

उचकी लागणे ही नैसर्गिक क्रिया आहे. उचकी लागली की आपण म्हणतो, कुणीतरी आठवण काढली. ज्याने आठवण काढली असेल त्याचे नाव घेतले की उचकी थांबते. याला काही अर्थ नाही. उचकी लागणे ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे. श्वास घेत असताना छाती आणि पोट यांच्यामधील पटलाचे (डायफ्रॅम) चे आकुंचन होते आणि त्यामुळे स्वरयंत्राचा मार्ग एकदम बंद होतो, त्यामुळे जो तीव्र आवाज निर्माण होतो त्याला उचकी म्हणतात. (Hiccups)
जेवताना घासाबरोबर हवाही गिळली गेल्याने उचकी लागते. खूप भरभर जेवणे, खूप मसालेदार पदार्थ खाणे, शीतपेयांचे भरपूर सेवन किंवा मद्यपान, उत्तेजित होणे, तापमानात अचानक बदल होणे, काही औषधे किंवा काही आजारांमुळे उचकी लागू शकते.
सामान्यपणे उचकीचे तीन प्रकार आहेत. एक म्हणजे अठ्ठेचाळीस तासांपेक्षा अधिक काळ न टिकणारी उचकी, दुसरा प्रकार म्हणजे अठ्ठेचाळीस तास किंवा त्यापेक्षा अधिक काळ म्हणजे काही दिवसांपर्यंत लागणारी उचकी आणि तिसरा प्रकार म्हणजे एक महिन्याहून अधिक काळ राहणारी उचकी.
सर्वसाधारणपणे उचकी लागल्यानंतर थोडे पाणी प्याल्यावर उचकी थांबते. काही सेकंद किंवा काही मिनिटांत उचकी थांबते, पण काही वेळा काही तास उलटल्यावरही उचकी थांबत नाही. तरीही फारशी समस्या नसते, पण उचकीची समस्या एक महिन्याहून अधिक काळ राहिली तर मात्र त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. हे मज्जासंस्थेच्या विकाराचे लक्षण असू शकते, म्हणजे अर्धागवायूचा झटका, जखम, किडनीचे काम व्यवस्थित न चालणे, मानसिक आजार वगैरे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार उचकी लागण्यावर औषधोपचार नाहीत, पण काही घरगुती उपाय आहेत. नाक दाबून श्वास रोखून धरणे, थंड पाणी पिणे वगैरे. त्याचबरोबर उचकी लागल्यावर साखर किंवा गूळ खाऊन पाणी पिणे, मध चाटणे असे काही उपाय आहेत.मात्र ज्यावेळी उचकी सतत लागत राहते, तेव्हा मात्र डॉक्टरांकडे जाऊन अन्य कोणत्या आजाराचे हे लक्षण नाही ना हे तपासून घेणे गरजेचे असते.
डॉ. संतोष काळे