उच्चशिक्षणाला आता ‘परीस स्पर्श’; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

उच्चशिक्षणाला आता ‘परीस स्पर्श’; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा वाढविण्याच्या दृष्टीने नॅक, एनबीए मूल्यांकनासाठी महाविद्यालयांना मार्गदर्शन व्हावे याकरिता 'परीस स्पर्श' योजना सुरु करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

राज्यात सध्या ३ हजार ३४६ महाविद्यालयांपैकी १ हजार ३६८ महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन झाले आहे. सद्य:स्थितीत १ हजार ९७८ महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन झालेले नाही. तसेच ७०४ तंत्रशिक्षण महाविद्यालयांचे एनबीए मूल्यांकन झालेले नाही. या संदर्भात मुंबई विद्यापीठामध्ये आयोजित एका कार्यशाळेमध्ये महाविद्यालयांना मूल्यांकनासाठी मार्गदर्शनाची गरज असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. त्यानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाच्या परामर्ष योजनेच्या धर्तीवर राज्याकडून 'परीस स्पर्श' योजना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या योजनेचा कालावधी तीन वर्षांचा राहील. यासाठी राज्य सल्लागार समिती, विद्यापीठस्तरीय समिती आणि जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात येईल. या समित्यांमार्फत मार्गदर्शक संस्थांची निवड करण्यात येईल. या योजनेसाठी येणाऱ्या १३ कोटी ५० लाख रुपये खर्चास देखील मान्यता देण्यात आली. नागपूर मेट्रो रेल टप्पा-२ प्रकल्पास सुधारित मान्यता ४३.८० किमी अंतराची मेट्रो मार्गिका उभारणार नागपूर शहरातील मेट्रो रेल टप्पा- २ प्रकल्पास मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुधारित मान्यता देण्यात आली. सुधारित मान्यतेमुळे नागपूरमध्ये आता ४३.८० किमी अंतराची मार्गिका उभारण्यात येणार असून त्यासाठी ६ हजार ७०८ कोटी रुपयांचा सुधारित खर्च येणार आहे. जानेवारी २०१४ मध्ये नागपूर मेट्रो रेल्वे टप्पा एक प्रकल्प राबवण्यास सुरुवात झाली होती.

अतिविशेषोपचारच्या पदव्युत्तर पदवी विद्यार्थीसंख्येत वाढ करणार

  • अतिविशेषोपचार विषयातील पदव्युत्तर पदवी विद्यार्थीसंख्येत वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याकरिता अध्यापकीय पदांची युनिटनिहाय पुनर्रचना करुन सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक संवर्गातील १४ पदे नव्याने निर्माण करण्यात येतील.
  • सध्या या संवर्गात १३८ पदे मंजूर आहेत आणि संस्थानिहाय कमाल विद्यार्थीसंख्या १३७ आहे. या निर्णयामुळे मंजूर विद्यार्थी पद संख्या १३७ वरून २०९ इतकी होणार आहे.
  • ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सर ज. जी. समूह रुग्णालय, बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर या संस्थांमध्ये ही पदे निर्माण करण्यात येतील.

अकृषी विद्यापीठातील शिक्षक समकक्ष पदांना सहावा, सातवा आयोग

अकृषी विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील संचालक, सहायक संचालक व प्रकल्प अधिकारी या शिक्षक समकक्ष पदांना सहाव्या व सातव्या वेतन आयोगाची वेतन संरचना लागू करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या सर्व पदांना सहावा व सातवा वेतन आयोग लागू केल्यामुळे ५ कोटी ९० लाख दहा हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती देण्यात आली.

नौदलाच्या सेलर इन्स्टिट्यूटसाठी भाडेपट्टीच्या नूतनीकरणास मंजुरी

मुंबईतील फोर्ट परिसरातील भारतीय नौदलास दिलेल्या सेलर इन्स्टिट्यूट 'सागर' या संस्थेस भाडेपट्ट्याने दिलेल्या शासकीय मिळकतीचे नाममात्र एक रुपया दराने भाडेपट्टा नूतनीकरण करण्यास मंजुरी देण्यात आली. पुढील तीस वर्षांच्या कालावधीसाठी हा भाडेपट्टा राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news