यांच्या भारत दौर्‍यात आणखी एक सूत्र विकसित झाले आहे. ते म्हणजे त्यांनी म्हटल्याप्रमाणे जगामध्ये नवी न्यायव्यवस्था विकसित करण्यासाठी परस्परविश्वास आणि सहकार्याची नवी क्षितिजे विकसित केली पाहिजेत. विशेषत: कोव्हिड साथीनंतर आणि युक्रेन युद्धानंतर जगामध्ये अन्नधान्य टंचाई, हवामान बदल, खतांच्या वाढत्या किमती आणि ऊर्जा समस्या इत्यादी समस्या भेडसावत आहेत. या सर्व समस्यांना म्हणजे जागतिक आव्हानांना कसे सामोरे जायचे याबाबतही भारत आणि जपान यांनी समान विचारधारेने काही काळ उपक्रम करावेत, असे किशदा यांना वाटते. भारताने त्यांच्या या विविध योजनांना उत्तम प्रकारे प्रतिसाद दिला आहे. भारत आणि जपान यांच्या दरम्यानचा व्यापार 20 अब्ज डॉलर एवढा आहे. त्यापैकी 14 अब्ज डॉलर्स एवढ्या वस्तूंची भारत जपानकडून आयात करतो आहे. त्यामुळे जपानच्या भारत-जपान आर्थिक सहकार्यास पुढेही अनेक मोठ्या संधी उपलब्ध आहेत.

दक्षिणेकडील राष्ट्रांपुढे विकासाचे अनेक प्रश्न आहेत. विशेषतः भारताच्या नेतृत्वाखाली जी-20 राष्ट्रांचा समूह एकत्र आला आहे तो विकास प्रश्न मार्गी लावण्यासाठी. या सर्व देशांना आर्थिक साधनसामग्रीची आवश्यकता आहे. त्यांना पायाभूत सुविधांचीही गरज आहे. भारतामध्ये मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड ट्रेनला जपानने अल्पदरात कर्ज दिले आहे. जपानकडून या कर्जाचा आणखी पुढचा हप्ता भारताला निश्चितच मिळणार आहे. त्या अनुषंगाने हा दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरला. पायाभूत सुविधांच्या बाबतीमध्ये मग ते ऊर्जा क्षेत्र असो, अन्नसुरक्षेचे क्षेत्र असो किंवा इतर अनेक गोष्टींमध्ये समान उद्योग आणि वस्तू व सेवांच्या निर्मितीचे क्षेत्र असो, या सर्व बाबतीत जपानने सहकार्याचा हात पुढे केला आहे आणि थोरला भाऊ या नात्याने जी-20 राष्ट्रसमूहातील छोट्या छोट्या देशांच्या आर्थिक समस्या सोडण्यासाठी भारत पुढाकार घेत आहे. जपान आपल्याकडील वित्तीय साधनसामग्री ही या विकसनशील देशांना सहकार्य करण्यासाठी वापरू इच्छितो. विशेषतः आफ्रिकेतील देश, लॅटिन अमेरिकेतील छोटे देश यांच्यापुढे विकास संरचनासाठी वित्तीय साधन सामग्री, भांडवल, तंत्रज्ञान आणि शहाणपण या सर्व गोष्टींची आवश्यकता आहे. या सर्व बाबतीत जपान अग्रेसर असून या देशांना मदतीचा हात देऊ शकतो.

दुसर्‍या महायुद्धानंतर आशिया खंडात जपान एक प्रभुत्वशाली राष्ट्र म्हणून उदयास आले. हिरोशिमा व नागासकी या शहरांवर अमेरिकेने अणुहल्ले केले. त्यामध्ये जपानचे फार मोठे नुकसान झाले. परंतु एखाद्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे जपानने आपला अल्पावधीतच कायापालट केला. शेती, उद्योग आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रात जपानने मोठी भरारी घेतली आणि प्रगतीचा टप्पा गाठला. आज जपानच्या टोयाटो कारची मागणी अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर आहे आणि अमेरिकन बाजारपेठसुद्धा जपानने काबीज केली आहे. जपानच्या या वाढत्या आर्थिक व लष्करी सामर्थ्यामुळे आशिया खंडातील एक स्थिर धु—व म्हणून जपान ओळखला जातो. परंतु जपान आणि चीन यांच्या स्पर्धेतून अनेक समस्या उद्भवत आहेत. तेव्हा चीनला प्रतिशह देण्यासाठी जपानला भारताकडून सहकार्य हवे आहे.

