सैनिक शाळांतील मुलींची वाढती संख्या

सैनिक शाळांतील मुलींची वाढती संख्या
Published on
Updated on

काही वर्षांपूर्वीपर्यंत लष्करी शाळांमध्ये शिकणे हे मुलींचे स्वप्नच होते. मात्र, सैनिक शाळांमध्ये मुलींना प्रवेश देण्याची पद्धत सुरू झाल्यापासून महिलांना संधी दिल्यास त्या प्रत्येक आघाडीवर आपली पात्रता सिद्ध करू शकतात, हे बदलते चित्र पुन्हा एकदा दिसून आले आहे.

सैनिक शाळांनी आता मोठ्या संख्येने मुलींना प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे. याला मुख्यतः पुरुष प्रवाहातील स्त्रियांचा आणखी एक ठोस हस्तक्षेप म्हणून पाहिले जाऊ शकते. एका प्रश्नाच्या उत्तरात सरकारने राज्यसभेत माहिती देताना असे सांगितले की, देशातील 33 लष्करी शाळांमध्ये एक हजार 299 मुली शिकत आहेत. याशिवाय इतर 303 विद्यार्थिनी विविध संस्थांच्या भागीदारीतून उघडलेल्या सैनिक शाळांमध्ये शिकत आहेत. विविध कारणांमुळे सामान्य शाळांतील मुलींची गळती ही समाज आणि सरकारसाठी चिंतेची बाब ठरत असताना, सैनिक शाळांतील मुलींची वाढती संख्या ही निश्चितच सकारात्मक म्हणायला हवी.

काही वर्षांपूर्वी, सरकारने सैनिक शाळांमध्ये मुलींच्या प्रवेशास पायलट प्रोजेक्ट म्हणून मान्यता दिली होती. लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक ठोस उपक्रम म्हणून त्याकडे पाहिले गेले होते. वास्तविक, लष्करी क्षेत्रातील महिलांच्या प्रगतीबाबत समाजात अनेक स्तरांवर पूर्वग्रह आहेत आणि याचा परिणाम लष्करात जाऊन चांगली कारकिर्द घडवण्याची स्वप्ने पाहणार्‍या मुलींवरही होत आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत लष्करात महिलांच्या कायमस्वरूपी कमिशनबाबत अनेक अडचणी होत्या; पण कालांतराने सैन्यात महिलांची उपस्थिती आणि क्षमता ही एक गरज म्हणून उदयास आली. महिलांनी या क्षेत्रात काम करताना जवळजवळ प्रत्येक आघाडीवर आपली क्षमता सिद्ध केली आणि हक्काचे स्थान मिळवले. लष्करी शाळांमध्ये मुलींच्या प्रवेशाबाबत आग्रह धरला जात असला तरी त्याला ठोस आधार नव्हता. गेल्या काही वर्षांत केवळ मोठ्या संख्येने मुलींनी सैनिक शाळांमध्ये प्रवेश घेतला आणि आता ही संख्या एक हजार 600 च्या वर पोहोचली आहे.

वास्तविक, लोकशाहीत सर्व वर्गांचा सहभाग सुनिश्चित करण्याच्या सूत्रावर काम करणार्‍या सरकारला समाजातील कोणता घटक कोणत्याही क्षेत्रात मुख्य प्रवाहापासून वंचित राहता कामा नये, याचे भान ठेवावे लागते. या द़ृष्टिकोनातून प्रत्येक क्षेत्राच्या विकासात पुरुषांच्या बरोबरीने काम करणार्‍या महिलांबाबत हे भान ठेवणे गरजेचेच आहे. यातून स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करणे ही काळाची गरज आहे. पुरुषांसाठी सोयीस्कर समजल्या जाणार्‍या किंवा पुरुषांची मक्तेदारी राहिलेल्या प्रत्येक क्षेत्रात जेव्हा महिलांनाही संधी मिळते, तेव्हा जबाबदारीच्या सर्व स्तरांवर चांगले परिणाम दिसून येतात.

लष्करी शाळांमध्ये मुलींचे प्रवेश सुरू करण्यामागे महिला सक्षमीकरणाचा हेतूही होता. या शाळांमधील वाढत्या पटसंख्येवरून या दिशेने उचललेल्या पावलांचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. या शाळांमधून उत्तीर्ण होणार्‍या मुली देशाच्या चांगल्या भविष्यासाठी योगदान देऊ शकतील, यात शंकाच नाही. महिलांनी अनेक क्षेत्रांत भरारी घेतली आहे. अशातच मुलींची लष्करी शाळांमध्ये वाढती संख्या हे सुयोग्य लक्षण आहे. काहीच क्षेत्रांत मुलींना करिअर करण्याचा अट्टाहास यापूर्वी केला जात होता; पण आता मुलीही देशासाठी योगदान देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. कोणतेही क्षेत्र महिलांसाठी खुले झाले आहे. लष्करात नोकरी करणे हे मोठे सन्मानाचे मानले जाते. महिलांनाही संधी आता हवी आहे. अशातच त्यांचे लष्करी शाळांमध्ये वाढते प्रमाण अन्य महिलांचे धैर्य वाढवणारे आहे. आतापर्यंत लष्करी नोकरी पुरुषांपुरती मर्यादित ठेवली जात होती; पण देशातील अनेक तरुणी देशसेवा करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्याही आपले शौर्य दाखवण्यास उत्सुक आहेत. आता समाजानेही बुरसटलेल्या मानसिकेत न राहता भविष्यात आपल्या मुलींनाही लष्करात पाठवणे हे चांगल्या समाजाचे लक्षण आहे, हे विसरता कामा नये!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news