

नेपियर, वृत्तसंस्था : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना मंगळवारी (दि. 22) नेपियर येथे होत असून या सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्याचा निर्धार टीम इंडियाचा आहे. दुसर्या बाजूला यजमान न्यूझीलंडचा संघ मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे सहभागी होणार नाही. मालिका गमावण्याची भीती नसल्यामुळे भारतीय संघ या सामन्यात काही प्रयोग करण्याची शक्यता आहे.
नेपियर येथे होणारी ही लढत दोन्ही संघांसाठी निर्णायक असेल. दोन्ही संघांतील आकडेवारीचा विचार केल्यास भारताचे पारडे जड असल्याचे दिसून येते. दोन्ही संघांत आतापर्यंत झालेल्या 22 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांत भारताने 12 मॅच जिंकल्या आहेत. तर न्यूझीलंडने 9 लढतीत विजय मिळवला आहे. याशिवाय एक मॅच पावसामुळे रद्द झाली. आकडेवारीचा विचार करता भारताचे पारडे जड आहे. विशेष म्हणजे 12 पैकी 7 लढती या भारताने देशाबाहेर जिंकल्या आहेत. न्यूझीलंडच्या घरच्या मैदानावर हरवण्याची क्षमता भारतीय संघात आहे.
भारताने 2020 मध्ये झालेल्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत न्यूझीलंडचा त्यांच्या घरच्या मैदानावर 5-0 असा पराभव केला होता. त्यामुळे यावेळी देखील टीम इंडिया अशीच कामगिरी करण्याची आशा आहे. टी-20 वर्ल्डकपमधील सेमीफायनल लढतीत झालेल्या पराभवानंतर भारताचे नेतृत्व हार्दिक पंड्याकडे दिले गेले. 2024 साली होणार्या टी-20 वर्ल्डकपसाठी हार्दिककडे संघाचे नेतृत्व दिले जाईल, अशी चर्चा आहे. ही मालिका म्हणजे त्याचीच एक सुरुवात असल्याचे बीसीसीआयच्या अधिकार्यांनी म्हटले आहे.
न्यूझीलंडला बसला झटका (IND vs NZ)
तिसर्या टी-20 सामन्याआधी न्यूझीलंड क्रिकेट संघाला मोठा झटका बसला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन हा तिसर्या सामन्यातून बाहेर झाला आहे. केनला नियोजित कार्यक्रमानुसार डॉक्टरांना भेटायचे आहे. गेल्या काही दिवसांपासून डॉक्टरांना भेटायचे होते, पण संघाच्या बिझी कार्यक्रमामुळे त्याला वेळ देता आला नाही. केनच्या गैरहजेरीत मार्क चॅपमॅन याचा संघात समावेश करण्यात आला आहे.
हवामान-
तिसर्या आणि शेवटच्या सामन्यात हवामान चांगले राहण्याची अपेक्षा आहे. दुपारनंतर नेपियरमध्ये हलका पाऊस पडू शकतो. दिवसाचे कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
खेळपट्टी-
नेपियरच्या मॅक्लीन पार्कची खेळपट्टी फलंदाजांसाठी स्वर्ग आहे. येथे फलंदाज जबरदस्त चौकार आणि षटकार मारू शकतात. या मैदानावर आतापर्यंत एकूण 5 टी-20 सामने खेळले गेले आहेत. जसजसा खेळ पुढे जाईल तसतसा विकेट मंदावेल. अशा स्थितीत पाठलाग करणार्या संघाला येथे त्रास होऊ शकतो.
सामन्याची वेळ : दुपारी 12 वाजता
थेट प्रक्षेपण : डीडी स्पोर्टस्
लाईव्ह स्ट्रिमिंग : अॅमेझॉन प्राईम