हवामान : उष्माघाताचा वाढता धोका

उष्माघाताचा वाढता धोका
उष्माघाताचा वाढता धोका
Published on
Updated on

अलीकडील काळात हवामान बदलांमुळे तापमानाचा पारा तीव्रतेकडे जाताना दिसत आहे. ज्या गावा-शहरांमध्ये चाळिशीपर्यंत तापमान दिसायचे, तिथे आज तापमानाने पन्नाशीपर्यंत मजल मारल्याचे दिसून येत आहे. 2022 मध्ये उष्माघाताच्या 767 रुग्णांची नोंद झाली होती आणि त्यापैकी 31 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला होता. मागील 8-10 वर्षांतील हा उच्चांक होता. यंदाच्या वर्षी एल निनोचा प्रभाव जाणवणार, असे भाकीत हवामान संस्थांकडून वर्तवण्यात येत आहे. या काळात कोरड्या हवेमुळे उष्मा आणखी वाढण्याची शक्यता असते.

पर्यावरण आणि आरोग्य यांचा घनिष्ट संबंध आहे. माणूस हा निसर्गाचाच एक अंश असल्यामुळे वातावरणातील बदलांचा कमी-अधिक परिणाम हा मानवी आरोग्यावर होत असतो. अलीकडील काळात प्रचंड वाढलेले प्रदूषण, त्यामुळे झालेली जागतिक तापमानवाढ आणि त्यामुळे झालेले हवामान बदल यांमुळे मानवी आरोग्याचे प्रश्न पूर्वीच्या तुलनेत गंभीर बनले आहेत. विशेषतः हवामानातील उष्णतेचे प्रमाण वाढत चालल्यामुळे त्वचेशी संबंधित समस्यांपासून अन्यही अनेक व्याधी, तक्रारी यांमध्ये वाढ होत आहे. वाढलेल्या वायू प्रदूषणामुळे श्वसन विकारांमध्ये वाढ झाली आहे. दुसरीकडे, याच प्रदूषण आणि हवामान बदलांमुळे पावसाळ्यातील पाऊस जसा वाढत चालला आहे तशाच प्रकारे उन्हाळ्याचा पाराही चढत चालला आहे. पूर्वीच्या काळी तापमानाच्या पार्‍याने चाळिशी गाठली की, त्याची बातमी होत असे. महाराष्ट्रात विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील काही भाग, सातारा जिल्ह्यातील काही तालुके, मराठवाड्यातील दुष्काळी जिल्हे येथे उन्हाळ्यातील तापमान नेहमीच जास्त असल्याचे दिसून यायचे. साहजिकच, या भागातील लोकजीवनाच्या उन्हाळ्यातील आहार-विहाराच्या सवयीही त्याला अनुकूल असणार्‍या होत्या. तथापि या भागांसह अनेक भागांत गेल्या काही वर्षांमध्ये तापमानाचा पारा पन्नाशीपर्यंत जाताना दिसत आहे. साहजिकच, यामुळे अनेकांना उष्माघाताचा सामना करावा लागत आहे.

2022 मध्ये उष्माघातामुळे राज्यात गेल्या दशकभरातील सर्वाधिक मृत्यू झाले होते, असे आकडेवारीतून समोर आले आहे. 2022 मध्ये उष्माघाताच्या 767 रुग्णांची नोंद झाली होती आणि त्यापैकी 31 जणांचा मृत्यू झाला होता. 2016 मध्ये उष्माघातामुळे राज्यात 19 जणांचा मृत्यू झाला होता. वस्तुतः अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी महाराष्ट्रात दरवर्षी 1 मार्च ते 31 जुलै या कालावधी उष्णता विकार प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी विविध पातळीवर उपाययोजना आखण्यात येतात. तसेच या आजाराचे दैनंदिन सनियंत्रण करण्यात येते. परंतु तरीही नागरिकांमध्ये आजही उष्माघाताबाबत पुरेशी जागरूकता दिसून येत नाही. विशेषतः नोकरी-व्यवसायाच्या, पोटापाण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडणार्‍यांनी, शेतामध्ये काम करणार्‍यांनी तसेच रस्त्यावर फिरून व्यवसाय करणार्‍यांनी, कडक उन्हामध्ये श्रमाची कामे करणार्‍यांनी उष्माघाताबाबत अधिक काळजी घेण्याची गरज असते. याखेरीज लहान मुलांनाही उन्हाच्या कडाक्याचा त्रास मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता असते.

आपल्या शरीराचे तापमान नेहमी 37 अंश सेल्सिअस असते. साधारणतः या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात. या तापमानाचे संतुलन करण्याचे काम घामाच्या रूपाने पाणी बाहेर काढून शरीर करत असते. परंतु जेव्हा तापमान 45 अंशांच्या पुढे जाते तेव्हा शरीराचे तापमान संतुलन राखणारी यंत्रणा बाधित होते. प्रखर तापमानाला सामोरे गेल्याने शरीरातील उष्णता-संतुलन व्यवस्था निकामी होते. जास्त तापमानात दीर्घकाळ राहिल्यास शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी होण्याची शक्यता असते.

उष्माघाताचे मुख्य लक्षण म्हणजे प्रमाणाबाहेर वाढलेले शारीरिक तापमान. याखेरीज हृदयाची धडधड/ठोके वाढणे, भरभर आणि दीर्घ श्वास, रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे, घाम थांबणे, चिडचिड, बेशुद्धी किंवा भ्रम, चंचलता येणे किंवा ठोके हलके होणे, डोकेदुखी, मळमळ (उलट्या) इत्यादी लक्षणे दिसू लागताच तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक ठरते. कारण अतिउष्ण तापमानामुळे रक्तातील पाणी कमी होऊन रक्त घट्ट होते. परिणामी, रक्तदाब कमी होतो. तसेच शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना, खास करून मेंदूला होणारा रक्तपुरवठा थांबतो. पर्यायाने माणूस कोमात जाण्याची शक्यता असते. या टप्प्यावरही योग्य उपचार न मिळाल्यास मृत्यू ओढावू शकतो.

उष्माघात झालेल्या व्यक्तीला सर्वात आधी थंडाव्याच्या किंवा सावलीच्या ठिकाणी आणावे. व्यक्तीला खाली झोपवावे आणि त्याचे पाय व हात सरळ करावे. व्यक्तीचे कपडे सैल करावे आणि व्यक्तीला थंड पाणी पाजावे. व्यक्तीचे शरीर थंड पाण्याचे शिबके मारून किंवा थंड पाण्याच्या बोळ्याने पुसून काढून किंवा पंख्याच्या वार्‍याने थंड करावे. हे सर्व प्रथमोपचार करत असताना उष्माघातग्रस्त व्यक्तीवर बारकाईने लक्ष ठेवावे. जर ताप 102 फॅरनहाईटपेक्षा जास्त असेल; बेशुद्धी, भ्रम किंवा आक्रमकता यासारखी लक्षणे दिसून येत असतील तर ताबडतोब वैद्यकीय तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.

उष्माघात कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे उष्माघातापासून स्वत:ला कसे वाचवता येते हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. वास्तविक, याबाबतचे ज्ञान आपल्याला घरातील वडीलधार्‍या मंडळींकडून दिले जात असतेच; पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते. उष्माघातच नव्हे, तर उन्हाळ्यातील बहुतांश आजारांपासून बचाव करण्यासाठी जास्तीत जास्त पाणी आणि द्रवपदार्थ, पेये पिणे हा उपाय अत्यंत प्रभावी ठरतो. पाणी पिताना फ्रीजमधील थंड पाणी टाळून माठातील पाणी प्यावे. तसेच थोड्या थोड्या कालावधीने सतत पाणी पित राहावे. पाण्याबरोबरच फळांचे साखररहित ज्यूस, लिंबू सरबत, कैरीचे पन्हे, ताक, नारळपाणी यांसारख्या पेयांचे आलटून पालटून सेवन करावे.

सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच सोडा असणारी आणि प्रचंड प्रमाणात साखरेचा वापर केलेली शीतपेये या दिवसांत टाळावीत. आहारात तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ, मद्यपान टाळा. याखेरीज शेतातील कामे किंवा सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कात येऊन करावयाची कामे सकाळी 6 ते 11 व दुपारी 5 नंतर करावीत. काम करत असताना मध्ये मध्ये पाणी प्यावे. उन्हाळ्याच्या दिवसांत पॉलिस्टरचे, नायलॉनचे, टेरीकॉटचे तसेच भडक रंगांचे कपडे टाळून शक्यतो सुती आणि पांढर्‍या किंवा सौम्य रंगाचे कपडे वापरावेत. घराबाहेर पडताना डोके आणि चेहरा व अंग झाकले जाईल याची दक्षता घ्या. उष्माघात ही संसर्गजन्य व्याधी नाही किंवा कसलेही संक्रमण नाही. केवळ मानवी हलगर्जीपणामुळे आणि बेजबाबदारपणामुळे तसेच लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे उद्भवणारी समस्या आहे. त्याचा सामना प्रतिबंधात्मक उपायांनीच करायला हवा.

हवामान अभ्यासकांच्या मते, यंदाच्या वर्षी उन्हाळा अधिक तीव्र राहणार असल्याची शक्यता आहे. आपल्याकडे दरवर्षी साधारणतः वैशाख महिन्यापासून तापमानाचा पारा वेगाने वाढून महत्तम पातळीपर्यंत पोहोचतो. यंदा एल निनोचे संकट राहणार असल्याची शक्यताही वर्तवली जात असून, अशा काळात हवामान अधिक कोरडे असते. त्यामुळे उष्णतेचा त्रास अधिक तीव्र स्वरूपात जाणवतो. या पार्श्वभूमीवर विचार करता, येणार्‍या दीड-दोन महिन्यांच्या काळात सर्वांनीच उन्हापासून काळजी घेणे गरजेचे आहे.

डॉ. संजय गायकवाड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news