

अबुधाबी; पुढारी ऑनलाईन : मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद ( Hyderabad vs Mumbai ) यांच्यातील सामन्यात मुंबईने २० षटकात २३५ धावा करुन अर्धी लढाई नेटाने लढली होती. मात्र प्ले ऑफचे तिकीट मिळवण्यासाठी त्यांना हैदराबादला ६५ धावांत गुंडळायचे होते. परंतु जेसन रॉय आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने ६४ धावांची सलामीच देऊन मुंबईला अखरे अधिकृतरित्या प्ले ऑफपासून दूर ठेवले. मात्र हैदराबादला मुंबईचे २३५ धावांचे आव्हान पार करता आले नाही. त्यांनी २० षटकात ८ बाद १९३ धावांपर्यंत मजल मारली. हैदराबादकडून कर्णधार मनिष पांडेने सर्वाधिक ६९ धावांची खेळी केली.
हैदराबादच्या अभिषेक शर्मा आणि जेसन रॉय यांनी मुंबई इंडियन्सच्या २३५ धावांच्या मोठ्या आव्हानाला पार करताना ६४ धावांची सलामी दिली. मात्र त्यानंतर मुंबईने हैदराबादला हादरे द्याययला सुरुवात केली. बोल्टने जेसन रॉयला ३४ धावांवर बाद केले. त्यानंतर नीशमने अभिषेक शर्माला ३३ धावांवर बाद करत हैदराबादचा दुसरा सलामीवीर माघारी धाडला.
या दोन धक्यातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोहम्मद नबीला पियुष चावलाने ३ धावांवर बाद केले. त्यानंतर आलेला अब्दुल समादही २ धावांची भर टाकून नीशमच्या गोलंदाजीवर बाद झाला. बिनबाद ६४ वरुन ४ बाद १०० अशी अवस्था झालेल्या हैदराबादला कर्णधार मनिष पांडे आणि प्रियम गर्गने सावरले. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी भागीदारी रचण्यास सुरुवात केली.
पांडे आणि गर्ग जोडीने १५ व्या षटकात हैदराबादला १५० धावांपर्यंत पोहचवले. या जोडीने पाचव्या विकेटसाठी ३५ चेंडूत ५६ धावांची भागीदारी रचली. अखेर जसप्रीत बुमराहने २१ चेंडूत २९ धावा करणाऱ्या प्रियम गर्गला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर बुमराह आणि कुल्टर नाईलने हैदराबादची खालची फळी कापण्यास सुरुवात केली.
बुमराहने राशीद खानला तर कुल्टर नाईलने जेनस होल्डर आणि वृद्धीमान साहाला बाद करत हैदराबादची अवस्था ८ बाद १८२ अशी केली. दरम्यान, अर्धशतक करणाऱ्या कर्णधार मनिष पांडेने अखेरच्या चेंडूपर्यंत झुंज देत हैदराबादला २० षटकात १९३ धावांपर्यंत पोहचवले. मात्र त्याची नाबाद ६९ धावांची खेळी हैदराबादचा ४२ धावांनी झालेला पराभव टाळू शकली नाही. मुंबईकडून नीशम, कुल्टर नाईल आणि बुमराहने प्रत्येकी २ विकेट घेतल्या.
करो या मरो स्थितीत असलेल्या मुंबई इंडियन्सला नशिबाने साथ दिली. त्यांनी नाणेफेक जिंकली आणि आत्तापर्यंतचा सर्वाधिक स्कोर धावफलकावर लावला. मुंबईने २० षटकात ९ बाद २३५ धावांचे आव्हान हैदराबाद समोर ठेवले आहे. आता मुंबईला केकेआरचे रनरेट पार करायचे असेल तर हैदराबादचा १७१ धावांपेक्षा जास्त धावांनी पराभव करावा लागेल.
आयपीएलच्या १४ व्या हंगामा मधील अखेरचे साखळी सामने आज खेळले जात आहेत. यंदाच्या हंगामातील ५५ वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद ( Hyderabad vs Mumbai ) यांच्यामध्ये खेळला जात आहे. प्ले ऑफ मध्ये स्थान मिळविण्यासाठी मुंबईला अत्यंत मोठ्या फरकाने हा सामना जिंकावा लागणार आहे.
