Hinglaj Mata Mandir : बलुचिस्तानच्या देवीचे नाशिकमध्ये वास्तव्य, जाणून घ्या आख्यायिका…

Hinglaj Mata Mandir : बलुचिस्तानच्या देवीचे नाशिकमध्ये वास्तव्य, जाणून घ्या आख्यायिका…
Published on
Updated on

मूळच्या पाकिस्तानमधील बलुचिस्तान पर्वतरांगांमध्ये स्थित हिंगलाजमातेचे एकमेव मंदिर नाशिकमधील खेडे या गावात आहे. देवीच्या जगभरातील ५१ शक्तिपीठांतील पहिले पीठ असलेल्या हिंगलाजमातेला भक्ताच्या विनवणीमुळे पाकिस्तानातून थेट नाशिकमध्ये यावे लागले, अशी आख्यायिका आहे. निफाड तालुक्यातील कारस (तत्कालीन नाव) या गावात देवी भक्तासोबत आली आणि या ठिकाणीच थांबली. भक्त डोंगरपुरी महाराज यांनीही या ठिकाणी दे‌वीची सेवा करत करत संजीवन समाधी घेतली. असे हे आई आणि भक्ताचे अनोखे उदाहरण आहे. पाकिस्तानमधून भारतात देवी स्थित होण्याचे हे कदाचित देशातील पहिलेच उदाहरण असावे.  

संबधित बातम्या :

याबाबत सध्या खेडे गावचे सरपंच असलेल्या निवृत्ती कोल्हे यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण बाराव्या शतकात देवी गावात आली. याबाबत अशी अख्यायिका आहे की, मूळ हरियाणा येथील दशनाम गोसावी समाजाचे महंत डोंगरपुरी महाराज हे बलुचिस्तान येथील डोंगररांगांमध्ये स्थित असलेल्या हिंगलाजमातेचे निस्सिम भक्त होते. ते वर्षातून एकदा अशी वयाच्या ९५व्या वर्षापर्यंत नियमित वारी करत होते. वयोमानाने वारी करणे अवघड झाल्यावर त्यांनी देवीला विनवणी केली की, मी इतकी वर्षे तुझी मनोभावे सेवा केली आहे. आता तू माझ्या जवळपास ये. त्यावर देवीने त्यांना स्वप्नात दृष्टांत देत येण्याचे मान्य केले. देवीने सांगितले की, मी डोंगरावर पाषाणात स्थित आहे. जर तू मागे वळून बघितले आणि माझ्या वजनावर अविश्वास दाखवला, तर त्या ठिकाणी मी स्थित होईल. त्यानुसार ते सरळ सरळ चालत राहिले. अनेक ठिकाणी तीर्थक्षेत्रांवर दर्शन घेतले. पुढे त्र्यंबकेश्वरमार्गे पंचकेश्वरी (सध्याचे देवपूर) या ठिकाणी आले. तेथून कारस (सध्याचे खेडे) या गावाजवळ आले.

श्री. श्रेत्र हिंगलाज माता मंदिर, खेडा
श्री. श्रेत्र हिंगलाज माता मंदिर, खेडा

कारस गावातून विनता नदी वाहते. पावसाळ्याचे दिवस असल्याने त्या ठिकाणी महापूर आला होता. महंत डोंगरपुरी येथे महाराज थांबले. त्याचवेळी पुढे कसे जायचे, यासाठी त्यांनी मागे वळून बघितले आणि तिथेच दिव्य प्रकाश स्थित झाला. महंतांनी संबंधित गावातील ग्रामस्थांना याबाबत माहीती दिली. ग्रामस्थांनी भक्तिभावाने देवीची प्राणप्रतिष्ठा याठिकाणी केली. महंतांनी देवीची सेवा करत करतच संजीवन समाधी घेतली. या पद्धतीने देवीचे या गावात स्वत:हून येणे झाले आहे. त्यामुळे ग्रामदैवत म्हणून याठिकाणी देवीची पूजा अर्चा नित्यनेमाने होत असते.

प.पु डोंगरपुरी महाराज संजीवनी समाधी मंदिर खेडे
प.पु डोंगरपुरी महाराज संजीवनी समाधी मंदिर खेडे

वर्षातून चार उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरे होतात. चैत्र नवरात्र, श्रावण शुद्ध चतुर्दशी, अश्विन नवरात्र आणि पौष पौर्णिमा आदी तिथींना या गावात जत्रा भरते. वर्षभरात साधारणपणे ३ ते ४ लाख भाविक या ठिकाणी येऊन देवीच्या चरणी लीन होतात. राज्य शासनानेही यांची दखल घेत हे तीर्थक्षेत्र ब वर्गात आ‌णले आहे. या देवस्थानासाठी साधारणपणे ७ ते ८ एकरचे क्षेत्र राखीव ठेवण्यात आले आहे.

२७ समाजांचे कुलदैवत

हिंगलाजमाता ही देशातील तब्बल २७ समाजांचे कुलदैवत आहे. त्यामध्ये दशनाम गोसावी समाज, ब्रह्मक्षत्रिय समाज (ठाकूर), तेली समाज, कोकणस्थ ब्राह्मण समाज, साळी समाज, काही मराठा समाज, फुलमाळी समाज, भावसार (रंगारी) समाज, बेलदार समाज, पटेलिया समाज, धनगर समाज, गुजरातमधील रावल समाज, खत्री समाज, जोधपूर येथील गुराखी समाज, बैरागी समाज, यादव कुलीन पांडव, सिंधी समाज, सहस्रार्जुन क्षत्रिय समाज, संन्यासी समाज, बंजारी समाज (ऊसतोडी), कुमावत समाज, बंजारा (गोर) समाज, गुजराती समाज, भाटिया, कहार, निमाडकडील जादूगार जमात, मारवाडी आणि खेडे-उगावचे ग्रामदैवत यांचा समावेश होतो.

पाकिस्तानात मुसलमान करतात पूजा

बलुचिस्तान येथे हिंगोल नदीच्या तिरावर असलेल्या मक्रान पर्वताच्या डोंगरांमध्ये देवीची पूजा हिंदूंसह मुसलमानदेखील करत असतात. त्यामुळे देवाच्या पूजेला धर्म, प्रांत यांचा अडसर नसल्याचे देवीचे भक्त अभिमानाने सांगतात.

खेडे ओळखले जाणार हिंगलाजनगर

सरपंच झाल्याच्या पहिल्याच ग्रामसभेत गावाचे नाव बदलण्याचे ठरले. गावाला एवढा मोठा इतिहास आणि संपूर्ण राज्यात पाकिस्तानातील डोंगररांगांमधील देवीचे मंदिर आपल्या गावात असल्याने त्यानुसार गावाचे नाव हिंगलाजनगर ठेवण्याचे गावाने एकमताने मान्य केले. नामबदलाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिलेला आहे. लवकरच त्यावर निर्णय होईल. मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत आहेत. त्यामुळे लवकरच हे एक तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपाला येईल.

– निवृत्ती कोल्हे, सरपंच, हिंगलाजनगर (खेडे), नाशिक

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news