

पोर्ट ऑफ स्पेन; वृत्तसंस्था : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसर्या कसोटीच्या पाचव्या दिवशी वेस्ट इंडिजचा डाव लवकर गुंडाळून व्हाईट वॉश देण्याच्या भारताच्या निर्धारावर पावसाचे पाणी पडले. दिवसाचे पहिले सत्र पावसामुळे वाया गेले. सकाळपासून एकही चेंडू टाकता आला नाही. त्यामुळे पाऊस यजमान संघाला पराभवापासून वाचवेल, असे वाटत होते; परंतु तीन तासांनंतर पाऊस थांबला. त्यामुळे स्थानिक वेळेनुसार दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास खेळ सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण शेवटची बातमी हाती आली तेव्हा मैदानावरील कव्हर्स हटवण्यात आले होते, पण खेळ सुरू झाला नव्हता. पाचव्या दिवसाचा खेळ रद्द करून सामना अनिर्णित ठेवण्याचा निर्णय घेतला.
चौथ्या दिवशी रविवारी भारताने वेस्ट इंडिजला 365 धावांचे लक्ष्य दिले. त्यानंतर यजमान संघाने दिवसअखेरीस 2 बाद 76 धावा केल्या होत्या. विंडीजच्या दोन्ही विकेटस् रविचंद्रन अश्विनने घेतल्या. विंडीजला या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर त्यांना अजून 289 धावा कराव्या लागणार आहेत, तर भारतीय संघ उरलेल्या 8 विकेटस् घेऊन सामना जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसर्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिज कर्णधाराने झुंज देत संघाला फायटिंग पोझिशनमध्ये आणून ठेवले होते; परंतु चौथ्या दिवशी सकाळी भारताच्या वेगवान गोलंदाजांनी उर्वरित डाव 255 धावांत गुंडाळल्याने भारताला पहिल्या डावात 183 धावांची आघाडी मिळाली. यानंतर भारताने आपला दुसरा डाव 2 बाद 181 वर घोषित केला. रोहित शर्मा (57) आणि इशान किशन (नाबाद 52) यांनी जलद अर्धशतके केली.
विंडीजचा पहिला डाव 255 धावांत गुंडाळल्यानंतर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या जोडीने भारताचा दुसरा डाव सुरू केला. यात रोहित जास्त आक्रमक होता, त्याने केवळ 35 चेंडूंतच जलद अर्धशतक झळकावले, पण त्यानंतर तो लगेच बाद झाला. गॅब्रिएलच्या गोलंदाजीवर जोसेफ अल्झारीने त्याचा फाईन लेगवर झेल घेतला. रोहितने 44 चेंडूंत 57 धावा केल्या. यात त्याने 5 चौकार आणि 3 षटकार ठोकले. या मालिकेतील त्याने सलग तिसर्यांदा पन्नासहून अधिक धावांची खेळी केली. यानंतर शुभमन गिल खेळायला आला, पण त्याने एक चेंडू खेळल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. पंचांनी या वाया जाणार्या वेळेतच लंचब्रेक घोषित केला. यावेळी भारताच्या 1 बाद 98 धावा झाल्या होत्या. यावेळी भारताकडे एकूण 282 धावांची आघाडी होती.
जवळपास एक तासाचा खोडा घातल्यानंतर पाऊस थांबला. त्यानंतर खेळ सुरू झाल्यावर चौथ्या चेंडूवर यशस्वी जैस्वाल बाद झाला. वारीकॅनच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक डा सिल्व्हाने त्याचा झेल घेतला. यशस्वीने 38 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने इशान किशनला फलंदाजीत सातव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर पाठवले, पण काही काळानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. भारताच्या यावेळी 2 बाद 118 धावा झाल्या होत्या. शुभमन गिल 10 तर इशान किशन 8 धावांवर खेळत होते. या सामन्यात भारतीय संघाने 2 बाद 181 धावा करून आपला दुसरा डाव घोषित केला. यादरम्यान युवा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनने 34 चेंडूंत 4 चौकार आणि 2 षटकारांसह 152.94 च्या स्ट्राईक रेटने अफलातून अर्धशतक (52*) ठोकले.