मुंबईने हैदराबाद ( Hyderabad vs Mumbai ) विरुद्ध अत्यंत धडाकेबाज सुरुवात केली. यामध्ये ईशान किशन याने अत्यंत आक्रमक पावित्रा घेतला होता. त्याला कर्णधार रोहित शर्मा याने ही चांगली साथ दिली. मुंबईने पहिल्या ५ षटकात नाबाद ७८ धावा बनविल्या. अशा आक्रमक खेळीमुळे मुंबई आरामात २५० च्या वर धावा काढेल असे वाटत होते. दरम्यान चौथ्या षटकात ईशान किशन याने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने अवघ्या १६ षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले.
( Hyderabad vs Mumbai ) सहाव्या षटकात राशिद खानच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा झेलबाद झाला. रोहितने १३ चेंडूत १८ धावांची खेळी केली. यानंतर ईशानला साथ देण्यासाठी हार्दीक पांड्या मैदानात उतरला. ईशानने आपली आक्रमक खेळी चालूच ठेवली होती. त्याच्या सोबत हार्दीकने ही काही मोठे फटके खेळले पण तो नवव्या षटकामध्ये होल्डरच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळायला जाऊन झेलबाद झाला. हार्दीकने ८ चेंडूत १० धावांची खेळी केली.
त्यानंतर १० षटकातील पहिल्या चेंडूवर उमरान मलिक याने ईशान किशन याला झेल बाद केले. ईशान याने आपल्या खेळीत ४ षटकारांसह ११ चौकारांची आतषबाजी केली. ईशान नंतर सूर्यकुमार यादव आणि पोलार्ड यांनी थोडासा जम बसविण्याचा प्रयत्न केला. दोघांनी फटकेबाजी चालूच ठेवली. या जोडीने फलंदाजीचा लय फारसा सुटू दिला नाही. १० षटकानंतर मुंबईने ३ बाद १३१ धावांपर्यंत मजल मारली होती.
दोघांचा जम बसत असताना १३ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर अभिषेक शर्मा याने पोलार्डला झेलबाद केले. पोलार्डने १२ चेंडूत १३ धावा केल्या. पोलार्डनंतर निशम खेळपट्टीवर आला. पण पहिल्याच चेंडूवर तो देखिल झेलबाद झाला. अशा तऱ्हेने अभिषेक शर्मा याने मुंबई पाठोपाठ दोन मोठे धक्के दिले. १३ षटकानंतर मुंबईची अवस्था ५ बाद १५१ अशी झाली होती. यानंतर कुणाल पांड्या मैदानात उतरला. तोपर्यंत सूर्यकुमार याने डावाची सुत्रे आपल्या हाती घेतली होती. त्याने मैदानाच्या सर्व बाजूला फटकेबाजी करण्यास सुरु केली होती.
राशिद खान याने सूर्यकुमार आणि कुणालची जमू पाहणारी जोडी १६ व्या षटकात फोडली. कुणालने ७ चेंडूत ९ धावा केल्या. दरम्यान सुर्यकुमार याने १७ व्या षटकात आपले अर्धशतक पुर्ण केले. यांनतर देखिल सुर्यकुमारने जोरदार फटकेबाजी सुरुच ठेवली. १७ व्या षटकात मुंबई २०० धावा पार केल्या. अठराव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर होल्डर याने कुल्टरनाईल याने याला बाद केले. त्याने ३ चेंडूत ३ धावा केल्या. त्याच्या नंतर आलेल्या पियुष चावला याने फारसे काही न करता मोठा फटका मारायला जाऊन होल्डच्याच गोलंदाजीवर झेलबाद झाला. होल्डरच्या शेवटच्या षटकात मोठा फटका खेळायला जाऊन सूर्यकुमार सुद्धा झेलबाद झाला. सूर्यकुमार याने ४० चेंडूत ८२ धावांची धडकेबाज खेळी करत ३ षटकार आणि १३ चौकार ठोकले. अखेर मुंबई निर्धारित २० षटकात ९ बाद २३५ धावा केल्या.