

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC Test Rankings : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या रांची कसोटीनंतर आयसीसीने नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. यात भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालला पुन्हा फायदा झाला आहे. त्याने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला मागे टाकले असून तो टॉप 10 च्या उंबरठ्यावर येऊन पोहचला आहे. दुसरीकडे, रांची कसोटीच्या पहिल्या डावात शतक झळकावणा-या इंग्लंडच्या जो रूटला स्थान सुधारण्यात यश आले आहे. तर पाकिस्तानच्या बाबर आझमची घसरण सुरूच आहे.
आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत टॉप 2 च्या स्थानांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. न्यूझीलंडचा केन विल्यमसन (893 रेटिंग) पहिल्या आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ (818) दुसऱ्या स्थानावर कायम आहेत. दरम्यान, भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत शतक झळकावल्याचा फायदा इंग्लंडच्या जो रूटला झाला आहे. त्याने 2 स्थानांनी सुधारणा करत थेट 3 -या क्रमांकावर उडी घेतली आहे. त्याचे रेटिंग 799 झाले आहे, जे आधी 766 होते. (ICC Test Rankings)
न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल आणि पाकिस्तानचा बाबर आझम यांना जो रूटमुळे फटका बसला आहे. मिशेल 780 च्या रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर तर बाबर आझम 768 रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर गेला आहे. उस्मान ख्वाजा सहाव्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेच्या दामुथ करुणारत्नेला एका स्थानाचा फायदा झाला असून तो 750 च्या रेटिंगसह सातव्या क्रमांकावर गेला आहे. मार्नस लॅबुशेनलाही दोन स्थानांचा फायदा झाला आहे. 746 रेटिंग आणि दोन स्थानांच्या उडीसह ते थेट 8 व्या क्रमांकावर झेप घेण्यास यशस्वी झाला आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा हॅरी ब्रूक यांना प्रत्येकी दोन स्थानांचे नुकसान झाले आहे. कोहली आता 744 रेटिंगसह 9व्या तर हॅरी ब्रूक 743 रेटिंगसह दहाव्या क्रमांकावर कायम आहे.
दरम्यान, यशस्वी जैस्वालची अप्रतिम कामगिरी सुरूच आहे. तीन स्थानांची झेप घेतली असून तो आता 12व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांना मागे टाकले आहे. आधीच्या रँकिंगमध्ये जैस्वाल 699 रेटिंगसह 15 व्या स्थानावर होता. आता त्याचे रेटिंग 727 पर्यंत वाढले आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा एका स्थानाच्या नुकसानासह 13व्या तर ऋषभ पंत 14व्या स्थानावर आहे. मालिकेतील शेवटच्या सामन्यातही जैस्वालच्या बॅटने 'यशस्वी' खेळी केली तर तो पुढील महिन्यात टॉप 10 मध्ये पोहेचेल. सध्या जैस्वालचे रेटिंग 727 असून दहाव्या क्रमांकाच्या फलंदाजाचे रेटिंग 743 आहे, म्हणजेच या दोन क्रमांकामधील रेटिंगमध्ये फारसा फरक नाही. धर्मशाला मैदानावरील अखेरच्या सामन्यात जयस्वालची बॅट कशी कामगिरी हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. (ICC Test Rankings)
रुटने कसोटी अष्टपैलूंच्या क्रमवारीत तीन स्थानांनी झेप घेत चौथ्या क्रमांक गाठला आहे. या यादीत रवींद्र जडेजा पहिल्या क्रमांकावर आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत जसप्रीत बुमराह अव्वल स्थानावर आहे. बुमराहला रांचीमध्ये विश्रांती देण्यात आली. भारतीय फिरकीपटू कुलदीप यादवने चार विकेट घेत 10 स्थानांनी प्रगती करत 32व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या कारकिर्दीतील हे नवीन सर्वोच्च रँकिंग आहे.