

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारा 'सेंगोल' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन लोकसभेत स्थापित करण्यात आला. लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या उजव्या बाजूला हा सेंगोल स्थापित करण्यात आला आहे.
तामिळनाडूच्या शैव पुरोहितांच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांनी 'सेंगोल'चा स्वीकार केला. तत्पूर्वी मोदी यांनी 'सेंगोल' समोर साष्टांग दंडवत घातला. त्यानंतर वैदिक मंत्रोच्चारात लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या उजव्या बाजूला 'सेंगोल' स्थापित करण्यात (New Parliament Building) आला.
यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. सेंगोल स्थापित करण्यात आल्यानंतर मोदी यांनी पुरोहितांचा आशीर्वाद घेतला.
नव्या संसद भवनाच्या (New Parliament Building) उद्घाटन कार्यक्रमादरम्यान मोदी यांनी संसद भवन उभारणीत सामील असलेल्या श्रमिकांचा सन्मानही केला.
सेंगोल हा शब्द तामिळ भाषेतील 'सेम्मई' पासून बनलेला आहे. सेम्मई याचा अर्थ नीतिपरायणता असा होतो. यापुढील काळात सेंगोल पवित्र राष्ट्रीय प्रतीक म्हणून ओळखले जाईल. ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक म्हणून सेंगोल लॉर्ड माउंटबॅटन यांनी जवाहरलाल नेहरू यांना दिला होता. आतापर्यंत हा 'सेंगेाल' प्रयागराज येथील एका संग्रहालयात ठेवण्यात आला होता.
तामिलनाडूतील प्राचीन चोल साम्राज्य काळात सत्तेचे हस्तांतरण 'सेंगोल' सोपवून केले जात असे. भगवान शिव यांना आवाहन करीत सेंगोल सोपविले जाई. या परंपरेची माहिती राजा गोपालचारी यांनी जवाहरलाल नेहरू यांना सांगितली होती. त्यानंतर ब्रिटिशांकडून सत्ता हस्तांतरण करताना सेंगोल परंपरेचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी तामिळनाडूत विशेष सेंगोल बनवून ते दिल्लीला मागविण्यात आले. सत्ता प्राप्तीनंतर सेंगोल नेहरू यांच्याकडे सोपविण्यात आले व तेथून ते प्रयागराजच्या संग्रहालयात ठेवण्यात आले. संग्रहालयातील नेहरू गॅलरीच्या प्रवेशद्वारावर एका शोकेसमध्ये हे सेंगोल ठेवण्यात आले होते.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या निर्देशानुसार हे सेंगोल 4 नोव्हेंबर 2022 रोजी दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालयात आणले गेले. हेच सेंगोल आता नवीन संसद भवनात लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या उजव्या बाजूला ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा