

पुणे, पुढारी वृत्तसेवा: 'ना जातीसाठी, ना धर्मासाठी, आम्ही फक्त छत्रपती शिवरायांच्या सन्मानासाठी'. शिवरायांच्या सन्मानात पुणेकर उतरले मैदानात. या घोषवाक्यांच्या काळ्या रंगाचे फलक आणि विविध रंगी झेंडे हाती घेऊन उत्स्फूर्तपणे पुणेकर मूक मोर्चात सहभागी झाले होते.
सर्व धर्मीय शिवप्रेमी पुणेकरांनी डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते लाल महाल पर्यंत मूक मोर्चा मंगळवारी (दि.13) काढला. मोर्चामध्ये खासदार उदयनराजे भोसले, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह सर्व पक्षाचे स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केल्या जात असलेल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या निषेधार्थ मंगळवारी हा मूक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपच्या पदाधिकारी, मंत्र्यांनी वारंवार महापुरूषांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केल्याने राज्यपाल हटावचे फलक देखील नागरिकांच्या हातामध्ये होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सकाळपासूनच मोर्चाची तयारी सुरू होती. सकाळी नऊनंतर नागरिकांची गर्दी होण्यास सुरूवात झाली. मोर्चा सुरू होण्याच्या अगोदर साधारण एक ते दीड तास महिला हातामध्ये विविध महापुरूषांचे फलक घेऊन उभ्या राहिल्या होत्या.
मूक मोर्चाच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा ट्रॅक्टरमध्ये होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घातल्यानंतर मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चा खंडोजीबाबा चौकापासून टिळक चौक मार्गे लक्ष्मी रोडने बेलबाग चौकातून लाल महाल येथे गेला. मोर्चामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाने काळी फीत बांधून निषेध व्यक्त केला. लहान मुलांसह महिलांचा मोर्चात उल्लेखनीय सहभाग होता. मोर्चामध्ये सहभागी नागरिकांसाठी मुस्लिम संघटनांसह सर्वच संघटनांकडून ठिकठिकाणी चहा, पाण्याची व्यवस्था केली होती.
टिळक चौकातून मोर्चा पुढे आल्यानंतर लक्ष्मी रस्त्यावर चौकाचौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारून मूक मोर्चाच्या स्वागतासाठी स्थानिक कार्यकर्ते थांबलेले होते. नेहमी गजबज असलेल्या लक्ष्मी रस्त्यावरील सर्व दुकाने बंद होती. लक्ष्मी रस्त्यावर मोर्चामधील सहभागी नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. सकाळी पावणे अकरा वाजता मोर्चाला प्रत्यक्षात सुरूवात झाली, हा मोर्चा लाल महालाजवळ दुपारी पावणे दोन वाजता पोहोचला.
'छत्रपती शिवाजी महाराज के सम्मान में मुस्लिम मैदान में' असे वाक्य लिहलेले बॅनर अंगामध्ये घालून मुस्लिम संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आपले जीवन अर्पण केले. त्यांनी कधीही कोणामध्ये भेदभाव केला नाही. महाराजांच्या सन्मानार्थ आम्ही या मोर्चात सहभागी झाल्याचे या पदाधिकार्यांनी सांगितले. एक संविधानिक पदावर असणार्या व्यक्तीने महाराजांबद्दल अशी वक्तव्य करणे चुकीचे आहे. अशा माणसाची राज्यपाल या पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणीही या पदाधिकार्यांनी केली.