

पुढारी ऑनलाईन डेस्क : "या जगाला शिकविण्यासारखं माझ्याकडे नवीन काहीच नाही. सत्य आणि अहिंसा या तर डोंगरा इतक्या जूना गोष्टी आहेत," महात्मा गांधी यांनी आपल्या 'माझे सत्याचे प्रयोग' या आत्मचरित्राचे सार वरील दोन ओळीत लिहिलं आहे. महात्मा गांधी यांनी अहिंसा आणि सत्याग्रह या शब्दांना स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख आयुधे बनवलं. आज महात्मा गांधी यांची जयंती. ( Mahatma Gandhi and satyagraha ) जाणून घेवूया, स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख शस्त्र बनलेल्या सत्याग्रह शब्द महात्मा गांधींना कसा सूचला याविषयी…
११ सप्टेंबर १९०६ रोजी दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णभेद आंदोलनावेळी महात्मा गांधी यांनी सर्वप्रथम सत्याग्रह शब्द वापरला होता. हा शब्द ऐतिहासिक ठरला. याच आंदाेलनाने संपूर्ण जगाला सत्याचा आग्रह काय करु शकतो, हॆ दाखवून दिले. यानंतर जगभरात अहिंसेच्या मार्गाने अनेक आंदोलन झाली ती याच शब्दाच्या प्रेरणेतून.
सत्याचा आग्रह म्हणजे सत्याग्रह. सत्य असेल त्यावर ठाम राहणे. दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णभेदाच्या आंदोलनासाठी गांधीजी यांना एक असा शब्द हवा होता. यासाठी त्यांनी नवा शब्द सुचविण्याचे आवाहन केले होते. यावर मगनलाल गांधी यांनी या आंदोलनासाठी 'सदाग्रह' अशा शब्द सूचवला. गांधींजी यांनी तत्काळ या शब्दाला संमती दिली. मात्र यामध्ये त्यांनी थोडा बदल केला. त्यांनी या शब्दात सत्य हा शब्द जोडला आणि आंदाेलनासाठी सत्याग्रह या शब्द अंतिम केला.
गांधी यांनी केलेल्या आवाहनावर सदाग्रह शब्द सूचवणारे मगनलाल खुशालचंद गांधी हे महात्मा गांधी यांच्या काकांचे नातू होते. मगनलाल हे व्यापारासाठी दक्षिण आफ्रिकेत गेले होते. मात्र कालांतराने ते महात्मा गांधी यांच्या संपर्कात आले. यानंतर ते गांधींच्या फिनिक्स आश्रमात वास्तव्यास आले. ते महात्मा गांधी यांचे अनुयायी झाले. माझा विश्वासू सहकारी अशी त्यांची महात्मा गांधी ओळख करुन देत असत. अत्यंत शिस्तप्रिय व्यक्ती अशी त्यांची ओळख होती भारतात परतल्यानंतर महात्मा गांधी यांनी सारबरमती आश्रमाची स्थापना केली. या आश्रमाला मगनलाल यांनी सर्वस्व अर्पण केले. २३ एप्रिल १९२८ रोजी विषमज्वराने (टायफॉईड) त्यांचा मृत्यू झाला.
दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णभेदाच्या आंदोलनासाठी ११ सप्टेंबर १९०६ रोजी महात्मा गांधी सर्वप्रथम सत्याग्रह या शब्द वापरला होता. या नावाला असहमती दर्शवत काही सहकार्यांनी त्याची खिल्लीही उडवली होती. मात्र काहींनी त्यांच्याही विचारांचा आदर करत याकडे दुर्लक्ष केले. कालांतराने सत्याग्रह आंदोलनास संपूर्ण जगभर मिळेला प्रतिसादानंतर त्यांच्या सहकार्यांना आपली चूक लक्षात आली होती.
सत्य याचा अर्थच प्रेम आहे. याच सत्य आणि प्रेमातून अहिंसेचा जन्म होतो, या तत्वावरच त्यांनी सत्याग्रह आंदोलन सुरु केले. अखेर इंग्रजीमध्येही सत्याग्रह शब्दाचा समावेश करावा लागला.