

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India announcement : भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडचा पराभव केला आहे. T20I मालिका 3-0 ने जिंकल्यानंतर भारताने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने विजय मिळवला. यानंतर, आता टीम इंडियाचे नवीन मिशन दक्षिण आफ्रिका दौरा आहे, जो कोरोनाच्या नवीन प्रकार ओमायक्रॉनमुळे सुमारे दहा दिवसांनी पुढे ढकलला गेला आहे. भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा 26 डिसेंबरपासून तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेने सुरू होईल आणि त्यानंतर जानेवारीत तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल. या दौऱ्यासाठी टीम इंडियाची आज घोषणा करण्यात आली.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 26 डिसेंबरपासून तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा, केएल राहुल, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि हनुमा विहारी संघात परतले आहेत. यासोबतच रोहित शर्माला वनडे आणि टी-२० संघाचा कर्णधार म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. BCCI ने याची अधिकृत घोषणा आपल्या ट्विटर अकाउंटवरून केली आहे.
दरम्यान, निवड समितीने रोहित शर्माला वनडे आणि टी-२० संघाचा कर्णधार बनवले आहे. अजिंक्य रहाणेची कसोटी उपकर्णधारपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. रोहित शर्माला कसोटी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. कामाच्या ताणामुळे कोहलीने T20 चे कर्णधारपद सोडले. आता कोहलीने वनडेचे कर्णधारपदही सोडले आहे. दुसरीकडे रहाणेचा कसोटी क्रिकेटमधील फॉर्म बराच काळ खराब होता. त्यामुळेच आता त्याच्याकडून कसोटी उपकर्णधारपद हिरावून घेण्यात आले आहे. भारताचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. जिथे संघ ३ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, रवींद्र जडेजा, शुभमन गिल, अक्षर पटेल आणि राहुल चहर दुखापतींमुळे या मालिकेसाठी निवड करण्यात आलेली नाही.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिका अशा वेळी होणार आहे जेव्हा दक्षिण आफ्रिका संघाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाला 30 वर्षे पूर्ण होत आहेत. 1970 मध्ये वर्णभेदामुळे दक्षिण आफ्रिकेवर आयसीसीने बंदी घातली होती. त्यानंतर 1991 मध्ये दक्षिण आफ्रिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.
स्टँडबाय खेळाडू: नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चहर, अझरान नागवासवाला.