इंडिया आघाडीतील बेकी

इंडिया आघाडीतील बेकी
Published on
Updated on

आगामी लोकसभा निवडणुकांत भाजपला आव्हान देण्यासाठी तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस, इंडिया आघाडीत एकत्र आले होते. नितीशकुमार यांनी ऐनवेळी 'इंडिया'मधून 'एनडीए'मध्ये उडी मारून आपली प्रतिमा सार्थ ठरवली. इंडिया आघाडीच्या अगोदरच्या बैठकीत जागावाटप लवकर होत नसल्याबद्दल ममता बॅनर्जी यांनी नाराजीही व्यक्त केली होती. अधूनमधून त्या काँग्रेसवर दुगाण्याही झाडत होत्या; परंतु आता प. बंगालमध्ये आघाडी करण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव धुडकावून लावत, तृणमूलने रविवारी राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 42 लोकसभा मतदारसंघांमधील उमेदवारांची एकतर्फी घोषणा केली. म्हणजेच इंडिया आघाडीतून तृणमूल बाहेर पडली असून, या आघाडीस त्यांनी सुरुंग लावला आहे. या आधी नितीशकुमार यांचा जेडीयू बाहेर पडला. नॅशनल कॉन्फरन्सचे सर्वोच्च नेते फारुख अब्दुल्ला यांनीही जम्मू-काश्मीरमध्ये स्वतंत्ररीत्या निवडणुका लढवण्याचे ठरवले आहे.

आम आदमी पक्ष आघाडीत असूनही, पंजाबात लोकसभा स्वतंत्रपणे लढवणार आहे. जेथे प्रत्येकाचा अहम् किंवा 'इगो' मोठा असतो, तेथे एकीऐवजी बेकी होणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे दिल्लीत सत्ता मिळवण्याचा इंडिया आघाडीचा 'खयाली पुलाव' बनता बनताच बिघडत चालला आहे. काँग्रेसला प. बंगालमध्ये केवळ दोन जागा देण्याची तयारी तृणमूलने दर्शवली होती. एकेकाळी ज्या राज्यात काँग्रेसची सत्ता होती, तेथे त्या पक्षाची आज ही अवस्था आहे. आसाम, मेघालय, नागालँड आदी ईशान्येकडील राज्यांमध्ये जर काँग्रेसने जागा दिल्या, तर प. बंगालमध्ये काँग्रेसला अधिक जागा देण्याची तृणमूलची तयारी होती. वास्तविक ईशान्येत तृणमूलची ताकद फारशी नाही. प. बंगालमध्ये भाजपला तुल्यबळ लढत देण्याची शक्ती केवळ तृणमूलमध्ये आहे, असा दावा ममता बॅनर्जी यांच्याकडून केला जात होता.

प. बंगालमध्ये दोन्ही पक्षांचा सन्मान टिकवला जाईल, अशा पद्धतीने जागावाटप केले पाहिजे, असे काँग्रेसचे म्हणणे होते. हा प्रश्न चर्चा करून सोडवता येऊ शकतो, अशी काँग्रेसची भूमिका असल्याचे ट्विट काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी केले आहे. दोन्ही पक्षांनी समन्वयानेच भाजपशी लढाई केली पाहिजे, असा मवाळ सूर रमेश यांनी लावला असला, तरी तृणमूलचे कट्टर विरोधक लोकसभेतील गटनेता आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अधीररंजन चौधरी यांनी मात्र नेहमीप्रमाणे तृणमूलविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. ममता या इंडिया आघाडीत राहिल्या असत्या, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज झाले असते. तपास यंत्रणांची भीती वाटत असल्यामुळेच त्यांनी इंडिया आघाडीशी काडीमोड घेतला, असा आरोप त्यांनी केला आहे. काँग्रेसला जादा जागा हव्या होत्या आणि कुठल्याही परिस्थितीत त्या देण्याची तृणमूलची तयारी नव्हती. त्यामुळे राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा राज्यात आली, तेव्हा ममता तेथे गेल्या नाहीत. मुळात तृणमूलशी आघाडी व्हावी, अशी अधीररंजन यांचीच बिलकुल इच्छा नव्हती. इंडिया आघाडी झाल्यानंतरही अधीररंजन यांची तृणमूलवरची टीका थांबली नव्हती.