जपान स्वत:ला आशिया खंडातील विकसनशील राष्ट्रांना मदत करून 'लाईट लिबरेटर अँड प्रोटेक्टर ऑफ एशिया' आशियाचा प्रकाशदाता, मुक्ती दाता आणि संरक्षक ही भूमिका पूर्वीपासून पार पाडत आला आहे आणि आता ही भूमिका जपानला नव्या व्यूहरचनेसंदर्भात अधिक प्रभावीपणे पार पडावयाची आहे. तसेच जपानच्या या मौलिक भूमिकेमध्ये भारताचे सामर्थ्य वाढल्यामुळे भारताचीही भागीदारी वाढलेली आहे. यापूर्वी शिंजो अ‍ॅबे यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी पंतप्रधान मोदी यांची आणि जपानच्या पंतप्रधानांची भेट झाली होती. आता पुढील म्हणजे जी-20, क्वाड आणि जी-7 या परिषदेमध्येसुद्धा दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे. विशेषत: जपानच्या पंतप्रधानांनी मोदी यांना हिरोशिमा येथे होणार्‍या जी-7 राष्ट्रांच्या परिषदेचे निमंत्रण दिले आहे. म्हणजे जी-20 आणि जी-7 राष्ट्रांचा हा संगम विकासातील अडकून पडलेले अनेक प्रवाह मुक्त करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे जपान आणि भारत खांद्याला खांदा लावून विकसनशील देशांच्या विकासासाठी सहकार्य करणार आहेत.

जपान आणि भारत यांची मैत्री प्राचीन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशदा दोघांनीही उद्धव उद्यानात जाऊन जगाच्या शांततेसाठी व विकासासाठी प्रार्थना केली. भविष्यकाळातही सांस्कृतिक संबंधाला आर्थिक व औद्योगिक संबंधात रूपांतरित करण्यासाठी उभय राष्ट्रे प्रयत्नशील आहेत. तसेच लष्करी सामग्रीचे आदान-प्रदान असो, नाविक सामर्थ्यातील सहकार्य असो, तटरक्षक दलासाठी परस्पर सहकार्य असो, याबाबतीतसुद्धा नवी पावले टाकण्यात येत आहेत. किशदा यांनी केलेल्या भाषणातून त्यांनी भारताविषयी व्यक्त केलेला आत्मविश्वास महत्त्वाचा वाटतो. तसेच युक्रेन युद्धानंतर निर्माण झालेली परिस्थिती कशा पद्धतीने सावरता येईल याबाबतही त्यांची चिंतन व मंथन आवश्यक आहे.

भारत रशियाचा मित्र आहे आणि रशियाने भारताला अनेक कठीण प्रसंगी मदत केली आहे. असे असले तरी देखील युक्रेन युद्धानंतर शांतता निर्माण करणे व प्रश्न सोडवणे, नव्या जगाची नवी व्यूहरचना करून विकासाच्या दृष्टीने नवी दिशा देणे आवश्यक आहे, असे त्यांना वाटते. तसेच याबाबतीत भारताने पुढाकार घ्यावा असा त्यांचा आग्रह आहे. नव्या जगातील नवे प्रश्न सोडवण्यासाठी भारत व जपान यांनी दमदारपणे पावले टाकली तर पुढे चालून येणार्‍या काळात जगातील सत्ता समतोल अधिक चांगल्या पद्धतीने राखता येऊ शकेल, असे त्यांना वाटते. विशेषत: आशियातील सत्ता समतोलाच्या दृष्टीने आणि वैश्विक शांतता व विकासाच्या दृष्टीने युक्रेन युद्धानंतर, कोव्हिड साथीनंतर निर्माण झालेले प्रश्न सोडवण्यासाठी उभय राष्ट्रांमधील हा सेतू निश्चितच फलदायी ठरेल यात शंका नाही. भारत जपान यांच्या मैत्रीचे हे एक नवे शिखर आहे. हा टप्पा शांतता, विकास आणि सहकार्याच्या दृष्टीने निश्चितच फलदायी ठरेल असे वाटते.

प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news