Australia in WC Final : द. आफ्रिका पुन्हा ‘चोकर्स’! निसटता विजय मिळवत ऑस्ट्रेलियाची आठव्यांदा फायनलमध्ये धडक

Australia in WC Final : द. आफ्रिका पुन्हा ‘चोकर्स’! निसटता विजय मिळवत ऑस्ट्रेलियाची आठव्यांदा फायनलमध्ये धडक
Published on
Updated on

कोलकाता, पुढारी ऑनलाईन : Australia in WC Final : वनडे वर्ल्डकपच्या राऊंड रॉबीन लीगमध्ये भारतानंतर दुसर्‍या क्रमांकाचा यशस्वी संघ म्हणून गणला गेलेल्या दक्षिण आफ्रिकन संघाने ऐन मोक्याच्या क्षणी कच खाल्ली. कोलकाता येथे सेमीफायनल लढतीत ऑस्ट्रेलियाने त्यांच्यावर 3 विकेट्सने निसटता विजय मिळवून आठव्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला. एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आफ्रिकेचा संघ पराभूत होण्याची ही पाचवी वेळ आहे. त्यामुळे हा संघ पुन्हा एकदा चोकर्स ठरला आहे. आता रविवारी (19 नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर तीनवेळचा विश्वविजेता भारत आणि पाचवेळचा ऑस्ट्रेलिया या दोन संघात अंतिम सामना रंगणार आहे.

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 49.4 षटकात 212 धावा त्यांचा संघ ऑलआऊट झाला. डेव्हिड मिलरने सर्वाधिक 101 धावा केल्या. मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सने 3-3 विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात 213 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली. डेव्हिड वॉर्नर आणि ट्रॅव्हिस हेड यांनी पहिल्या विकेटसाठी सहा षटकांत 60 धावा जोडल्या. यानंतर 29 धावांवर वॉर्नर मार्करामचा बळी ठरला. रबाडाने मार्शला खातेही उघडू दिले नाही, पण हेडसह स्मिथने डावाची धुरा सांभाळली. दोघांनी 45 धावा जोडल्या. हेडला बाद करून केशव महाराजने आफ्रिकेला सामन्यात परत आणले. हेडने 48 चेंडूत 62 धावा केल्या. यानंतर आफ्रिकन फिरकी गोलंदाजांनी आपली पकड घट्ट केली. ज्यामुळे कांगारू फलंदाजांना धावा काढणे कठीण झाले.

शम्सीने 18 धावांच्या स्कोअरवर लॅबुशेनला पायचीत केले आणि नंतर एका धावेवर मॅक्सवेलला बोल्ड केले. इंग्लिस आणि स्मिथने 37 धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला लक्ष्याच्या जवळ नेले. 30 धावांच्या स्कोअरवर कोएत्झीने स्मिथला बाद केले. तर इंग्लिशला 28 धावांवर तंबूत पाठवले. मात्र, मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी आठव्या विकेटसाठी 22 धावांची नाबाद भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला. स्टार्क 16 तर कमिन्स 14 धावांवर नाबाद राहिला. आफ्रिकेकडून गेराल्ड कोएत्झी आणि तबरेझ शम्सी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. कागिसो रबाडा, एडन मार्कराम आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या अंगलट आला. कांगारूंच्या मा-यापुढे प्रोटीस संघाने लोटांगण घातले, ज्यामुळे त्यांचा डाव 212 धावांत संपुष्टात आला. डेव्हिड मिलर खेळला नसता तर आफ्रिकेला तेवढ्याही धावा करता आल्या नसत्या. ऑस्ट्रेलियन गोलंदाज मिचेल स्टार्क व जोश हेझलवूड यांनी पहिल्या 13 षटकांत दक्षिण आफ्रिकेला 4 धक्के दिले. स्टार्क व हेझलवूड यांच्या भेदक मार्‍यासमोर आफ्रिकेची मजबूत फलंदाजांची फळी ढेपाळली. डेव्हिड मिलर आणि हेन्रीच क्लासेन यांनी 95 धावांची भागीदारी करून संघाला सुस्थितीत आणले. या दोघांसमोर प्रमुख गोलंदाज अपयशी ठरत असताना पार्ट टाईम गोलंदाज ट्रॅव्हिस हेडने कमाल केली. मिलर व कोएत्झी यांची 53 धावांची भागीदारी पॅट कमिन्सने तोडली. कोएत्झी 19 धावांवर झेलबाद झाला; परंतु त्याने डीआरएस घेतला असता तर तो नाबाद राहिला असता.

2015 च्या बाद फेरीतील सामन्यात फॉफ ड्यू प्लेसिसने न्यूझीलंडविरुद्ध 82 धावांची खेळी केली होती आणि ती वर्ल्ड कपच्या बाद फेरीतील आफ्रिकेकडून झालेली सर्वोत्तम वैयक्तिक खेळी होती. आज मिलरने हा विक्रम स्वतःच्या नावावर केला. ऑसींचा प्रमुख गोलंदाज स्टार्क आला अन् त्याने केशव महाराजला माघारी पाठवला. मिलरने षटकाराने शतक पूर्ण केले. पण, अखेरच्या षटकांत धावा वाढवण्याच्या प्रयत्नात मिलर सीमारेषेवर झेलबाद झाला. त्याने 116 चेंडूंत 8 चौकार व 5 षटकारांसह 101 धावांची खेळी केली. आफ्रिकेचा संपूर्ण संघ 49.4 षटकांत 212 धावांवर माघारी परतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news