संदेशखाली येथे स्थानिक तृणमूल नेता शहाजहान शेख याच्या टोळीने भीतीचे वातावरण निर्माण केले होते, लोकांच्या जमिनी बळकावल्या होत्या आणि महिलांवर अत्याचारही केले होते. हे प्रकार वेशीवर टांगण्यासाठी भाजप नेत्यांप्रमाणेच अधीररंजनही तेथे भेट देण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना अडवले गेले. संदेशखालीच्या घटनेस हिंदू-मुस्लिम सांप्रदायिक घटना म्हणून रंगवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, असा आरोपही त्यांनी केला होता. या प्रकरणात तृणमूल सरकारला प्रसारमाध्यमांप्रमाणेच न्यायालयानेही धारेवर धरले आणि त्यानंतर शहाजहानला अटक करणे सरकारला भाग पडले. ममता या पूर्वी खासदार होत्या आणि आता मुख्यमंत्री आहेत; परंतु त्या वर्षानुवर्षे पगारही घेत नाहीत. सरकारी खजिन्याची त्यांनी लूट केल्यामुळे त्यांना वेतनाची गरज नाही, असा हल्लाबोलही अधीररंजन यांनी केला होता. तीन वर्षांपूर्वी गोव्यातील विधानसभा निवडणुकांच्या आधी ममता यांनी गोव्याचा दौरा केला, त्यावेळी प. बंगालमधील लुटीचा पैसा त्या गोव्यात उधळत आहेत, अशी टीका अधीररंजन यांनी केली होती.

प. बंगालमध्ये डेंग्यूचा प्रसार होत होता, त्याचवेळी ममता यांनी स्पेनचा दौरा केला, त्यावरूनही काँग्रेसने तृणमूलवर तोफ डागली होती, तर अधीररंजन हे काँग्रेसमधील 'ट्रोजन हॉर्स' आहेत, या शब्दांत तृणमूलचे सरचिटणीस आणि ममता यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी निशाणा साधला आहे. अधीररंजन यांच्यामुळेच राज्य पातळीवर दोन पक्षांमधील युती तुटली, असे उद्गार तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी काढले आहेत. दोन्ही पक्ष एकमेकांवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप करत आहेत! अधीररंजन यांचा बालेकिल्ला असलेल्या बहरामपूर मतदारसंघात तृणमूलने क्रिकेटपटू यूसुफ पठाणला उमेदवारी दिली. या मतदारसंघात मुस्लिम मतदार निर्णायक ठरतात. त्यामुळे मुस्लिम मतांमध्ये फूट घडवून अधीररंजन यांना पाडण्यासाठीच तृणमूलने यूसुफला उमेदवारी दिली, हे स्पष्ट आहे.

तृणमूल आणि काँग्रेस पक्ष हे प. बंगालमध्ये भाजपचा विरोध करण्याऐवजी, एकमेकांशीच शत्रुत्व करण्यात व्यग्र आहेत. असे पक्ष इंडिया आघाडीत मांडीला मांडी लावून बसतील, अशी आशा ठेवण्यात काहीही अर्थ नाही. शिवाय ममतांना ईडीची भीती असती, तर यापूर्वीच त्या एनडीए आघाडीत सामील झाल्या असत्या! तृणमूलचे अनेक मंत्री व नेत्यांविरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तपास यंत्रणांच्या कारवाया सुरू आहेत. तरीदेखील ममता यांनी भाजपविरोधाची भूमिका बदललेली नाही. तसेच प. बंगालमध्ये पूर्वी ज्यांनी सत्ता भोगली, ते काँग्रेस अथवा कम्युनिस्ट पक्ष नावापुरतेच शिल्लक राहिले आहेत. जर ममता यांनी भाजपशीच संगनमत केले, तर प. बंगालमधील त्यांचा राजकीय अवकाशच संपुष्टात येईल. तेथील काँग्रेस व डाव्यांची जागा आता मोकळी झाली असून, तृणमूल व भाजप हे दोनच पक्ष उरले आहेत. संदेशखाली प्रकरणामुळे तृणमूलविरुद्धचा महिलांचा आक्रोश वाढला आहे. काँग्रेस आणि तृणमूलमधील कट्टीबट्टीमुळे लाभ भाजपलाच होणार, हे स्पष्ट आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news